मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
राजेंद्र कुमार आणि गीताबाली यांचं अनोखं नातं
सिनेमा या माध्यमाबाबत पूर्वीपासूनच समाजामध्ये एक ‘लव अँड हेड’ रिलेशन होतं आहे. सिनेमा सर्वांना आवडत होता पण या माध्यमाबद्दल समाजात एकाच वेळी प्रेम आणि तिरस्कार अशा दोन्ही गोष्टी असायच्या. सिनेमात जाणं म्हणजे पोरगा वाया गेला अशी भावना समाजात असायची. समाज बिघडण्याचे मुख्य कारण सिनेमा आहे असे देखील अनेक वर्ष समजले जायचे. अलीकडे हे चित्र बदललेलं दिसतं त्यामुळे या माध्यमाला सामाजिक दर्जा मिळायला खूप वेळ लागला. खरंतर सिनेमाचा गोल्डन इरा असताना या माध्यमाबाबत वाईटच जास्त बोललं जायचं. पण अशाही वातावरणात काही गोष्टी अशा घडलेल्या असतात की, ज्या वाचून आज देखील खूप आनंद आणि आश्चर्य वाटतं. सिनेमातील वातावरण, तिथलं स्त्रैण वातावरण, कौटुंबिक आदर्श मूल्यांना हरताळ फासणे यावर खूप बोललं जात असे पण खरोखरच असंच होतं कां ? सिनेमात चांगल्या गोष्टी खरंच नव्हत्या का ? का आपण एकच नकारात्मक बाजू समोर आणत होतो ? (Rajendra Kumar)
याबाबत खूप काही बोललं जातं पण एक किस्सा अलीकडेच एका जुन्या मासिकात वाचण्यात आला आणि रूपेरी पडद्यावरील नातं देखील किती पवित्र असू शकतं याचा प्रत्यय ही आठवण वाचून आला. अभिनेता राजेंद्र कुमार पन्नासच्या दशकामध्ये हिंदी सिनेमात आला. सुरुवातीच्या काही फ्लॉप्स नंतर १९५५ साली आलेल्या देवेंद्र गोयल यांच्या ‘वचन’ या चित्रपटापासून तो ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर आला. दिग्दर्शक देवेंद्र गोयल यांचा हा पहिला चित्रपट होता. तसेच संगीतकार रवी यांचा देखील हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात गीता बाली या अभिनेत्रीची महत्त्वपूर्ण अशी भूमिका होती. या भूमिकेसाठी तिला फिल्म फेअर चे नामांकन देखील मिळाले होते.(Rajendra Kumar)
पण या चित्रपटात गीता बाली आणि राजेंद्रकुमार नायक – नायिकेच्या भूमिकेत नव्हते तर बहिण भावाच्या भूमिकेत होते. राजेंद्र कुमार यांनी खूप मन लावून या चित्रपटात भूमिका केली होती. या दोघांचे खूप भावस्पर्शी प्रसंग या चित्रपटात होते. या रुपेरी पडद्यावरील नात्यातून एक अनामिक असं नातं निर्माण झालं हे नातं रक्ताचं नव्हतं पण त्या पलीकडचं होतं. चित्रपट यशस्वी झाला. राजेंद्र कुमार साठी हा सिनेमा खूप लकी ठरला. यानंतर त्याला लगेच मेहबूब यांचा ‘मदर इंडिया’ हा चित्रपट मिळाला. गीता बालीची आपली रुपेरी कारकीर्द जोरात चालू होती.
१९५६ साली तिने शम्मी कपूर सोबत लग्न केले. साठच्या दशकाच्या अखेरीस गीता बाली एक चित्रपट निर्माण करणार होती. कथानक स्ट्रॉंग होते. या चित्रपटात तिने राजेंद्रकुमारला नायक म्हणून घ्यायचे ठरवले. सिनेमाची नायिका ती स्वतः असणार होती. राजेंद्र कुमार ला कथानक ऐकवले गेले. त्याला कथानक आवडले. मानधनाबद्दल देखील बोलणी झाली. परंतु दुसऱ्या दिवशी राजेंद्र कुमार यांनी चित्रपटात काम करायला नकार दिला! सर्वांना आणि गीताबालीला खूप आश्चर्य वाटले. तिने राजेंद्रकुमारला फोन करून विचारले,” स्टोरी तुम्हाला आवडली आहे. तुमची भूमिका देखील तुम्हाला पसंत आहे. मानधन देखील तुम्हाला जेवढे मिळते तेवढे देत आहे. असे असताना तुम्ही सिनेमाला नकार का देत आहात?” त्यावर राजेंद्रकुमार म्हणाला,” काही वर्षांपूर्वी चित्रपटात मी आपल्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. (Rajendra Kumar)
==========
हे देखील वाचा : ‘आय ॲम ॲन ॲक्सीडेंटल हिरो’ : अशोक कुमार
==========
रुपेरी पडद्यावरील हे नातं तेवढ्या सिनेमा पुरते राहिलेलं नाही तर तेव्हा पासून मी आपल्याला माझी बहीण मानत आहे. माझ्या बहिणी सोबत मी स्वत: हिरो म्हणून कसं काय उभा राहू शकतो ? तेव्हा मला माफ करा. मी अजून तितका मोठा आणि प्रोफेशनल झालो नाही की आपल्यातील नातं विसरून चित्रपट साइन करेन. मला आयुष्यभर आपला भाऊ म्हणूनच राहायचे आहे. पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर देखील!” गीता बालीला हे ऐकताना तिला रडू कोसळले . ती म्हणाली,” मला माफ करा मी या पद्धतीने कधी विचार केलाच नाही.” अशा पद्धतीने गीता बाली आणि राजेंद्र कुमार यांच्या तील सिनेमाच्या पडद्यावर सुरु झालेले बहिण भावाचे नाते गीता बालीच्या मृत्यूपर्यंत हे नातं कायम राहिलं. बॉलीवूडला नाव ठेवताना या अपवादात्मक पण सच्च्या घटनेला सर्वानी लक्षात ठेवावं.