आर के बाहेरचा राजकपूर
२ जून हा सिनेमातील एका महान कलाकार राजकपूर (Raj Kapoor) यांचा स्मृती दिन आहे. आपल्या निळ्या डोळ्यातून रसिकांना प्रेमाची भाषा शिकवणार्या आणि आपल्या भव्य कलाकृतीतून शोमन या पदवीला सार्थ ठरवणार्या राजकपूरचा भारतीय सिनेमातील एक अग्रगण्य व्यक्तीमत्व होते. आज राज यांना आपल्यातून जावून पस्तीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या लोकप्रियतेत देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर तसूभरही घट झालेली दिसत नाही. राज प्रामुख्याने ओळखला जातात त्याच्या स्वत:च्या आर के बॅनरमुळे. हे वर्ष राजकपूर यांचे शताब्दी वर्ष आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी १९४८ साली ’आग’ हा पहिला चित्रपट आपल्या आर के या चित्र संस्थेद्वारे बनविला. तिथून पुढच्या तीन दशकात आर के चा जबरदस्त करीष्मा जारी होता. (Raj Kapoor)
असं असलं तरी राजकपूरने (Raj Kapoor) आर के च्या बाहेरील चित्रपटात ज्या भूमिका केल्या त्या देखील काही कमी मोलाच्या नव्हत्या.या सिनेमांबाबत आणि व्यक्तीरेखांबाबत तसं फार कमी बोलंलं जातं. आज राजच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्याच्या आर के बाहेरच्या भूमिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात आढावा घेऊयात. १९५० साली केदार शर्मा यांचा ’बावरे नैन’ हा चित्रपट आला होता. केदार शर्मांचे राजच्या जीवनात स्थान या करीता महत्वाचे होते की, त्यांनीच त्यांच्या ’नीलकमल’ (१९४७) द्वारे राजला नायक बनवले होते.’बावरे नैन’ मध्ये गीताबाली त्याची नायिका होती. रोशन यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील ’खयालो में किसीके इस तरह आया नही करते’,’सुन बैरी बलम सच बोल’आणि ’तेरी दुनियामें दिल लगता नही वापस बुला ले’ हि अप्रतिम गाणी या प्रणयी त्रिकोणाच्या सिनेमाला हिट करण्यासाठी पूरक होती. राज-नर्गीस यांनी एकूण १६ चित्रपटात एकत्र काम केले.त्या पैकी आर के बॅनरचे सहा सिनेमे होते. आर के बाहेरच्या १९५६ सालच्या ’चोरी चोरी’ चा उल्लेख महत्वपूर्ण ठरावा. मूळात हा सिनेमा ’इट हॅपन्ड वन नाईट’या हॉलीवूड च्या सिनेमावर बेतला होता .यातील शंकरजयकिशनची गाणी अतिशय मधाळ आणि मनाला रूंजी घालणारी होती. ’रसिक बलमा’,’आजा सनम मधुर चांदनी में’,’जहां मै जाती हूं वही चले आते हो’, ’ ये रात भीगी भीगी ’’पंछी बनू उडती फिरू’ ही गाणी इतक्या वर्षांनंतर आजही मनाल धुंद करतात. (Raj Kapoor)
राजच्या अभिनयाचा खरा कस ज्या सिनेमात लागला तो होता १९५८ चा ’फिर सुबह होगी’ रमेश सैगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट डोस्डोव्हस्कीच्या ’क्राईम अॅंड पनिशमेंट’वर आधारीत होता. साम्यवादी विचारांचा उघड उघड प्रचार करणारा हा सिनेमा अप्रतिम जमून आला होता. यात त्याच्या जोडीला माला सिन्हा होती. डाव्या विचारसरणीच्या साहिरच्या आशयघन काव्याला खय्यामचे संगीत होते. ’वो सुबहा कभी तो आयेगी’,’फिर न किजिए मेरी गुस्ताख निगाहोंका गिला’,’चीनो अरब हमारा’या गीतांनी आणि राजच्या अप्रतिम अभिनयाने हा सिनेमा सर्वाथाने वेगळा ठरला. १९५९ साली ऋशिकेश मुखर्जी यांचा ’अनाडी’ चित्रपट आला यात राज सोबत नूतन होती.यात मात्र राजने आपल्या आर के च्या ट्रॅंप लाच रीपीट केले होते.’दिल के नजरसे ’, ’कोसीके मुस्कुराहटो पे हो निसार’,’तेरा जाना दिल के अरमानोका लूट जाना’, ’ सब कुछ सीखा हमने’ ’वो चां खिला वो तारे हंसे’ ही गाणी व हा चित्रपट राजला त्या वर्षीचे फिल्म फेअर देवून गेली. एल व्ही प्रसाद दिग्दर्शित ‘शारदा’ या सिनेमाचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. (Raj Kapoor)
======
हे देखील वाचा : मराठीतील पहिला लोकप्रिय रहस्यपट : पाठलाग
======
यानंतर साठच्या दशकात ’दिल हि तो है ’,’छलिया’,’आशिक’,नजराना’,’दुल्हा दुल्हन’ असे रोमॅंटीक सिनेमे येत गेले.पण १९६६ साली आलेला ’तीसरी कसम’ एकूणच सिनेमाच्या इतिहासात एक वेगळा प्रयत्न होता. संवेदनशील मनाच्या शैलेंद्र ची हि निर्मिती होती. यात राजच्या (Raj Kapoor) जोडीला वहिदा होती. अतिशय मनापासून बनवलेल्या अभिजात कलाकृती शापीत ठरतात.या चित्रपटाबाबत हाच प्रत्यय आला. यात राजने रंगवलेला भॊळा भाबडा हिरामण गाडीवान अप्रतिम होता. सत्तरच्या दशकात राज चरीत्र भूमिकांकडे वळलाखरा पण १९८० सालच्या संजय खानच्या ’अब्दुल्ला’चा अपवाद वगळता त्याच्या तील अभिनेत्याचा उपयोग फारसा करून घेतला नाही.