महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस
राजसीनं अभिनयक्षेत्रात जाण्याचा निर्णय बोलून दाखवला तेव्हा घरचे सगळेच आश्चर्यचकीत झाले. वडील प्रसिद्ध अभिनेते राजेश चिटणीस (Rajsi Chitnis) यांना ते अपेक्षित होतं. मात्र, आई राजेश्वरी यांचा अजूनही तिच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. वकिलीच्या पदवीला असलेल्या राजसीनं छानशी नोकरी करून करिअर घडवावं, अशीच आईची इच्छा. मात्र, राजसी ठाम होती. ‘वकील होऊन पक्षकारांची बाजू मांडण्यापेक्षा वेगवेगळी पात्रे रसिकांसमोर मांडेन’, हा तिचा दृढ निश्चय होता. तो तिनं पूर्ण करून दाखविला.
राजसी चिटणीस (Rajsi Chitnis) कलेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली मनस्वी कलावंत. कलाकारांची नवी पिढी सिनेमा, मालिका या क्षेत्रांविषयी अधिक महत्त्वाकांक्षी असते. मात्र, राजसीनं पदार्पणातच रंगभूमी स्वीकारली, हेच तिच्यातील वेगळेपण. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून तिचं पदार्पण झालंय. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्यासोबत ती काम करतेय. ‘नाटकांतच आधी पाया मजबूत करायचाय. नंतरचं नंतर पाहू’, ही तिची भूमिका इतर नवोदितांसाठी आदर्शवत अशीच आहे.
राजसीचे आजोबा राजाभाऊ चिटणीस प्रसिद्ध नकलाकार. ‘नकलेचा राजा’ ही त्यांची ओळख. नकला, अभिनयासोबतच त्यांनी आजवर कित्येक कामगारांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिलेत. व्यसनमुक्तीच्या कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. तर, राजसीचे वडील राजेश चिटणीस (Rajsi Chitnis) हे झाडीपट्टीतील सुपरहिट नायक. राजेश यांनी कित्येक मराठी चित्रपटांसह रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अशा कलेच्या वातावरणात वाढलेल्या राजसीवर बालपणापासूनच कलेचे संस्कार होत होते. घरी राजाभाऊ, राजेश यांच्या नाट्यप्रयोगाच्या गोष्टी ऐकतच ती मोठी होत होती.
तीन वर्षांची असताना तिनं ‘सोवळ्यातली आजीबाई’ साकारून आपली चुणूक दाखविली होती. पुढं शाळेत कथाकथन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये ती चमकायची. तिचं वाचन जबरदस्त आहे. अभिनयक्षेत्रात यायचं, असं काही तिनं ठरवलं नव्हतं. तशी महत्त्वाकांक्षाही नव्हती. वकिलीचा अभ्यास सुरू होता. त्याचदरम्यान करोना लॉकडाउनचा काळ सुरू झाला. त्यादरम्यान भरपूर वाचन केलं. तेव्हाच रंगमंचावर पाऊल टाकावं, कलेची सेवा करावी, या इच्छेनं मूळ धरलं. तिनं हे घरी सांगितलं तेव्हा ते सर्वांसाठी अनपेक्षित होतं. राजेश मात्र समाधानी होते. कारण, राजसीत (Rajsi Chitnis) दडलेला कलावंत या वडिलानं अचूक हेरला होता. त्यांनी आपल्या लेकीला या क्षेत्रातील चांगल्या, वाईट दोन्ही बाजू समजावून सांगितल्या. तर ‘घेतलेला निर्णय तडीस ने’, असा सल्ला आईनं दिला.
रंगभूमीवर पदार्पण…
राजसी (Rajsi Chitnis) एका चांगल्या संधीच्या शोधात होती. विधी शाखेच्या अंतिम वर्षाला असताना प्रशांत दामले यांचा कॉल आला. ‘‘एका लग्नाची पुढची गोष्ट’साठी रिप्लेसमेंटकरिता एक अभिनेत्री शोधतोय, पुण्याला ऑडिशनसाठी येणं जमेल का’, असं विचारलं. साक्षात प्रशांत दामले यांच्याकडून आमंत्रण कमालीचं सुखावणारं होतं. राजसीनं पुण्याला जाऊन ऑडिशन दिलं. कश्मिरा या भूमिकेसाठी तिची निवडही झाली. आजपर्यंत प्रेक्षकांत बसून नाटक बघितलेल्या राजसीसाठी हा वेगळाच अनुभव होता. त्या मखमली पडद्यामागं किती मेहनत, साधना असते, हे तिला कळलं. प्रत्येकच प्रयोग एक आव्हान असतो, याचीही जाणीव झाली. तालमी सुरू असताना प्रशांत दामले, कविता लाड-मेढेकर यांनी बारीकसारीक बाबी तिला शिकवल्या. रंगमंचावर चालायचं कसं, देहबोली कशी असावी, महत्त्वाचा घटक असलेल्या आवाजाचा कसा वापर करायचा, यांबाबत तिला अवगत करून दिलं. ‘झेड लाइनपर्यंत असलेल्या प्रेक्षकांजवळ आपला आवाज पोहोचायला हवा’, हे प्रशांत सरांचं वाक्य म्हणजे एक मोठीच शिकवण आहे, असं राजसी सांगते. मराठी रंगभूमीवरचा हुकमी एक्का असलेले प्रशांत दामले यांच्या सहवासात असणंच ऊर्जेने परिपूर्ण असतं. प्रचंड एनर्जी आहे त्यांच्यात, असंही ती नमूद करते.
========
हे देखील वाचा : देवेंद्र दोडकेंनी गाजविला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
========
प्रेक्षक खेचणारा कंटेंट हवा…
सध्या ओटीटीचा जमाना आहे, असं म्हटलं जातं. अशावेळी नाटक अन् मोठा पडदा अर्थात सिनेमाचं भवितव्य काय, असं विचारलं असता राजसी सांगते, ‘माध्यम कुठलंही असो. सर्वात महत्त्वाचा असतो तो कंटेंट. तो गर्दी खेचणारा असला पाहिजे. ओटीटीमुळे नाटक, सिनेमाचं नुकसान होतंय, हे पूर्णत: खरं नाही. कारण, कित्येक नाटकं अन् सिनेमे आजही चिक्कार गर्दी खेचत आहेत. फक्त कंटेंट तसा हवा.’
सध्या राजसीनं (Rajsi Chitnis) नाटक या माध्यमावरच लक्ष केंद्रित केलं आहे. आधी इथं शिकून घ्यायचं, पुढचं पुढं पाहू, असं तिचं म्हणणं आहे. चांगल्या कथेचा अन् चांगल्या दिग्दर्शकासोबत सिनेमा करायला नक्कीच आवडेल. मात्र, सध्या तरी रंगभूमीवरच वावरायचंय, असं ती नमूद करते. काहीतरी सांगून जाणाऱ्या गंभीर भूमिका तिला साकारायच्या आहेत. कविता लाड-मेढेकर, मुक्ता बर्वे या अभिनेत्रींचा तिच्यावर विशेष प्रभाव आहे.
कमालीची नम्र आणि जमिनीवर असलेली राजसी अभिनयात सरस आहेच. तिची भाषा, वक्तृत्वकलाही उत्तम आहे. रंगभूमीच्या वाटेवरून अभिनयाच्या आसमंतात झेपावण्यासाठी सज्ज झालेली ही गुणी कलावंत हे क्षेत्र काबीज करेल, यात शंकाच नाही.