‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
राकेश रोशन यांचे ‘क’शी नाते
राकेश रोशन म्हणजे बॉलिवूड सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…! अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात नाव कमावणाऱ्या राकेश रोशन यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा बॉलिवूड प्रवास, आयुष्यातील चढ-उतार आणि मिळवलेले यश यांचा हा थोडक्यात आढावा..
राकेश रोशन यांनी १९७० मधील ‘घर घर की कहानी’ या चित्रपटापासून आपल्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात केली. परंतु अभिनयक्षेत्रात त्यांना काही यश मिळाले नाही. म्हणून आपणच चित्रपटांची निर्मिती करूया, असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले. १९८० मध्ये त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली आणि पहिला चित्रपट आला ‘आपके दिवाने’. निर्मितीसोबतच त्यांनी आपल्या चित्रपटात अभिनयदेखील केला; परंतु अभिनयापेक्षा निर्मितीसाठी त्यांना जास्त नावाजले गेले. आपके दिवाने तर फ्लॉप ठरला, पण त्यानंतर आलेला ‘काम चोर’ बराच हिट झाला..!
निर्मिती क्षेत्रातही आपण हवे ते प्राप्त करू शकत नाही आहोत, ही खंत राकेश रोशन यांना त्रास देत होती. चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शकाची भूमिका ही मध्यवर्ती असते, हे लक्षात घेऊन त्यांनी खुदगर्ज या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले. हळूहळू निर्मिती आणि दिग्दर्शन या दोन्ही कलांनी राकेश रोशन यांना चित्रपटसृष्टीतील कुशलता मिळवून दिली.
राकेश रोशन यांचे सर्वाधिक चित्रपट ‘क’ (K) या अक्षरापासून सुरू होतात, हे आपण ऐकून आहोत. पण यामागे नक्की काय कारण असेल बरं? चला तर मग जाणून घेऊयात ‘क’ अक्षरामागची स्टोरी! १९८२ मध्ये ‘कामचोर’ हा राकेश रोशन यांचा चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता. यानंतर १९८४ मध्ये त्यांनी ‘जाग उठा इन्सान’ नावाचा चित्रपट बनवला. हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. १९८६ मध्ये त्यांनी ‘भगवान दादा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. राकेश यांचे सासरे ‘जे ओम प्रकाश’ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित देखील केला. या चित्रपटात रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती, तसेच ऋतिक रोशनचे बालकलाकार म्हणून पदार्पण होते. चित्रपट लाँच झाल्यावर राकेश रोशन यांच्या चाहत्यांनी पत्रव्यवहारांद्वारे K या इंग्रजी या अक्षरापासून तुम्ही चित्रपटांची नावे ठेवावीत, म्हणजे चित्रपट खूप चालतील, असे सुचवत ‘कामचोर’ चित्रपटाचे उदाहरण दिले. परंतु लोकांच्या सल्ल्याकडे राकेश रोशन यांनी फारसे लक्ष दिले नाही! भगवानदादा या नावानेच चित्रपट रिलीज केला आणि दुर्दैवाने हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला. अपयशाने खचून न जाता राकेश रोशन यांनी चाहत्यांनी दिलेला सल्ला आजमावण्याचे ठरवले आणि १९८७ मध्ये खुदगर्ज चित्रपटाची निर्मिती केली. या फिल्मने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली. आता हा योगायोग म्हणायचा की आणखी काही? तेव्हापासून राकेश रोशन यांनी के या अक्षराची साथ कधीच सोडली नाही. या अक्षरामुळे त्यांना मिळालेला ‘फेम’ आजही टिकून आहे.
खून भरी मांग, कालाबाजार, किशन कन्हैया आणि करण अर्जुन अशा भरघोस यश मिळवणार्या चित्रपटांचा विक्रम राकेश रोशन यांच्या नावावर आहे. कालांतराने आपला मुलगा ऋतिक रोशन याच्या पदार्पणासाठी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला कहोना प्यार है (२०००) हा चित्रपट तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटाने त्या वर्षीची सर्वाधिक कमाई तर केलीच, त्याबरोबरच अनेक पुरस्कारही पटकावले. त्यानंतर २००३ मधला कोई मिल गया असो वा २००६ मधला क्रिश, १९८७ पासून ‘के’ अक्षराची साथ त्यांनी कधीच सोडली नाही! २०२० च्या डिसेंबर मध्ये क्रिश चित्रपटाचा चौथा भाग येण्याच्या मार्गावर आहे. के अक्षराची महती आजही काम करते का, हे आता लवकरच कळेल!
बॉलीवूड सृष्टीकडे तरुणाईचे लक्ष वेधून घेणारे चित्रपट बनवणाऱ्या आणि स्वतःच्या निर्मिती कंपनीमार्फत बॉलिवूडला नवीन आणि यंग चेहरा देणाऱ्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेते – दिग्दर्शक – निर्माते राकेश रोशन यांना कलाकृती मीडियातर्फे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- सोनल सुर्वे