Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या

राम कदम यांनी रात्रभर बसून ‘या’ गाण्याला चाल लावली !
सत्तरच्या दशकातील ज्या मराठी चित्रपटाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता आणि ज्या चित्रपटामुळे मराठी सिनेमाने खऱ्या अर्थाने कात टाकली आणि मराठी सिनेमाला पुनर्जन्म दिला तो चित्रपट म्हणजे व्ही शांताराम यांचा पिंजरा ! ‘पिंजरा’ या चित्रपटापासून मराठी सिनेमा रंगीत सप्तरंगात न्हाऊ लागला. त्यापूर्वी शांताराम बापूंच्या ‘इये मराठीची नगरी’ हा १९६५ साली आलेला चित्रपट मराठीतील पहिला रंगीत चित्रपट होता. पण ‘पिंजरा’ पासून मराठीत रंगीत सिनेमाचे पर्व सुरू झाले. या चित्रपटाबद्दल आजपर्यंत खूप काही लिहून आलं आहे. मराठी चित्रपटातील ‘शोले’ असं या सिनेमाचं वर्णन करावे लागेल. एक क्लासिक मूवी म्हणून आजही आपण या सिनेमाकडे बघतो. चित्रपती शांताराम बापू खूप शिस्तीचे आणि पूर्णपणे समाधान होईपर्यंत अव्याहत पणे काम करणारे दिग्दर्शक होते. यातील एकेका गाण्यासाठी संगीतकार राम कदम यांनी अक्षरशः दहा- दहा चाली लावल्या होत्या. त्याचप्रमाणे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी देखील एकेका गाण्यासाठी वीस वीस कडवी लिहिली होती. शांताराम बापूंचे समाधान होईपर्यंत गीतकार आणि संगीतकार दोघेही अक्षरशः राब राब राबत होते. उगाच नाही आपण पन्नास वर्षे झाली तरी ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रत्येक गाण्याचे शब्द त्यातील म्युझिक पिसेस सहित आपल्याला पाठ आहेत! यामागे या सर्व टीमची प्रचंड मेहनत होती हे लक्षात येते. (Ram Kadam)

या चित्रपटात ‘देरे कान्हा चोळी लुगडी…’ हे लता मंगेशकर यांनी रागात गायलेले गीत होते. या गाण्याच्या निर्मितीचा किस्सा भन्नाट आहे. शांताराम बापूंनी सिच्युएशन सांगितली. गीतकार जगदीश खेबुडकर गाणे लिहायला बसले. पण बापूंचे काही केल्या समाधान होत नव्हतं. त्यांनी तब्बल १६ गाणी नापसंत केली. शेवटी सतरावे गाणे जेव्हा खेबुडकर यांनी बापूंच्या हातात ठेवले त्या वेळेला बापूंचे डोळे चमकले. त्यांना हेच गाणे हवे होते. गाणं फायनल झालं. बापूंनी गाण्याचा कागद राम कदम यांच्याकडे सरकवला. नंतर संगीतकार राम कदम (Ram Kadam) यांची परीक्षा सुरू झाली. दिवसभर ते बापूंना वेगवेगळ्या चाली ऐकवत होते पण बापूंना त्यातील एकही आवडत नव्हती. दिवसभर काम करून ते कंटाळले.
शेवटी संगीतकार राम कदम (Ram Kadam) वैतागले ते शांताराम बापूंना म्हणाले,” मला तुम्ही पुण्याचे तिकीट काढून द्या. मी पुण्याला जातो.” बापूंनी लगेच राम कदम यांच्यासाठी पुण्याचे रिटर्न तिकीट काढून दिले. राम कदम संध्याकाळी डेक्कन क्वीनमध्ये बसले. संपूर्ण प्रवासात त्यांच्या डोक्यात तेच गाणे होते. काही केल्या चाल सापडत नाही. काय करावे? राम कदम अक्षरशः वैतागले होते इतकं कुठल्याच गाण्याने त्यांना थकवलं नव्हतं. स्वत: वर चिडले होते. शेवटी खडकी स्टेशन आले. राम कदम यांनी डोळे मिटून घेतले आणि मनातल्या मनात आपल्या गुरूंची आराधना केली. ते म्हणाले,” खान साहेब, मुझे माफ कीजिए. मै आपका काबील शागीर्द नही बन सका. मैने आपके नाम को धब्बा लगाया.” इतकं म्हटल्यानंतर त्यांना तंद्री लागली आणि गुरुने जणू त्यांच्या कानात आशीर्वाद देत चाल सांगितली आणि म्हणाले,”हा स्वर घे आणि बांध चाल.” थोड्यावेळाने राम कदम यांना जाग आली तेव्हा गाडी पुण्याला पोहोचली होती. राम कदम (Ram Kadam) गाडीतून उतरलेच नाही. पुढे ती गाडी यार्डात गेली. तरी राम कदम गाडीतच बसून राहिले. आपल्या गुरूंचे खान साहेबांचे ‘गोपाला मेरी करुणा…’ चे स्वर त्यांच्या कानात गुंजारव करू लागले होते. त्यांच्या चित्तवृत्ती एकदम जागा झाल्या आणि त्यांनी त्या सुरावटीवर गाण्याला चाल लावली.‘देरे कान्हा चोळी अन लुगडी…’ पिलू रागावर ही चाल बांधली. रात्रभर ते डेक्कन क्वीनच्या अंधाऱ्या डब्यामध्ये यार्डात बसून होते आणि कागदावर ते नोटेशन लिहित होते!
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच डेक्कन क्वीनने ते मुंबईला निघाले. बापूंनी त्यांना रिटर्न तिकीट दिले होतेच. मुंबईला राजकमलला गेल्यानंतर बापूंना त्यांनी ही ३९वी चाल ऐकवली आणि बापूच्या चेहऱ्यावर पसंतीची मोहर उमटली ते फार खुश झाले ते म्हणाले,” राम आपण हे गाणं लता कडून घेऊया.” त्यावर राम कदम म्हणाले,” ठीक आहे चालेल. पण लतादीदीला मात्र फोन तुम्हीच करा.” या गाण्याच्या रिहर्सलसाठी ख्यातनाम लोकांना पाचारण करण्यात आले. बासरीसाठी हरिप्रसाद चौरसिया, संतूरसाठी शिवकुमार शर्मा, वादक इनॉक डॅनियल आणि वायब्रो फोनसाठी केरसी लॉर्ड ! शांताराम बापूंनी लता मंगेशकरला विचारून एक तारीख निश्चित केली आणि राम कदम यांना तसे सांगितले. पण रामभाऊ म्हणाले,” अहो, त्या दिवशी मला मिरजेला जायचे आहे तिथे आमच्या दर्ग्यामध्ये उरूस असतो आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा उरूस चुकवत नाही. मला जाणे गरजेचे आहे.” बापूंना राम कदम (Ram Kadam) यांचे हे बोलणे रुचले नाही. ते म्हणाले,” लता मंगेशकर पुढच्या दोन महिन्यासाठी परदेशात जाणार आहेत. त्यामुळे रेकॉर्डिंग याच दिवशी करावे लागेल.” राम कदम यांनी हर तऱ्हेने समजावून सांगितले पण बापू ऐकायला तयार नव्हते. शेवटी शांताराम बापू चिडले आणि म्हणाले,” तुला मिरजेला जायचे असेल तर जा. पण जाताना तुझा सगळा हिशोब पूर्ण करून पैसे घेऊन जा. पुन्हा परत यायची गरज नाही!” त्याप्रमाणे संगीतकार राम कदम यांचा संपूर्ण हिशेब बापूंनी पूर्ण केला आणि त्यांची रवानगी केली. राम कदम यांना वाटले आता हे गाणे ते वसंत देसाई यांच्याकडून ते स्वरबद्ध करून घेतील.
==========
हे देखील वाचा : चक्क ‘या’ अभिनेत्रीने गायले बंगाली भाषेत गाणे
==========
ते निश्चिंत मनाने मिरजेला आपल्या मुलांना आणि पत्नीला घेऊन गेले आणि पुन्हा पुण्यात आले. आता राजकमलला जाण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण सर्व हिशोब पूर्ण झाला होता. परंतु घरी आल्या आल्या त्यांना एक तार मिळाली. ही तार शांताराम बापूंचे पुत्र किरण शांताराम यांनी केली होती. त्यात लिहिले होते,” ताबडतोब मुंबईला या.” राम कदम (Ram Kadam) दुसऱ्या दिवशी मुंबईला राजकमलमध्ये गेले. तेव्हा त्यांना त्याचा उलगडा झाला. लता मंगेशकर यांचे परदेश जाण्याचा दौरा पुढे ढकलला गेला होता. त्यामुळे त्या गाण्याची रेकॉर्डिंग झालेच नव्हते. दुसऱ्या दिवशी राजकमलच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. पिल्लू रागावरील ‘देरे कान्हा चोळी अन लुगडी…’ हे गाणे रेकॉर्ड झाले आणि मागच्या पन्नास वर्षापासून मराठी रसिकांची ते आवडते गीत बनले आहे. राम कदम यांच्याकडे लता मंगेशकर यांनी अतिशय कमी गाणी गायली. त्यातील सर्वात लोकप्रिय हेच गाणे ठरले. मधू पोतदार यांनी त्यांच्या संगीतकार राम कदम या पुस्तकात ही आठवण सांगितली आहे.