सावरकरांचं चरित्र दाखवण्यात रणदीप हुड्डा यशस्वी ?
गांधीजींवर आजवर कित्येक चित्रपट आले आहेत. अगदी बेन किंग्सले यांच्या ‘गांधी’पासून राजकुमार हिरानी व संजय दत्त यांच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’पर्यंत लांब लचक यादी होईल, इतकंच काय तर मध्यंतरी राजकुमार संतोषी यांच्या बाळबोध आणि हास्यास्पद अशा ‘गांधी विरुद्ध गोडसे’मध्येसुद्धा गांधीजींचाच गवगवा पाहायला मिळतो. परंतु सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्यानंतर तब्बल २३ वर्षांनी हरियाणामधून आलेल्या एका अभिनेत्याला विनायक दामोदर सावरकर (Savarkar) यांच्यावर एखादा चित्रपट काढावासा वाटणं हीच फार कौतुकाची बाब आहे. हरियाणामधल्या एका कलाकाराकडे ही भूमिका जाते अन् त्यातून तो प्रेरणा घेतो, हे शिवधनुष्य पेलतो अन् त्याच्या ह्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या चित्रपटासाठी तिकीटबारीवर गर्दी करतात यावरुन रणदीपने त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Savarkar) या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचा अंदाज आपल्याला येतो.
सावरकर (Savarkar) मोठ्या पडद्यावर साकारणे म्हणजे धगधगता निखारा हाती घेऊन चालण्यासारखंच आहे. कारण त्यांचे विचार, त्यांची विज्ञाननिष्ठता हे सगळं ऐकायला, वाचायला फार छान वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवणे आजच्या पिढीलाही शक्यनाही. रणदीपनेही कुठेही त्यांचेच विचार हे सर्वश्रेष्ठ आहेत हे सांगायचा अट्टहास केलेला नाही, त्याने केवळ आजवर इतिहासात कधीही न सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी फक्त लोकांपुढे मांडल्या आहेत. नक्कीच काही बाबतीत त्याने कलात्मक स्वातंत्र्य घेतलं आहे, पण हा एक चित्रपट आहे अन् जसं आपण तान्हाजी अन् बाजीराव पेशवा यांना थिरकताना किंवा काशीबाई व मस्तानी यांना पिंगा घालताना अगदी चवीने पाहिलं आहे, त्यापुढे हुड्डाने घेतलेलं कलात्मक स्वातंत्र्य हे अत्यंत किरकोळ आणि सहज पचणारं आहे.
“अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला सांगितलं गेलं आहे पण ही ती गोष्ट नव्हे” याच स्टेटमेंटवर हा चित्रपट ठाम राहतो अन् त्याच पद्धतीने कथानकही आपल्यासमोर उलगडले जाते. प्लेगच्या महामारीनंतर ब्रिटिश राजवटीचे अत्याचार पाहून सशस्त्र क्रांतीचा विडा उचलणाऱ्या लहानग्या विनायक सावरकरपासून (Savarkar) चित्रपटाची सुरुवात होते अन् हळूहळू हा प्रवास आपल्यासमोर उलगडला जातो. सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंगरासारख्या क्रांतिकारकांच्या योगदानावर चित्रपटातून विशेष भाष्य करण्यात आलं आहे अन् ते सादर करण्याची हुड्डाची पद्धतही प्रभावशाली आहे.
सशस्त्र क्रांतिचा विचार हा सावरकरांनी (Savarkar) यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकातून जरी मांडला असला तरी या विचाराला अशाच क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानाच्या माध्यमातून साऱ्या देशभरात पोहोचवलं. खरंतर सावरकर म्हंटलं की काळापाणी, जहाजातून मारलेली उडी अन् कोल्हू अशा काही मोजक्या गोष्टीच आपल्यासमोर येतात, पण त्याहीपलीकडे जाऊन सावरकरांचं व्यक्तिमत्व हे विशाल महासागराप्रमाणे आहे हे रणदीपने या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलं आहे. खासकरून सशस्त्र क्रांतिच्या वाटेवर चालणाऱ्या क्रांतीकारकांनी दिलेलं बलिदान अन् त्यांच्या या शौर्याला ‘भित्रे’ म्हणून हिणवणाऱ्या तत्कालीन कॉंग्रेसच्या विचारसरणीवर रणदीपने अत्यंत बेधडकपणे ताशेरे ओढले आहेत.
याबरोबरच जहाल गट आणि मवाळ गट यांच्यातील द्वंद्व, सावरकर (Savarkar) आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक मतभेद, हिंदुत्व आणि त्याची परिभाषा, इंग्लंडमध्ये राहून एक पुस्तक लिहून अखंड भारतात पेटवलेली क्रांतीची मशाल या सगळ्या गोष्टी अत्यंत सविस्तरपणे अन् कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता रणदीप हुड्डाने पडद्यावर मांडल्या आहेत. संवाद, पटकथेच्या माध्यमातून रणदीपने सावरकर (Savarkar) यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी उत्कृष्टपणे सादर केल्या आहेत. मुलाच्या निधनाची बातमी कळताच ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताच्या माध्यमातून लंडनमधील सावरकरांच्या मनातील घालमेल असो किंवा काळापाणीदरम्यान त्यांनी सोसलेल्या यातना. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत रणदीपने उत्तमरित्या पोहोचवल्या आहेत. थेट प्रेक्षकांशी संवाद साधत (ज्याला सिनेमाच्या परिभाषेत थर्ड वॉल ब्रेक करणे म्हणतात) त्याने बऱ्याच गोष्टी लोकांच्या मनात बेमालुमपणे पेरल्या आहेत.
कथा, संवाद अन् सादरीकरणाच्या बाबतीत तर हा चित्रपट उजवा ठरतोच, पण त्याहूनही अंदमानमधून बाहेर पडलेल्या सावरकरांच्या (Savarkar) जीवनावर टाकलेला प्रकाश, त्यांचं प्रखर हिंदुत्व, वर्णभेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, पतितपावन मंदिराचा जीर्णोद्धार, गांधी नेहरू अन् तत्कालीन कॉंग्रेसबद्दलचे त्यांचे विचार, अशा वेगवेगळ्या गोष्टी रणदीपने पटकथेच्या माध्यमातून अधोरेखित केल्या आहेत. याबरोबरच त्यांनी लिहिलेल्या दयेच्या याचिका अन् त्यावरून उठणारा गदारोळ यावरही त्याने हुशारीने भाष्य करत त्यामागील नेमकं सत्य लोकांपुढे मांडायचा प्रयत्न केला आहे.
अभिनयाच्या बाबतीत तर रणदीप नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोच पण यावेळी त्याने अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन अन् निर्मिती अशा तीनही भूमिकांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. खासकरून लेखनाच्या बाबतीत रणदीपला पैकीच्या पैकी गुण द्यावेत इतके त्याने या चित्रपटाचे लिखाण उत्तम केले आहे. खासकरून हिंदुत्वाची व्याख्या, गांधीजींबरोबरचे सावरकरांचे (Savarkar) संभाषण अन् अंदमानमधून बाहेर आल्यावर सावरकरांचे भारताच्या राजकारणातील योगदान या सगळ्या मुद्द्यांवर अतिशय बेधडकपणे रणदीपने भाष्य केले आहे. सावरकर एक फक्त क्रांतिकारक म्हणूनच नव्हे तर एक पती व पिता म्हणून तसेच एक विद्यार्थी म्हणून अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून कसे होते हे सगळे पैलू रणदीपने या चित्रपटातून दाखवले आहेत.
दिग्दर्शक म्हणूनही रणदीपने उत्तम कामगिरी केली आहे. काहींच्या मते मध्यंतरानंतरचे काळापाणीचे चित्रण हे थोडे लांबले गेल्याने चित्रपटातील उत्सुकता कमी होते, पण सावरकरांना (Savarkar) दोन जन्मठेपेच्या शिक्षा लागोपाठ सूनवल्या गेल्या होत्या त्यामुळे तो प्रवास दाखवताना रणदीपने घेतलेला वेळ हा योग्य होता असं प्रकर्षाने ते पाहताना जाणवतं. दिग्दर्शक म्हणून रणदीपचा पहिलाच प्रयत्न अन् त्यातूनही सावरकरांसारखा (Savarkar) धगधगता निखारा हाती घेऊन चालणं म्हणजे खाऊच काम नाही, त्यामुळे यासाठी रणदीपचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
हे देखील वाचा : ‘दास्तान’ पिक्चर फ्लाॅप नि गाडी हिट असा
चित्रपटाचं पार्श्वसंगीत, छायाचित्रण, हे सगळं कथेला साजेसं अन् त्यातील नाट्य गडद करणारंच आहे. खासकरून यात वापरलेली मोजकी गाणी ही प्रेक्षकांवर छाप सोडणारी आहेत. सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेल्या अमानुष मारहाणीनंतर रणदीप हुड्डाचं रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या सेलमध्ये परतताना कानावार पडणारं ‘वंदे मातरम’ हे गाणं तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. अभिनयाच्या बाबतीत रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल यांची कामं चोख झालीच आहेत. याबरोबरच इतरही सहकलाकारांची कामंही उत्तम झाली आहेत. कास्टिंगच्या बाबतीतही या चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. खासकरून महात्मा गांधींची भूमिका साकारणारे राजेश खेरा, मदनलाल धिंगरा यांची भूमिका साकारणारा मृणल दत्त यांची कामं लक्षात राहणारी आहेत.
एकूणच सावरकर (Savarkar) vयांच्या जीवनावर बेतलेला, अत्यंत अभ्यासपूर्ण अन् कोणताही आडपडदा न ठेवता आजवर कधीही समोर न आलेला इतिहास मांडणारा हा एक परिपूर्ण चित्रपट आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहायचा ‘दृष्टिकोन’ हा किती महत्त्वाचा असतो अन् हाच ‘दृष्टिकोन’ राष्ट्र घडवायला अन् त्याचे विभाजन व्हायलाही कसा कारणीभूत असतो हे रणदीपने सावरकरांच्या माध्यमातून स्पष्टपणे मांडलं आहे. प्रोपगंडा चित्रपट म्हणून सतत हिणवलं जात असतानाही रणदीप आज प्रत्येक चॅनलवरील मुलाखतीमध्ये अत्यंत शांत आणि हसऱ्या चेहेऱ्याने लोकांचे गैरसमज दूर करू पाहताना दिसत आहे. मुख्य प्रवाहातील सिनेमासाठी अन् विशेषकरून बॉलिवूडसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. विनायक दामोदर सावरकर (Savarkar) हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून त्यांना अखंड हिंदुस्तानच्या नायकाप्रमाणे साऱ्या जगासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न रणदीप हुड्डाने केला आहे.