रंगीलाबद्दल पडद्यामागच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का…?
बॉलिवूडच्या रोमॅंटिक कॉमेडीमधला अतिशय वेगळ्या वळणावरचा चित्रपट म्हणजे रंगीला.(Rangeela) नव्वदच्या दशकातील या चित्रपटाने खूप सा-या गोष्टी बदलल्या. रंगीला हा तसा तद्दन फिल्मी कॅटेगरीतला चित्रपट. चित्रपटाची कथाच फिल्म लाईन भोवती फिरत असल्याने त्यात ब-यापैकी फिल्मी गोष्टी भरलेल्या असणं स्वाभाविक होतं. पण राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने हा फिल्मीपणा हटके स्टाईलमध्ये मांडला.
‘विन द डेट विथ टॅड हॅमिल्टन’ या चित्रपटावर रंगीलाची कथा प्रेरीत होती. वास्तविक हा चित्रपट टपोरी मुन्नाभोवती फिरतो. रंगीला हे शीर्षक नायकाच्या व्यक्तिमत्वासाठी निश्चित करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात प्रेक्षकांनी नायक आमिर खान ऐवजी उर्मिला मातोंडकरला झुकते माप दिले. नकळत हा चित्रपट नायिकेचा झाला. वास्तविक आमिर खानने टपोरी मुन्नाच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. तो स्वतः स्लममध्ये जाऊन टपोरी लोकांसोबत राहिला होता. त्यांची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न त्याने केला.
उर्मिला (Urmila Matondkar) ही दिग्दर्शकाची पहिली निवड नव्हती. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या डोक्यात श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित यांना घेण्याचा विचार होता. पण तेलुगु चित्रपट ‘गायम्’ मध्ये त्यांनी उर्मिलाचं नृत्य कौशल्य पाहिलं आणि मिनीची भूमिका उर्मिलाकडे आली. या चित्रपटाच्या निमित्ताने ए.आर.रहमान यांचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण झालं. या चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट ठरली. पण आमिर खान (Aamir Khan) आणि या चित्रपटातील गाणी गाणा-या आशा भोसले (Asha Bhosale) या दोघांनाही प्रथमदर्शनी ही गाणी फारशी आवडली नव्हती.
या चित्रपटातील ‘तनहा तनहा यहाँ पे जीना’ गाण्याची कोरीओग्राफी सरोज खान (Saroj Khan) यांनी केली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना ती फारशी न आवडल्याने त्यांनी अहमद खान यांना कोरीओग्राफीसाठी आणलं. चित्रपटाचा कपडेपट नीता लुल्ला सांभाळणार होत्या पण शुटिंगसाठी हैदराबादला ये जा करणे त्यांना शक्य नसल्याने त्यांनी ते काम आपल्या असिस्टंटला दिले. हा असिस्टंट डिझायनर म्हणजे मनीष मल्होत्रा. रंगीला हा त्याचा डिझायनर म्हणून पहिला चित्रपट.
या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खानला पुरस्काराची अपेक्षा होती. या चित्रपटाने ७ फिल्मफेअर (Filmfare Awards) पुरस्कार जिंकले. मात्र आमिरला हा पुरस्कार मिळाला नाही. त्याआधी ‘जो जिता वही सिकंदर’, ‘ हम है राही प्यार के’ या चित्रपटातील भूमिकांसाठी आमिरचे नामांकन झाले होते पण पुरस्काराने हुलकावणी दिली होती. रंगीलाच्या बाबतीत परत तेच घडल्यावर आमिर खानने पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावणं बंद केलं.
रंगीला बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. उर्मिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. आमिर अशाही भूमिका करु शकतो याची नव्याने जाणीव झाली. आशा भोसले यांच्या कारकीर्दीला नव्याने गती मिळाली. अशा खूप सा-या गोष्टी नव्याने या चित्रपटाबाबत घडल्या. आणि त्यामुळे नव्वदच्या दशकातील एक खराखुरा रंगीबेरंगी चित्रपट म्हणून ‘रंगीला’ लक्षात राहतो.
=====
हे नक्की वाचा: राम गोपाल वर्मा: आशिक-ऐ-फिल्ममेकिंग
=====
हे नक्की वाचा: उर्मिला मातोंडकर आणि बरंच काही
=====