Sagar Karande : पोस्ट लाईक्सच्या नादात सागरला ६१ लाखांचा गंडा!

रत्नाकर मतकरी ही एक संस्था होती… या संस्थेच्या मुशीत अनेक कलाकार घडले… अनेक साहित्यिक घडले
मराठी साहित्यावर ज्यानं मनापासून प्रेम केलं. आणि या साहित्याला संपन्न केलं असं नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. या माणसानं साहित्याच्या क्षेत्राचा कुठलाही कोन बाकी ठेवला नाही. एखाद्या स्वच्छंद्यासारखा त्यांचा वावर होता. लहान मुलांना त्यांनी हसवले नव्हे मराठी साहित्याची गोडी लावली. तर मोठ्यांना या माणसाने भुलवले.कधी अंगावर काटा येईल तर कधी भरभरून हसवून जाईल असे रत्नाकरींचे कार्य. लेखन. महाराष्ट्राच्या साहित्यातील रत्न म्हणूनच त्यांचा उल्लेख करायला हवा. हा माणूस फक्त साहित्यात रमला असं नव्हे तर समाजातील प्रत्येक घडामोडींचा घटक झाला. चळवळींमध्ये सहभाग घेतला. ज्या मुलांना नाटक म्हणजे काय हे माहित नव्हते, अशा मुलांना नाटकाच्या चळवळीमध्ये आणलं. एकूण रत्नाकर मतकरी ही एक संस्था होती. या संस्थेच्या मुशीत अनेक कलाकार घडले. अनेक साहित्यिक घडले. अचानक कुठला तरी रोग आला आणि मतकरींना आमच्यापासून दूर घेऊन गेला. खरंतर हे सर्व मतकरींच्या कथेसारखं. आज जर ते असते तर या कोरोनावर नक्कीच एखादी गूढ कादंबरी लिहीली असती. पण दुर्दैवानं या कोरोनानं आमचा हक्काचा माणूस दूर नेला.
रत्नाकर मतकरी हे बाप माणूसच का तर त्यांचे विपूल साहित्य किती आहे याची यादी बघितली तर नक्की समजेल. 32 नाटकं, 23 हून अधिक कथासंग्रह, 6 निबंध संग्रह, 16 एकांकिका, 12 बाल नाटकं, आणि कांदंब-या. इतक्या सगळ्या साहित्याची मतकरी यांच्या नावावर नोंद आहे. याशिवाय मतकरी रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता, चित्रकार देखील होते. महाराष्ट्रात आज बालरंगभूमी समृध्द आहे. या बालरंगभूमीची मुहूर्तमेढ मतकरी यांनी रोवली. बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवतांना त्यांनी समाजात ज्या घटकांकडे उपेक्षित म्हणून पाहिले गेले, त्याच घटकातील मुलांना सोबत घेतले.स्वतःचे पैसे खर्च करुन त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना नाटक शिकवलं. दूरदर्शन ची जेव्हा जनमानसाला ओळख होत होती, तेव्हा मतकरींनी ‘गजरा’ आणि ‘शरदाचे चांदणे’ यासारख्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्कालीन परिस्थिती, राजकीय धागेदेरे, सर्वसामान्य माणसांची मनस्थिती या सर्वांचा मेळ यात असायचा. प्रत्येकाला आपलीच वाटेल अशी कथा असायची. त्यामुळे या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून रत्नाकर मतकरी ख-याअर्थांनं लिहिते झाले. म्हणजे त्यांच्या लेखनाची ओळख चाहत्यांना होऊ लागली. 1955 साली त्यांनी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली. ही एकांकिका मुंबई आकाशवाणीवर सादर झाली. त्यांनंतर त्यांची लेखणी चौफेर फिरली. आणि त्यासोबत वाचकही फिरत राहिले. अॅडम, अंतर्बाह्य, अपरात्र कथासंग्रह आले. महाभारतावर आधारीत आरण्यक हे नाटक आलं. या नाटकावरील पुस्तकही आहे. त्याला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे. आरण्यक म्हणजे नाटकामध्ये किती प्रयोग होऊ शकतात याचा नमुना आहे. कथा, संवाद प्रभावी असतील तर नाटक यशस्वी होण्यासाठी मोठ्या सेटची गरज नसते. हे आरण्यकने दाखवून दिले. गांधारी, कुंती, विदूर आणि धृतराष्ट्र या ज्येष्ठांची महाभारताच्या युद्धानंतरची मानसिकता काय असेल ते या आरण्यकामध्ये मतकरींनी अचूक टिपलं… आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवलं… यासोबत अजून यौवनात मी, आम्हाला वेगळं व्हायचंय, इंदिरा, एकदा पाहावं करुन, जावई माझा भला, खोल खोल पाणी, घर तिघांचं हवं, दादाची गर्लफ्रेंड, जादू तेरी नजर, तन-मन, प्रियतमा, शू…कुठं बोलायचं नाही…ही त्यांची नाटकंही चांगलीच गाजली.
मतकरी यांचं नाव कायम एका साहित्यप्रकारासाठी घेतलं जाणार… ते म्हणजे गूढकथा… त्यांनी गूढकथांची ओळख करून दिली. त्यांच्या ‘गहिरे पाणी’, ‘खेकडा’, ‘मध्यरात्रीचे पडघम’, ‘निजधाम’ या कथासंग्रहांना वाचकांची पसंती मिळाली. ही पुस्तकं वाचायला एकदा हातात घेतली की, पूर्ण झाल्याशिवाय ठेवायला जीवावर येईल… इकतं गुंतवून ठेवणारी… ‘गहिरे पाणी’ या कथासंग्रहावर आधारित मालिकाही चांगलीच गाजली… याबरोबरच संदेह, कबंध, फाशी बखळ, ऐक… टोले पडताहेत, बाळ अंधार पडला, मृत्यूंजयी, निजधाम… हे गूढ कथासंग्रही त्यांच्या नावावर जमा आहेत. गूढसाहित्याला मतकरींनी नव्याने ओळख करुन दिली. बालसाहित्याचे तर ते आधारस्तंभ होते. गूढसाहित्यात अंगावर काटा आणणारी त्यांची लेखणी बालसाहित्य लिहितांना सहज, सोप्पी आणि हसवणारी होत असे…नअलबत्या गलबत्या हे त्यांचे बालनाटक… आज वैभव मांगले यांनी ते पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणले… याशिवाय निम्मा-शिम्मा राक्षस, आरशाचा राक्षस, आलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर, अचाटगावची अफाट मावशी, एक होता मुलगा, ढगढगोजीचा पाणी प्रताप, धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी, सरदार फाकडोजी वाकडे, माकडा माकडा हुप यासारख्या बालसाहित्यही मतकरी रंगले…या नाटकांची आणि पुस्तकांची शिर्षकं पाहिली तरी त्यातील गम्मत काय असेल याचा अंदाज येतो. त्यांनी ’आपलं महानगर’ या वृत्तपत्रामधून “सोनेरी सावल्या” नावानं स्तंभलेखनही केलं आहे. २००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या बहुआयामी साहित्यिकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार अशा अनेक मान्यवर पुरस्कारांचा समावेश आहे.

साहित्य, नाटक, दिग्दर्शन यामध्ये रमलेले मतकरी समाजभिमूख होते. याचं उदाहरण म्हणजे ‘नर्मदा बचाओ आंदोलन’, ‘निर्भय बनो’ आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.
रत्नाकर मतकरी यांचं जाणं हे चकटा लावण्यासारखं आहे. पण ते आपल्यात नाहीत असं म्हणणंही चुकीचं आहे. रत्नाकर मतकरी हे नाव मराठी साहित्यात कायम राहील… आणि वाचकांना आपल्यात गुंतवून ठेवेल हे नक्की…