सिनेमामधील सिंघमपेक्षा डॅशिंग… रिअल लाईफमधील सिंघम
मनोरंजन आणि छोटा पडदा हे एक अतूट समिकरण होतं. पण स्मार्ट फोनमुळे हे समीकरण मागे पडलं आहे. हाताच्या तळव्यावर रहाणा-या स्मार्ट फोनमुळं मनोरंजनाची संपूर्ण संकल्पनाच बदलली. चालता-बोलता-प्रवास करतांना आपण कधीही आपल्याला आवडलेले कार्यक्रम बघू शकतो. त्यासाठी टीव्ही नावाच्या बॉक्ससमोर बसायची गरज नाही. मग यातूनच वेबसिरीज सुरु झाल्या. टिव्हीवर सादर होणा-या मालिका या कधीही न संपणा-या. वर्ष-दोन वर्ष चालणा-या. या लांबलचक मालिकांपेक्षा छोट्या. पण भरपूर मसालेदार मालिका म्हणून या वेबसिरीजकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षापासून आपल्या देशात या वेबसिरीजचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वाढले. आणि आता तर या लॉकडाऊनच्या काळात बुडत्याला काडीचा आधार, तसेच या वेबसिरीज आपल्या सर्वांना आधार झाल्या आहेत.
या सिरीजमध्ये सध्या बाजी मारली आहे ती ‘भौकाल’ या वेबसिरीजने. उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या एका जांबाज पोलीस अधिका-याची ही सत्य घटना आहे. महत्त्वाचे म्हणजे दहा एपिसोडच्या या वेबसिरीजचे दिग्दर्शक आपले जतीन वागळे आहेत. MX Player वर असलेली भौकाल पहिल्या पाच वेबसिरीजमध्ये आहे.
उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरमधील सत्य घटनेवर ही वेबसिरीज काढण्यात आली आहे. या मुजफ्फरनगरचा उल्लेखच गुन्हेगारांची राजधानी म्हणून केला जायचा. या वेबसिरीजची सुरुवात होतानाच आयजी नवीन सिकेरा या अधिका-याला नेमणुकीचे पत्र देतांना सांगतात. या देशात दोन राजधान्या आहेत. एक देशाची राजधानी दिल्ली, जिथे कायदा बनवला जातो. आणि दुसरी अपराधाची राजधानी मुजफ्फरानगर, जिथे कायदा तोडला जातो. हे पत्र घेऊन हा अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी येतो. गाडीत त्याला हवालदार प्रश्न विचारतो. सर मुजफ्फरनगरला कसे आले. प्रमोशन की डिमोशन. इथूनच या भागातील अपराधांची कल्पना येते. या भागात दोन गॅंगच वर्चस्व आहे. पूर्व भागात महंमद शौकीन खान तर. पश्चिमेत चिंटू आणि पिंटू डेडा. बंदुका हे दोघांचेही आवडते हत्यार. अपहरण आणि मग त्यातून मनमानेल तशी खंडणी. ती मिळाली नाही की हत्या. हे सर्व नित्याचे व्यवहार. नवीन एसएसपी या विरोधात आघाडी उघडतात. मग त्यातून नवीन राजकारण. बळी. पत्रकारांची भूमिका. एकमेकांवर होणारे आरोप. प्रत्यरोप. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी ही कथा. पण ती खरी आहे. युपीमध्ये झालेली.
दिग्दर्शक जतिन यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नवनीत सिकेरा या आयपीएस अधिका-याची ही सत्यघटना आहे. नवनीत सिकेरा यांच्या नावाचा दरारा मोठा. कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी मुजफ्फरनगरची ओळख बदलली. नवनीत सिकरा यांनी आयआयटी रुडकीमधून बीटेक केलं आहे. त्यांच्या वडीलांना पोलीस स्थानकात अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. आपल्यासमोर झालेल्या वडीलांच्या मानहानीमुळे सिकरा युपीएससी झाले. त्यांना आययएस होण्याची संधी होती. पण त्यांनी जाणूनबुजून आयपीएस शाखा निवडली. मध्यंवर्गीय कुटुंबात बालपण गेलेले नवनीत अतिशय हुशार आहेत. पुढे पोलीस अधिकारी म्हणून काम सांभाळतांना त्यांनी एमबीएही केलं आहे. त्यांचं अवघं आयुष्य हे एखाद्या चित्रपटासारखं आहे. ते स्वतः मोटीवेशन स्पिकर आहेत. जे काम करायचं आहे ते मनापासून करा. यश मिळणारच. हे त्यांचं सूत्र आहे. उत्तरप्रदेशात सिंघम म्हणून त्यांची ओळख आहे. तब्बल 55 गुन्हेगारांचं त्यांनी एनकांऊटर केलं आहे. त्यातील अनेकांवर सरकारी बक्षीसही होतं.
या अधिका-यावर भौकाल ही वेबसिरीज आधारीत आहे. पहिल्या सिजनमध्ये दहा भाग आहेत. 30 ते 40 मिनिटांचे हे भाग एक बघितला की दुसरा बघावाच वाटेल इतक्या वास्तवपणे चित्रीत केले आहेत. यात मोहीत रैना याने नवनीत सिकेरा यांची भूमिका केली आहे. मोहीत याने देवोंके देव महादेव यामध्ये शंकराची भूमिका केली होती. मोहीत उरी-द सर्जिकल स्ट्राईकमध्येही डॅशिंग भूमिकेमध्ये दिसला आहे. त्याबरोबरच भौकालमध्ये अभिमन्यु सिंह, सिद्धार्थ कपूर, बिदिता बाग, सनी हिंदुजा, रश्मि राजपूर, प्रदीप नागर, गुलकी जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
ही भौकाल शूट होतांना स्वतः नवनीत सिकेरा यांनी मोहीतला खूप मदत केली. अगदी बंदूक कशी पकडायची हे सुद्धा त्यांनी शिकवले. भौकाल म्हणजे बाहुबली. अचूक भाषा, कथा, कलाकारांची निवड, दिग्दर्शन या जोरावर ही मालिका आता वेबसिरीजमधील बाहुबली ठरली आहे. लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा भौकालला 65 मिलीयन व्हू मिळाले. आता या वेबसिरीजच्या पुढच्या सिजनवर काम सुरु आहे. नवनीत सिकरा यांचे काम एवढे मोठे आहे की भौकालचे चार ते पाच सिजन नक्की पहायला मिळतील.