‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
रिमा लागू… बॉलिवूडची लाडकी, सोज्वळ आई…
नयन ते रिमा…. रिमा ते आई…..
काही व्यक्ती आपल्यातून एवढ्या लवकर का जातात…. कोणास ठाऊक… त्यात जर ही व्यक्ती कायम समोर दिसत असली तर ही चुटपूट अजून अधिक वाटते. असचं एक व्यक्तीमत्व म्हणजे रिमा लागू… अभिनेत्री रिमा लागू… बॉलिवूडची लाडकी, सोज्वळ आई… रिमा आपल्यात असत्या तर आज त्यांनी वयाची साठी पार केली असती. हिंदी चित्रपट सृष्टीची सोज्वळ आई असं रुप आज आपल्याला माहीत आहे. पण या मराठी अभिनेत्रीनं रंगभूमीवरही मोठी कामगिरी बजावली आहे. अनेक आव्हानात्मक भूमिकांवर आपली छाप पाडली आहे. (reema lagoo)
रिमा यांचे माहेरचे नाव नयन भडभडे. त्यांची आई मंदाकीनी भडभडे. त्याही अभिनेत्री. मंदाकीनी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे या मैत्रिणी. त्यामुळे दुर्गा खोटे यांच्या जवळपास डझनभर चित्रपटात गोड चेह-याच्या नयनला बालकलाकारच्या भूमिकेत संधी मिळाली. नयनची आणि अभिनयाची मैत्री इथेच झाली. पुढे त्या मुंबईत दाखल झाल्या. विल्सन कॉलेजमध्ये जाऊ लागल्या. पण सोबत नाटक चालू होतं. रंगभूमीबरोबर आपलं दृढ झालेलं नातं नयनला कळत होतं. पण घरुन शिक्षणासाठी दबाव होता. त्यामुळे नाटकही करेन आणि पदवीही घेईन… पण बाहेरुन परीक्षा देऊन असं वचन त्यांनी घरच्यांना दिलं. आणि पूर्णवेळ नाटकाला वाहून घेतलं. दरम्यान श्याम बेनेगल यांच्या साबणाच्या जाहीरातीमध्ये त्यांना संधी मिळाली. त्याकाळी ही संधी मोठी होती. नयनचा अभिनय विजया मेहता यांच्या नजरेत भरला. विजया मेहता यांच्या ‘पुरुष’ मध्ये त्यांनी रंगवलेली अंबिका आजही लक्षात आहे. त्यानंतर नयनकडे अनेक नाटकांची रांग लागली. सविता दामोदर परांजपे, घर तिघांचं हवं या नाटकातून नयन यांनी स्वतःला सिद्ध केलं. नाटकात त्यांच्या भूमिकांमध्ये अनेक रुपं असायची. कधीही एकाच प्रकारच्या भूमिका त्यांना मिळाल्या नाहीत…. निदान मराठीत तरी…. दरम्यान त्यांना युनियन बॅंकेमध्ये नोकरीही लागली होती. तब्बल नऊ वर्ष ही नोकरी नयन यांनी केली. पण नाटकांचे दौरे आणि शुटींगमुळे त्यांची तारांबळ होत होती. त्यामुळे नोकरीचा राजीनामा दिला. युनियन बॅंकेत कामाला असतांना नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याबरोबर नयन यांची ओळख झाली. ही ओळख प्रेमात आणि नंतर लग्नात रुपांतरीत झाली. लग्नानंतर नयन भडभडेची रिमा लागू झाली. (reema lagoo)
हे लग्न फारसे टिकले नाही. मुलीच्या जन्मानंतर विवेक आणि रिमा वेगळे झाले. पण रिमा यांच्यासोबत लागू हे नाव कायम राहीलं. मुलगी मृण्मयी मोठी झाल्यावर रिमा पुन्हा पडद्याकडे वळल्या. रंगभूमीची शिस्त अंगी मुरलेल्या या अभिनेत्रीला मराठीत पहिली संधी दिली ती जब्बार पटेल यांनी…. सिंहासनमध्ये रिमा राजकारण्याच्या सूनेच्या भूमिकेत दिलसी… ठसठशीत नथ, कोल्हापूरी साज घातलेल्या रिमा तेव्हा कमालीच्या लोभस वाटल्या. हिंदीमध्ये कलयुग या चित्रपटामधून त्यांना दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी संधी दिली. आक्रोशमध्ये त्यांनी नृत्यांगनेची भूमिका केली. त्यानंतर रिमा यांना कयामत से कयामत तक या चित्रपटात जुही चावलाच्या आईच्या भूमिकेत दिसल्या. हा चित्रपट सुपर हीट ठरला. आणि सोबत रिमा यांची आईची भूमिकाही…. ही आईची भूमिका तेव्हापासून त्यांना लागू झाली. मग माधुरी, श्रीदेवी, उर्मिला, सलमान, संजय दत्त सारख्या सुपरस्टारच्या आईच्या भूमिकेत त्या दिसल्या. राजश्री प्रोडक्शनच्या प्रत्येक चित्रपटात तर रिमाच आई दिसणार हे नक्की होतं. सलमान खान यांची पडद्यावरची आई म्हणून त्यांची ओळख झाली. (reema lagoo)
मोठ्या पडद्यासोबत रिमा या छोट्या पडद्यावरही हीट ठरल्या होत्या. त्यांची श्रीमान श्रीमती ही मालिका गाजली. तर तू तू मै मै मध्ये सुनेवर कायम कुरघोडी करण्यासाठी धडपडणारी सासूची भूमिकाही गाजली.
रिमा यांच्या खात्यात शंभराहून अधिक चित्रपट जमा आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीत रिमा यांना आईच्या भूमिकेव्यतिरिक्त अधिक संधी मिळाली नाही. पण त्यातही रिमा यांनी आपली छाप ठेवली आहे. मैंने प्यार किया मध्ये मुलाच्या आणि नव-याच्या कात्रित सापडलेली आई जेवढी आवडली तेवढीच वास्तवमध्ये आपल्याच मुलाला गोळी मारुन कायमचं शांत करणारी आई अंगावर काटा उभा करुन गेली. स्वोज्वळतेची छाप असलेल्या रिमा यांनी रिहाई या चित्रपटात बंडखोर महिलेची भूमिका केली आहे. पतीची सोबत मिळत नसलेली पत्नी दुस-या पुरुषाच्या प्रेमात पडते ही ती भूमिका होती. या भूमिकेवर अनेकबाजुंनी टिका झाली. पण त्यामध्ये रिमा यांच्याबद्दल प्रेमच अधिक होतं. किंबहुना त्या सोज्वळ भूमिकांमध्येच प्रेक्षकांना अधिक भावतात ही भावना होती. त्यानंतर रिमा अशा निगेटीव्ह भूमिकांच्या वाट्याला गेल्या नाहीत. काही वर्षानंतर त्यांच्याकडे नामकरण ही मालिका आली. त्यात महेश भट्ट यांच्या आग्रहाखातर त्यांनी दयावंती मेहता ही भूमिका केली. ही रिमा यांनी केलेली शेवटची मालिका ठरली. (reema lagoo)
रिमा या आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कामात मग्न होत्या. 18 मे 2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही तासआधी त्या शुटींगमध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाच पण सहकलाकारही धक्यात होते.
रिमा यांची एक्झीट कायमची चुटपूट लावून गेली आहे. कदाचित त्यांना मिळालेल्या चित्रपटातील भूमिकांसारखी त्यांची जीवनातील भूमिकाही होती. कायम लक्षात रहाणारी…. (reema lagoo)
सई बने
1 Comment
Khup chhan