‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
बॉब क्रिस्टो हा खलनायक आठवतो का?
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात जन्मलेला एक तरुण जो सिविल इंजिनियर होता. मस्कतला नोकरीवर जाण्यासाठी तो तयार होता. पण आपल्या व्हिसा न मिळाल्यामुळे काही दिवस भारतात राहत होता. भारतात राहण्यामागे त्याचा दुसरा एक अंतस्थ हेतू होता तो असा की जगप्रसिद्ध टाईम मॅगझीमवर एका भारतीय अभिनेत्रीचा फोटो त्याने व्हिएतनामला असताना बघितला होता आणि त्या फोटोच्या तो प्रेमात पडला होता. तिला भेटण्याचं एक कारण देखील भारतात राहण्याचे होते. कोण होता हा सिविल इंजिनियर? कुणाला त्याला भेटायचे होते? कुणाच्या फोटोच्या प्रेमात तो पडला होता? काय होता हा किस्सा?
हा सिविल इंजिनियर होता हिंदी सिनेमातील ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील गाजलेला खलनायक बॉब क्रिस्टो (Bob Christo). तुम्ही अनेक चित्रपटातून बघितला असेल. विशेषतः शेखर कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ (१९८७) या चित्रपटात त्याची भूमिका जबरदस्त होती. त्यातील त्याचे डायलॉग “बजरंगबली मारटा है …“ हा त्याचा डॉयलॉग खूप लोकप्रिय झाला होता. मुळात बॉब क्रिस्टोला हिंदी सिनेमात काम करायचे नव्हतेच परंतु एका अभिनेत्रीच्या फोटोच्या प्रेमात तो पडला आणि भारतात सेटल झाला इतका की तो बॉलीवूडमध्ये इतका रमला आणि त्याचा शेवट देखील इथेच झाला!
ही अभिनेत्री होती परवीन बाबी. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर परवीन बाबीचा एक फोटो टाईम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकला होता. याच मॅगझिनमध्ये बॉलीवूडवर एक कव्हर स्टोरी देखील होती. हे आर्टिकल आणि हा फोटो पाहून बॉब क्रिस्टो (Bob Christo) भारतात आला. खर तर त्याला मस्कतला जायचं होतं. पण व्हिसा मिळत नव्हता आणि मुख्य म्हणजे त्याला एकदा परवीन बाबीला भेटायचे होते. मुंबईला चर्चगेटला एका फिल्म युनिटचे शूटिंग चालू होते. तिथे बॉब क्रिस्टो गेला आणि त्याने सांगितले, ”मी एक मॉडेल आहे आणि एका हॉलीवुड मूवी मध्ये काम देखील केलेले आहे मला परवीन बाबीला भेटायचे आहे”.
तेव्हा त्याची भेट छायाचित्रकार खान त्याच्यासोबत झाली. त्याने दुसऱ्या दिवशी त्याला एका सिनेमाच्या मुहूर्ताला भेट बोलावले. दुसऱ्या दिवशी बॉम्बे सेंट्रलला बी आर चोप्रा यांच्या ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाचा मुहूर्त होणार होता. तिथे सकाळी तो जाऊन पोहोचला आणि परवीन बाबीची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने त्याला एका मुलीचा आवाज ऐकू आला त्याने बघितले तर मागे परवीन बाबी होती. ती हसून म्हणाली ‘हॅलो आय एम परवीन बाबी!” त्यावर तो म्हणाला “तू? तू परवीन बाबी असूच शकत नाही.” जवळच्या बॅगमधून त्याने टाईम मॅगझीन काढले आणि त्यांनी ही परवीन बाबी आहे असे सांगितले.
त्यावर परवीन बाबी खळखळून हसली आणि म्हणाली, ”या फोटोसाठी मी मेकअप केला होता. शूटिंग आणि फोटो सेशनसाठी मी काय मेकअप करून जाते. आता जे मला तू पाहतो आहेस तो मेकअप शिवाय. माझा चेहरा असा आहे. ”त्यावर बॉब क्रिस्टो (Bob Christo) देखील जोर जोरात हसायला लागला. त्यांची पहिली भेट इथे झाली नंतर त्याच्या वारंवार भेटी होवू लागल्या. परवीन बाबीच्या अल्पकाळातील प्रियकरांमध्ये बॉब क्रिस्टोचा समावेश होतो. नंतर त्याने इथेच राहायचे ठरवले.
अभिनेता संजय खान याच्यासोबत त्याची एकदा भेट झाली. संजय खानने झाला आपल्या ‘अब्दुल्ला’ (१९८०) या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. त्यानंतर बॉब क्रिस्टो (Bob Christo) भारतीय सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी अगदी हुकमाचा एक्का ठरला. स्मगलर, गॅंगस्टर, फिरंगी अशा भूमिकांमधून तो पडद्यावर चमकू लागला. त्याच्या भूमिकांची लांबी फार काही नसायची पण जेवढा काळा तो पडद्यावर असायचा तोवर त्याच्या एकंदरीत अटायरवरून पब्लिक एकदम खुश असायची.
========
हे देखील वाचा : सस्पेन्स म्युझिकल हिट ‘बीस साल बाद’ आठवतो का?
========
अमिताभ बच्चन यांच्या कालिया, मर्द, अजूबा या चित्रपटातील त्याचा खलनायक खूप गाजला. २०० हून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्याच्या सर्व भूमिका अगदी साचेबद्ध असायच्या. त्याने काही तमिळ, तेलगू, आणि कन्नड सिनेमा देखील कामे केली. बॉब क्रिस्टो (Bob Christo) नंतर बेंगलोरच्या एका हॉटेलमध्ये स्पा आणि योगा सेंटरचा इन्चार्ज बनला. भारतीय योगामध्ये त्याला खूप रुची होती. स्वतःची आत्मकथा देखील लिहिली. २० मार्च २०११ या दिवशी हृदय विकाराने बॉब क्रिस्टो यांचे निधन झाले. एका अभिनेत्रीच्या शोधात आलेला हा तरुण इथेच रमला आणि इथेच संपला!