‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कवी प्रदीप… पाकिस्तान ने ही चोरली या गीतकाराची गाणी
कवी प्रदीप (Kavi Pradeep) म्हटलं की ‘ऐ मेरे वतन के लोगो ‘ या देशभक्तीपर गीताची आठवण लगेच होते! शतकातून एकदाच अशी कलाकृती निर्माण होते. पंतप्रधान नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) डोळ्यात अश्रू उभे करण्याचे सामर्थ्य प्रदीप यांच्या शब्दात, लताजींच्या स्वरात आणि सी रामचंद्र यांच्या सुरावटीत होते. प्रदीप यांची सिने कारकीर्द भारीच होती. त्या वेळी बॉंम्बे टॉकीजचा ’कंगन’ हा सिनेमा फ्लोअरवर होता.
हे देखील वाचा: नौशाद यांना संगीताची पहिली संधी देणारा गीतकार : डि एन मधोक
(अशोककुमार-लीला चिटणीस) या सिनेमात प्रदीप यांची चार गाणी होती. पैकी तीन गाणी त्यांनी स्वत: गायली होती. त्यानंतरच्या ’बंधन’ने कमालच केली. त्यातील प्रदीपच्या ’चल चल रे नौजवान’ या गीताने अख्ख्या हिंदुस्तानला वेड लावले. तो काळ स्वांतत्र्यपूर्व होता आणि ब्रिटीशांविरूध्दचा असंतोष वाढत होता. युवकांना चेतना देणारे हे गीत पंजाब सिंध प्रांतात प्रभात फेरीच्या वेळी मोठ्या जल्लोशात – जोशात गायलं जायचं.
म.गांधीचे (Mahatma Gandhi) स्वीय सहाय्यक असलेल्या महादेव देसाई यांनी तर या गीताला उपनिषदाची उपमा दिली होती. एकूणच प्रदीपच्या या गीताने देशभर धूम करत ’बंधन’ला सुवर्ण महोत्सवी यश मिळालं. प्रदीप बॉंम्बे टॉकीजचे हिट गीतकार ठरले. ’कंगन’ , ’बंधन’च्या पाठोपाठ आला ’झूला’ (न जाने आज किधर मेरी नाव चली रे), नया संसार आणि विश्वविक्रमी ’किस्मत’!. १९४३ साली आलेल्या या सिनेमातील गाणी अफाट गाजली.
“अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैय्या भगवान किनारे से लगा दे मेरी नैय्या”, ’धीरे धीरे आरे बादल धीरे धीरे आ मेरा बुलबुल सो रहा है’, ’घर घर में दिवाली है मेरे घर में अंधेरा’ आणि अफाट गाजलेलं ’आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा हैं’ या गीताने अक्षरश: इतिहास निर्माण केला. हे गीत हिंदुस्थानातील हरेक थिएटर मध्ये पुन्हा पुन्हा दाखविले जायचे. लोक खुर्च्यावर उभं राहून समूह स्वरात गायचे.
स्वातंत्र्य चळवळीला मोठा हातभार लावण्याचे काम या गीताने केले आहे. त्या वेळी सेन्सॉर बोर्डाचे कडक लक्ष असायचे. पण प्रदीपजी मोठे वस्ताद. त्यांनी या गीतात एक ओळ टाकली होती. ’शुरू हुआ है जंग तुम्हारा, जाग उठो हिंदुस्तानी तुम न किसीके आगे झुकना जर्मन हो या जापानी.’ त्या काळात चालू असलेल्या दुसर्या महायुध्दात जर्मनी व जपान हे दोन्ही राष्ट्र ब्रिटीशांच्या विरोधात होते. भारतीयांना य गीतातून नेमका कोणता अर्थ घ्यायचा होता ते ’व्यवस्थित’ समजलं. पण लवकरच सेन्सॉरच्या सारा प्रकार लक्षात आला. प्रदीप यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले. त्या काळात ते काही दिवस भूमीगत होते.
हे वाचलंत का: मुगल ए आझम – एका अजरामर प्रेमकथेची साठी
‘किस्मत’ नंतर प्रदीपजी यांची ’किस्मत’चांगलीच चमकली. बॉम्बे टॉकीजच्या विभाजनानंतर ते मुखर्जींच्या फिल्मिस्तान मध्ये आले. फिल्मिस्तान च्या करारात गुंतल्याने त्यांनी काही सिनेमाची गाणी त्या काळात मिस कमल बी. ए. या नावाने लिहिली! प्रदीपच्या काही गाण्यांनी पाकीस्तानात देखील जादू चालवली.
’जागृती’ या सिनेमातील ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, ’हम लाये हैं तूफान से कश्ती निकालके इस देश को रखना मेरे बच्चो संभालके’ आणि ’आओ बच्चो तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की’ या गाण्याची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की पाकीस्तानची चित्रसृष्टी या गाण्यांच्या प्रेमात पडली
आणि यात ’व्यवस्थित’ बदल करून त्यांनी तिकडे वापरली! ‘बेदारी’ या सिनेमात हि चोरी केली होती. “दे दी हमे आजादी ” या गाण्यावरून बनलं “यूँ दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ऐ क़ायदे आज़म तेरा एहसान है एहसान” तर, आओ बच्चो ’ या गाण्यावरून बनलं ’आओ बच्चो सैर कराएँ तुमको पाकिस्तान की, जिसकी खातिर हमने दी क़ुर्बानी लाखों जान की’.
आज ६ फेब्रुवारी कवी प्रदीप यांचा जन्मदिन निमित्ताने हि आठवण !