रिमझिम गिरे सावन : अमिताभ – मौसमीचा ‘मंझिल’ आठवतो कां?
महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरस्टार पदाचा कालखंड जेव्हा अगदी उंचीवर पोहोचला होता त्या सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात एक चित्रपट प्रदर्शित झाला होता; त्या काळात बासू चटर्जी दिग्दर्शित एक सिनेमा आला होता ’मंझिल’(Manzil). यात अमिताभची नायिका मौसमी चटर्जी होती. चित्रपट बासू चटर्जी स्टाईलचा होता. त्यामुळे अँग्री यंग मॅन अमिताभला पाहायला गेलेल्या रसिकांचा इथे विरस झाला आणि चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. अर्थात हा चित्रपट बनायला तब्बल सात वर्षे लागली होती.
१९७२ साली हा चित्रपट अमिताभ बच्चन यांनी साईन केला होता. या सिनेमाची मेकिंगची कथा भन्नाट आहे. अमिताभचा तेंव्हाचा तो प्रचंड स्ट्रगलिंग पिरेड होता. अमिताभला जेव्हा सगळीकडून नकारघंटा ऐकायला मिळत होती त्या काळात अमिताभ आणि जया भादुरीने एका निर्मात्याला बासूदा यांच्याकडे पाठवले आणि अमिताभला घेऊन एक चित्रपट बनवा असे सांगितले. या (Manzil) चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये एक जण ललिता पवार यांचा मुलगा जय पवार देखील होता. हा चित्रपट बऱ्यापैकी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या १९६५ साली आलेल्या बंगाली भाषेतील ‘आकाश कुसुम’ वर आधारित होता. पण याचा शेवट बासू चटर्जी यांनी बदलायचे ठरवले. कारण मूळ बंगाली चित्रपटांमध्ये नायक नायिकेचे मिलन होत नाही असे दाखवले होते.
बासूदा यांच्या चित्रपटाचा जॉनर वेगळा असायचा. त्यांच्या मते लोक चित्रपट एक विरंगुळा म्हणून पाहायला येतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, अपमान, अडचणी असतातच. त्याच पुन्हा पडद्यावर दाखवण्यात काय हशील? म्हणून त्यांनी या सिनेमाचा हॅप्पी एन्ड केला होता. या (Manzil) चित्रपटात आधी अमिताभच्या सोबत किरण कुमारला देखील साईन केले होते असे म्हणतात. परंतु अमिताभ बच्चन याला कुठलीही स्टार व्हॅल्यू नाही म्हणून किरण कुमारने त्याला काढून टाका म्हणून तगादा दिग्दर्शकाकडे लावला होता. परंतु दिग्दर्शकाने किरण कुमारलाच सिनेमातून बाहेर काढले! हा चित्रपट अतिशय कूर्मगतीने बनत होता. चित्रपटाचे तीन निर्माते होते. तिघांमध्ये अजिबात एक मत नव्हते. त्यामुळे फायनान्शिअल प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड रखडला आणि कसा बसा २८ सप्टेंबर १९७९ रोजी रिलीज झाला.
या चित्रपटाची आजच्या पिढीला आठवण म्हणजे यातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार या दोघांनी वेगवेगळे गायलेलं योगेश यांचे गीत ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये ये मन…’ या चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं चित्रपटात पार्श्वभूमी वापरण्यात आलं होतं आणि गाण्याचे शूटिंग थेट लोकेशनवर जाऊन केलं होतं. मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी, मुंबई युनिव्हर्सिटी या सर्व भागांमध्ये चित्रीकरण केलं होतं. अगदी भर पावसाळ्यात आणि ओरीजनल पावसात या गाण्याचे चित्रीकरण केलं होतं.
लोक त्यावेळी अमिताभ, मौसमीला फारसे ओळखत नव्हते. अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ आपल्या कारमधून या दोघांना फॉलो करत होता आणि गर्दी झाली की पटकन या दोघांना कारमध्ये बसून दुसऱ्या लोकेशनला घेऊन जात असे. या गाण्यांमध्ये मौसमीने शिफॉनची साडी नेसली होती. प्रचंड धुवाधार पावसामुळे तिचा मेकअप लिपस्टिकसारखे निघून जात होते परंतु त्याही अवस्थेत त्यांनी हे गाणे चित्रित केले. तिने ह्या गाण्यांमध्ये ‘अमिताभने मला दोन्ही हाताने उचलून घ्यावे’ असा हट्ट बासू चटर्जी यांच्याकडे धरला होता. बासुदांना हे अभिप्रेत नव्हतं. कारण दोन प्रेमी जीव मस्त पावसाची मजा घेत फिरतात असं त्यांना दाखवायचं होतं!
या चित्रपटात ए के हंगल यांनी बहुदा पहिल्यांदाच खलनायकी भूमिका केली होती. गॅलव्हॅनोमीटर (इलेक्ट्रिक करंट मोजण्याचे यंत्र) रिपेअरीचे काम या चित्रपटात दाखवले होते. बहुदा हे इन्स्ट्रुमेंट भारतीय सिनेमात पहिल्यांदाच दाखवले असावे! १९७९ या वर्षी अमिताभ बच्चन यांचे द ग्रेट गॅम्बलर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, काला पत्थर, जुर्माना सुपरहिट सिनेमे प्रदर्शित झाले होते.
या भाऊ गर्दीमध्ये ‘मंजिल’ (Manzil) कधी आला आणि कधी गेला कळालेच नाही. नंतर पुन्हा रिपीट रनला ऐंशीच्या दशकात बऱ्याचदा मॉर्निंग शोमध्ये हा चित्रपट बऱ्याचदा झळकत असे. हळूहळू या चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली. नंतर दूरदर्शनच्या छाया गीतमध्ये या चित्रपटातील रिमझिम गिरे सावन हे गाणं बऱ्याचदा लागत होतं. त्यामुळे हळूहळू लोक हे गाणे पाहण्यासाठी चित्रपटाला गर्दी करू लागले आणि आज हे गाणं हीच एकमेव आठवण या चित्रपटाची राहिली आहे! गेल्या वर्षी एका सिनियर कपलने त्याच लोकेशन्स वर जावून गाणे चित्रित केले होते. तेंव्हा पुन्हा एकदा हे गाणे चर्चेत आले होते.