Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!
कधी कधी आव्हान म्हणून स्विकारलेली गोष्ट त्या व्यक्तीला लढून जिंकण्याचा दुदर्म्य आत्मविश्वास तर देतेच, ती कलाकृती त्या व्यक्तीच्या आयुष्यातील माईलस्टोन बनते. सुभाष घई यांच्या बाबत असंच झालं. त्यांनी दिग्दर्शित केलेले ’कालीचरण’(१९७६) आणि ’विश्वनाथ’ (१९७८) हे दोन्ही सिनेमे शत्रुघ्न सिन्हाच्या बुलंद डॉयलॉगने हिट ठरले होते. त्या वेळी त्यांचा एक मित्र त्यांना म्हणाला ’यार सुभाष तू अॅक्शन ड्रामा पिक्चरे अच्छी बनाता हैं लेकीन तुझे म्युझिक को कोई सेन्स नही हैं’. घई त्या वेळी आणखी दोन अॅक्शन मूव्हीजवर काम करत होते. ’गौतम गोविंदा’आणि ’क्रोधी’. घई यांनी त्या टिकाकार मित्राचे विधान गांभिर्याने घेतले. त्या मित्राच्या विधानात तथ्य तर होतंच. त्यांनी आव्हान स्विकारले. आणि संगीतप्रधान विषय शोधू लागले. यातूनच निर्मिती झाली ’कर्ज’ या सिनेमाची. (Karz movie making story)

‘कर्ज’ या सिनेमाच्या मेकींगची कहानी सिनेमाच्या कथानकाइतकीच रंजक आहे. ११ जून १९८०साली प्रदर्शित झालेला ‘कर्ज’ पुढच्या आठवड्यात ४५ वर्ष पूर्ण करतोय. त्याच्याच मेकींगची हि कहाणी. १९७५ साली आलेल्या ’द रीइनकारनेशन ऑफ पीटर प्राऊड’ या हॉलीवूडच्या सिनेमाने घई यांचे लक्ष वेधले. पुनर्जन्मावर आधारीत या कथानकाला भारतीय अवतारात आणले तर प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची त्यांना खात्री होती. सिनेमा संगीतप्रधान व पुनर्जन्मावर असल्याने गिटार या वाद्याला अग्रस्थानी ठेवून त्यावरील धुन त्याला मागच्या जन्मीची आठवण करून देते हे निश्चित झालं. सिनेमाचा नायक म्हणून ऋषी कपूर आणि नायिका म्हणून टिना मुनीम यांची नावं नक्की झाली. हा सिनेमा जेव्हा टिनाने साईन केला त्या वेळी तिचा पहिला सिनेमा ’देस परदेस’ प्रदर्शित व्हायचा होता. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री होता. त्यातील खलनायिकेच्या भूमिकेकरीता घई यांनी सिमी गरेवालची निवड केली. हि भूमिका तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम ठरली. अन्य भूमिकांकरीता प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खॊटे हे कलावंत निवडले गेले. (Bollywood news)

सिनेमाचं संगीत आर डी कडे द्यावं असा सर्वांचा आग्रह होता पण घई यांनी एल पी वर पुन्हा विश्वास दाखविला. सिनेमाची पटकथा सचिन भौमिक यांनी लिहिली होती. भानु अथय्या यांनी वेषभूषा तर सुधेन्द्रु रॉय यांच्याकडे कला दिग्दर्शन होतं. कमलाकर राव यांच्या कॅमेर्याने उटीतील नयन रम्य लोकेशन्स मस्त टिपली. सिनेमाच्या गाण्यांची रसिकांवरील जादू अजून उतरलेली नाही. ऋषी कपूर यांची त्या काळातील इमेज लव्हर बॉयचीच होती. त्यांच्या हातात कोणतंही वाद्य शोभून दिसे. २४ ऑक्टोबर १९७८ ला सिनेमाचं रितसर शूटींग सुरू झालं. मूहूर्ताचा शॉट ’दर्दे दिल दर्दे जिगर’ या गाण्यावर घेण्यात आला. हा सिनेमा घई यांच्या सासर्यांनी (अख्तर फारूकी) यांनी निर्माण केला असल्याने त्यांना खर्चात कुठेही हात आखडता घ्यावा लागला नाही. ‘ओम शांती ओम’ या गाण्याचे चित्रीकरण तब्बल सात शिफ्टमध्ये आर के स्टुडिओत झालं. ’पैसा ये पैसा’ या गाण्याच्या वेळी नेमका कोरीयो ग्राफर सुरेश भट नसल्याने घई यांनीच परळच्या भाईदास हॉल परळ येथे गाणं चित्रित केलं. यात एक लठ्ठ माणूस ’पैसा’ असं ओरडत असतो. हा लठ्ठ माणूस ऐन वेळी न आल्याने सुभाष घई यांनीच स्वत:ला तिथे चमकवले! पुढे प्रत्येक सिनेमात हिचकॉक प्रमाणे अल्पदर्शन देण्याचा त्यांचा पायंडाच पडला. (Entertainment)

‘कर्ज’ प्रदर्शित झाल्यानंतर एक आठवड्यातचं फिरोज खानचा ब्लॉकबस्टर ‘कुर्बानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ‘कुर्बानी’ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. त्या काळात ‘कुर्बानी’ समोर कुठलाही चित्रपट टिकाव धरू शकला नाही. ‘कर्ज’ची जादू देखील हळूहळू उतरू लागली. यामुळे अभिनेता ऋषी कपूर डिप्रेशनमध्ये गेले होते. इतके की त्यांना सिनेमाच्या सेटवर जायची देखील भीती वाटत होती. ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ‘खुल्लम खुल्ला’ मध्ये यावर सविस्तर लिहिले आहे. दिवाळीनंतर मात्र पुन्हा ‘कर्ज’ या चित्रपटाची हवा सुरू झाली आणि फिमेल ऑडियन्समध्ये हळूहळू चित्रपटाने वेग पकडला. (Bollywood tadaka)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या चित्रपटाला फिल्मफेअरची सहा नामांकन होती. सर्वोत्कृष्ट संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, सर्वोत्कृष्ट गीतकार आनंद बक्षी (ओम शांती ओम), सर्वोत्कृष्ट गीतकार आनंद बक्षी(दर्द ए दिल दर्द ए जिगर) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक किशोर कुमार (ओम शांती ओम), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म. रफी (दर्द ए दिल दर्द ए जिगर) , सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री (सिमी गरेवाल) त्यापैकी फक्त एक पारितोषिक या चित्रपटाला मिळाले ते सर्वोत्कृष्ट संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल! या सिनेमावर खूप काही लिहिता येईल. १९८० सालचा तो बॉक्स ऑफीसचा सर्वात हिट सिनेमा होता. मल्टीस्टारर आणि अमिताभ बच्चन यांच्या अॅक्शन सिनेमाच्या लाटेत ’कर्ज’ने मिळवलेलं यश स्पृहनीय होतं. यातील गिटारवरील ट्यून आजही लोकप्रिय आहे.या सिनेमातील गाण्यांच्या ओळीवरून पुढे अनेक सिनेमांची टायटल्स ठरली. कशी ती बघा. दर्द- ए-दिल (१९८३) पैसा ये पैसा (१९८५) मै सोलह बरसकी (१९९८) आशिक बनाया आपने (२००५) आणि ओम शांती ओम (२००७).