
Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या विषयांवर, आधुनिक विचारांसह चित्रपट सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक हटके आणि स्टायलिश प्रेमकथा घेऊन येत आहेत. ‘रुबाब’ (Rubaab) या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलर लाँच सोहळ्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची विशेष उपस्थिती लाभली. ट्रेलर रिलीज होताच तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन येणारा ‘रुबाब’ हा चित्रपट केवळ प्रेमकहाणीपुरता मर्यादित नाही. स्वतःच्या अटींवर जगणारी, आत्मसन्मान जपणारी आणि प्रेमासाठी ठाम भूमिका घेणारी आजची तरुणाई या चित्रपटातून समोर येते. स्वॅग असलेला आत्मविश्वासी नायक, त्याची स्वप्नातील प्रेयसी आणि त्यांच्यातील हळवे पण बिनधास्त नाते ट्रेलरमधून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. मात्र, या प्रेमकथेच्या वाटेत समाज, कुटुंब आणि विरोधकांचे अडथळे उभे राहतात.(Rubaab Marathi Movie Trailer)

प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांचा मेळ साधणारी ही कथा अखेर कोणता मार्ग निवडते, हे प्रेक्षकांना चित्रपटगृहातच अनुभवायला मिळणार आहे. ट्रेलरमधील रोमँटिक केमिस्ट्री, दमदार संवाद, स्टायलिश सादरीकरण, जोशपूर्ण पार्श्वसंगीत आणि तरुणाईची ऊर्जा दर्शवणारी दृश्यं यामुळे ‘रुबाब’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.या प्रसंगी नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक करताना सांगितले की, दिग्दर्शक शेखर रणखांबे हे त्यांचे जवळचे मित्र असून त्यांच्या दिग्दर्शनात वेगळेपण जाणवते. ट्रेलर पाहताच चित्रपटाची कथा काहीतरी नवीन सांगणारी असल्याचे स्पष्ट होते. प्रमुख कलाकार संभाजी ससाणे आणि शितल पाटील यांची जोडीही चित्रपटाच्या नावासारखीच प्रभावी वाटते. भव्य चित्रीकरण, दर्जेदार संगीत आणि कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले की, ‘रुबाब’ची संकल्पना त्यांना २०१८ साली सुचली होती आणि अखेर ती कथा आता मोठ्या पडद्यावर साकार होत आहे. आजच्या पिढीचं प्रेम स्पष्ट, बेधडक आणि आत्मसन्मान जपणारं असतं, आणि हाच विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. स्वतःची ओळख जपत प्रेमासाठी उभं राहणाऱ्या तरुणाईचा प्रवास या चित्रपटात दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
=========================
=========================
६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेम, स्वाभिमान आणि स्वॅगची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडणार असून, ट्रेलरनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.