पंढरीच्या वारीत सापडली अभिनयाची वाट!
सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. त्यात शंतनूच्या मित्राची म्हणजे चिन्मय कामत ही व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार म्हणजे ऋषिकेश वांबुरकर. त्याचा या क्षेत्रातील प्रवास आपल्याला खूप काही सांगून जाणारा आहे. त्याचे शालेय शिक्षण औरंगाबाद मध्ये झालं. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला खरा, पण त्याचं मन इंजिनिअरिंगमध्ये रमत नव्हतं. तो तेव्हा देवानंद सानप यांच्याकडे फोटोग्राफीच्या संदर्भातील कामे करत होता. लग्नाचे किंवा इव्हेंटचे फोटोशूट देखील तो करत असे.
एकदा कॉलेजच्याच एका समारंभात फोटो काढायचं काम त्याच्याकडं आलं आणि त्याने त्या समारंभात चक्क आपण इंजिनिअरिंग मध्ये रमलो नाही, असे स्पष्ट सांगितले. ऋषीचे आयुष्य एक वेगळं वळण घेऊ पाहत होतं. ऋषी दरवर्षी पंढरीची वारी पायी करत असतो. २००५ सालापासून तो वारीला जातो. ऋषीने ‘पती सगळे उचापती’ नावाच्या नाटकाची सीडी पाहिली होती आणि ते नाटक त्याचं तोंडपाठ झालं होतं. २००९ च्या वारीत त्याने ते नाटक वारीमध्ये एकट्याने त्यांच्या महाराजांसमोर सादर केलं. महाराजांनी त्याला अभिनय क्षेत्रात प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
ऋषीच्या जडणघडणीत त्याच्या आईचा खूप महत्वाचा वाटा आहे, हे तो म्हणतो. आईच्या प्रोत्साहनाने त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. त्या अभ्यासक्रमाने त्याला एक वेगळीच दिशा मिळत गेली. पुढे त्याने मास्टर्स डिग्री देखील केली. शास्त्रीय गायन, भरतनाट्यम अशा कलांचे शिक्षण देखील त्या अभ्यासक्रमात अंतर्भूत होते. तो पथनाट्य करू लागला. युथ फेस्टिवल मध्ये त्याने काम केलेल्या एकांकिका यशस्वी झाल्या. तो स्वतः विविध वाद्यांचे आवाज तोंडाने काढत असायचा. या क्षेत्रात करिअर करण्याची त्याची जिद्द कौतुकास्पद होती. त्याने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ची ऑडिशन दिली, त्याची निवड झाली. त्याचे शंभर एपिसोड्स त्याने केले. पण मग पुढे काही महिने त्याच्याकडे काम नव्हतं. त्याने ‘विठ्ठलाशप्पथ’, ‘तलाव’, आता कोठे धावे मन, भॉ, हिरो अशा चित्रपटात काम देखील केले होते.
हे देखील वाचा: निखिल राजेशिर्के… डॉक्टरचा अभिनेता कसा झाला???
काही कामांसाठी त्याची निवड व्हायची, सगळं ठरायचं आणि ज्या दिवशी शूटिंग सुरु होणार, असं ठरलेलं असायचं, त्याच्या आधी त्याला कळायचं की आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणाची तरी निवड झाली आहे. असे कटू अनुभव देखील त्याला आले. ऋषीने स्वतः गॅरेजमध्ये, मेडिकल मध्ये काम केलं आहे तसेच पेपरची लाईन सुद्धा टाकली आहे. ऋषीने विपुल महापुरुष लिखित, दिग्दर्शित ‘लालटेन’ नावाच्या एकांकिकेत एक अतिशय वेगळी भूमिका केली होती आणि अहमदनगर करंडक एकांकिका स्पर्धेत ती सादर झाली. त्यातील त्याच्या अभिनयाने रसिकांची खूप दाद मिळवली होती. त्याने एम जी एम कॉलेजच्या कम्युनिटी रेडिओसाठी आर जे म्हणून देखील काम केलं होतं. पुढे ‘आता कसं करू’ या नाटकात त्याने भूमिका केली. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ मधील सीजन टू मध्ये तो टॉप ३६ मध्ये होता.
२०२० चा लॉकडाऊन मात्र त्याच्यासाठी टर्निग पॉईंट ठरला. कारण त्या दरम्यान तो मुंबईत ‘आय प्रेम यू’ चित्रपटाच्या शुटिंगकरिता आला होता. लॉकडाउन मुळे तो मुंबईत अडकला. पण त्याच काळात त्याला ‘साजिंदे’ या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटात महत्वाची भूमिका मिळाली. विपुल महापुरुष याने लिहिलेल्या एकांकिकेत काम केलेला ऋषी हा कलाकार, निर्माते बलभीम पठारे यांच्या लक्षात होता. त्यांनी लक्षात ठेवून ‘साजिंदे’ चित्रपटासाठी ऋषीला बोलावले, हे एक वेगळं वळण म्हटलं पाहिजे. ऋषी म्हणतो, “जेव्हा ‘शुभमंगल ऑनलाईन’ मधील चिन्मय कामत या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. या मालिकेच्या निमित्ताने सुकन्याताई, सुयश टिळक, सायली संजीव, मिलिंद फाटक अशा अनेक मान्यवरांबरोबर काम करता येणार होते. खूप शिकायला मिळणार होतं.”
ऋषी सेटवर पण धमाल करत असतो. सर्वांची मने जिंकून घेत असतो. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, निशांत सुर्वे, निर्माती मंजिरी भावे आणि कलर्स मराठी यांनी त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे खरेच त्याने या भूमिकेतून सार्थक केले आहे. तो सध्या ‘चांदणे शिंपीत जाशी’ (Chandane Shimpit Jashi) या मालिकेत देखील भूमिका करत आहे. शिवाय ‘विद्यापीठ’ नामक चित्रपटात देखील त्याची भूमिका आहे.