‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
रशियामध्ये फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत बॉलिवूडचे चित्रपट… या टॉप १० चित्रपटांनी घडवला आहे इतिहास
खूप कमी लोकांना माहिती असेल की, रशियामध्ये आपल्या बॉलिवूडच्या चित्रपटांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अर्थात जुन्या काळातल्या सिनेरसिकांना रशिया आणि राजकपूर हे समीकरण चांगलंच ठाऊक असेल. परंतु, आश्चर्य म्हणजे रशियामध्ये सुपरहिट ठरलेल्या टॉप १० चित्रपटांच्या यादीमधला टॉपचा चित्रपट मात्र राजकपूरचा नाहीये. (Bollywood Movies in Russia)
तसं बघायला गेलं तर, १९४६ साली प्रदर्शित झालेला ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित ‘धरती के लाल’ हा चित्रपट रशियन भाषेत डब करून प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. भारतात प्रदर्शित झाल्यावर ३ वर्षांनी म्हणजेच १९४९ साली हा चित्रपट डब करून सोव्हिएत युनिअन (आत्ताचं रशिया) मध्ये प्रदर्शित करण्यात आला. परंतु, दुर्दैवाने हा चित्रपट टॉप १० लिस्टमध्ये नाहीये. (Bollywood Movies in Russia)
आज आपण जाणून घेणार आहोत अशा १० चित्रपटांबद्दल जे रशियन भाषेत डब करण्यात आले असून ते सुपरहिट झाले आहेत.
दुनिया (१९६८)
देव आनंद, वैजयंती माला आणि ललिता पवार अभिनित दुनिया हा चित्रपट रशियन भाषेत डब करण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाच्या ४ कोटी ३० लाख तिकिटांची विक्री झाली व चित्रपटाने त्या काळात ९० लाख रुपयांची कमाई केली.
फुल और पत्थर (१९६६)
धर्मेंद्रचा फुल और पत्थर त्या काळात चांगलाच हिट झाला होता. यामधली त्याची शर्ट काढून फेकण्याची स्टाईल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. हा चित्रपट रशियन भाषेत डब करून प्रदर्शित केल्यावर तिथेही तो लोकप्रिय झाला. सुमारे ४.५० कोटी तिकिटांच्या विक्रीमधून चित्रपटाने ९५ लाख रुपयांची कमाई केली.
ममता (१९६६)
धर्मेंद्र, अशोक कुमार व सुचित्रा सेन अभिनित ‘ममता’ हा चित्रपट भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. सुचित्रा सेन यांनी यामध्ये डबल रोल साकारला होता. पुढे हा चित्रपट रशियन भाषेत डब करण्यात आला. त्या काळात चित्रपटाने ५ कोटींच्या तिकीट विक्रीसह १ कोटी १५ लाख रुपयांची कमाई केली होती.
सीता और गीता (१९७२)
“हवा के साथ साथ…” म्हणत अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी दुहेरी भूमिकेतील हेमामालिनी, डॅशिंग धर्मेंद आणि जंटलमन संजीवकुमार अभिनित ‘सीता और गीता’ हा चित्रपट केवळ भारतातीलच नाही तर, रशियातील प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला. या चित्रपटासाठी हेमामालिनीला तिच्या कारकिर्दीमधील एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. सीता और गीता १९७६ मध्ये रशियन भाषेत डब करण्यात आला आणि चित्रपटाने साडेपाच कोटी तिकिटांच्या विक्रीमधून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा गल्ला जमवला.
शोले (१९७५)
या चित्रपटाचं नाव वाचून तुम्ही नक्कीच म्हणाला असाल, ‘नो वंडर!’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट. भारतात प्रदर्शित झाल्यावर तब्बल ४ वर्षांनी म्हणजेच १९७९ साली हा चित्रपट रशियन भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला व ६ कोटी एवढ्या भव्य तिकीट विक्रीसह चित्रपटाने १ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली. (Bollywood Movies in Russia)
बारूद (१९७६)
हे नाव वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, कारण भारतामध्ये फ्लॉप झालेला हा चित्रपट अवघ्या १९७८ साली रशियन भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाने चक्क ६ कोटी १० लाख तिकीट विक्रीसह खणखणीत १ कोटी ३५ लाख रुपयांची कामे केली. या चित्रपटात ऋषी कपूर, रिना रॉय, धर्मेंद्र, हेमामालिनी, इ कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
बॉबी (१९७३)
बॉबी या चित्रपटाच्या यशाने राजकपूर यांना मदतीचा हात दिला आणि ते आर्थिक संकटामधून बाहेर आले. टीनएज लव्ह स्टोरी या थीमवर आधारित हा चित्रपट भारतात प्रचंड यशस्वी झाला. तीन वर्षानंतर १९७५ साली हा चित्रपट रशियन भाषेत डब करण्यात आला आणि चित्रपटाने ६२५ कोटी एवढ्या भव्य दिव्य तिकीट विक्रीसह १ कोटी ४० लाख रुपयांचा गल्ला जमवला.
मेरा नाम जोकर (१९७०)
राज कपूर यांच्या आयुष्यात सर्वात मोठं आणि भंगलेलं स्वप्न म्हणजे ‘मेरा नाम जोकर’. हा चित्रपट भारतामध्ये ‘सुपरफ्लॉप’ ठरला होता. परंतु, या चित्रपटाला जेव्हा रशियन भाषेत डब करून तो प्रदर्शित करण्यात आला तेव्हा रशियन प्रेक्षकांनी मात्र हा चित्रपट डोक्यावर घेतला आणि चित्रपटाने ७ कोटी ३ लाख तिकीट विक्रीसह १ कोटी ६० लाख रुपयांची कमाई केली. (Bollywood Movies in Russia)
आवारा (१९५१)
राज कपूर यांच्या कारकिर्दीतलं सुवर्णपान म्हणजे ‘आवारा’ हा चित्रपट. हा चित्रपट १९५४ साली रशियन भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामुळेच रशियामध्ये भारतीय चित्रपटांसाठी द्वार उघडण्यात आलं. भारतीय चित्रपटांना व कलाकारांना तिथे मान -सन्मान मिळू लागला. या चित्रपटाने १० कोटी तिकीट विक्रीसह ३ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
डिस्को डान्सर (१९८२)
भारतीय चित्रपटांपैकी रशियामध्ये सर्वात जास्त कमी करणारा टॉपचा चित्रपट आहे सबकुछ मिथुन आणि बप्पीदा असणारा डिस्को डान्सर हा चित्रपट. या चित्रपटाला भारताइतकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लोकप्रियता रशियामध्ये मिळाली. १९८४ साली हा चित्रपट रशियामध्ये डब करण्यात आला व तब्बल १२ कोटींच्या विक्रमी तिकीट विक्रीसह ५ कोटी ३० लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.
====
हे ही वाचा: Bollywood Upcoming Releases: एप्रिल महिन्यात मनोरंजनाची मेजवानी
====
भारतीय चित्रपटांमुळे भारतीय संस्कृती रशियाच्या काना – कोपऱ्यात पोचली आणि कलाकारांसोबत तमाम भारतीय नागरिकांनाही सन्मान प्राप्त झाला. चित्रपटांच्या निमित्ताने दोन देशांमध्ये संस्कृतीचे आदान – प्रदान झाले आणि दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले. (Bollywood Movies in Russia)