सावर रे मना…. मितवा
गीतकार अश्विनी शेंडे आणि संगीतकार निलेश मोहरीर हे समीकरण सुद्धा खूप गाण्यातून जुळलेले आहे. काही गाण्यांचे योग असतात. एखादे गाणे एखाद्या प्रोजेक्टसाठी लिहिलं जातं, पण कधीकधी ते त्या प्रोजेक्टसाठी वापरलं जात नाही. अश्विनी शेंडे ने एका प्रोजेक्टसाठी चार ओळी लिहिल्या होत्या. तेव्हाही संगीतकार निलेश मोहरीर च होता. त्या ओळी होत्या,
“सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना, सावर रे मना”.
पण या चार ओळी ज्या प्रोजेक्टसाठी लिहिलेल्या होत्या, तो प्रोजेक्ट झाला नाही.
त्यानंतर काही महिन्यांनी ‘मितवा’ साठी गाणी लिहायचे होते. तेव्हा निलेश आणि अश्विनीच्या गप्पा सुरु झाल्या. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी प्रसंग सांगितला होता. प्रेमात पडलेले आणि नवीन अनुभव घ्यायला उत्सुक असेलेले, थोडेसे नर्व्हस असलेले आणि प्रत्येक पाऊल जपून टाकणारे आणि तरीही प्रेमाच्या प्रवाहात वाहत जाणारे ते दोन प्रेमी जीव या भावना मांडणारे गाणे हवे होते. या प्रसंगाला ‘सावर रे मना’ हे शब्द अगदी योग्य आहेत आणि ही जर टॅग लाईन असेल, तर आपण पूर्वी केलेला मुखडा इथे जाऊ शकेल, असे अश्विनी आणि निलेश यांच्या मनात आले. मुखडा मिळाला होता आणि पुढची कडवी लिहायची होती. खरे तर अश्विनी पूर्वी लिहिलेल्या ओळी, जरी तो प्रोजेक्ट नाही आला तरी त्याच ओळी पुन्हा नवीन प्रोजेक्टला वापरत नाही. प्रत्येक वेळी नव्याने लिहिते, पण ‘सावर रे मना’ ची डेस्टिनीच जणू वेगळी होती. या चार ओळींचे नशीबच जणू वेगळे होते, त्या मुखड्याला चालही सुंदर लागलेली होती. हे गाणे स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित होणार होते. पूर्वी लिहिलेल्या आणि चाल दिलेल्या या ओळी अश्विनी आणि निलेश यांनी पुन्हा ऐकल्या. स्वतःशी दोघेही ते गाणे गुणगुणत होते आणि यापुढे आपण नवीन कडवी लिहू, असे दोघांनी ठरवले. निलेश की-बोर्ड वर सुरावट वाजवत होता आणि त्या सुरांच्या लाटांवर अश्विनीला पुढे सुचलं,
“भान उरले ना जगाचे, ना स्वतःचे
सोहळे हे जाणिवांचे, नेणिवांचे”
या ओळी अश्विनीने निलेशला सांगितल्या. एखादे गाणे जन्माला येणे हे जाणिवांचे आणि नेणिवांचे सोहळे असतात, असेही अश्विनी म्हणते. मग दुपारी लंचनंतर पुढील ओळी सुचत गेल्या. आणि गाणे पूर्ण झाले.
या गाण्याच्या बाबतीत अश्विनीची आणखी एक आठवण आहे. हे गाणे लिहिताना अश्विनी गर्भवती होती. पुढे अश्विनीला मुलगी झाली आणि त्या मुलीच्या संदर्भातली ही आठवण आहे. हे गाणे ऐकू आलं की अश्विनीची मुलगी ‘अक्षरा बगवाडकर’ अगदी तान्ही असताना सुद्धा त्या गाण्याच्या तालावर हालचाल करायची, स्मित हास्य करायची, थोडी मोठी झाल्यावर हे गाणे ऐकताना ती आनंदाने व्यक्त व्हायची. आजही अक्षरा थोडी मोठी झाली असली, तरी या गाण्याचं आणि तिचंही एक वेगळे नाते आहे. ती आता त्या गाण्यावर नृत्य करते.
खरोखरच ‘सावर रे मना’ हे स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेले गीत आपल्या सर्वांच्या मनात घर करून राहिले आहे.
गणेश आचवल