‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सचिनदा तलतला म्हणाले ’जर गाणं मनासारखं नाही झालं तर रफीच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करणार!’
तलत महमूदच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य असायचं; त्यानं गायलेल्या गाण्याच्या यशाचं शंभर टक्के श्रेय हे त्याचं स्वत:चं असायचं. त्यामुळे त्याची गाणी ऐकताना ते गाणं ज्या नायकावर चित्रित केलं आहे त्याचा चेहरा डॊळ्यापुढे यॆण्या आधी तलतचा चेहरा येतो. अर्थात ही त्याची गुणवत्ता समजावयाची की मर्यादा हा प्रश्न प्रत्येकाने आपापली समीकरणं वापरून सोडवावा. अर्थातच नियमाला अपवाद असतो तसा अपवाद इथेही आहे. तरीही ’मेजॉरीटी’ तलतच्या गीतांबाबत हा नियम सिध्द होतो. मधाळ स्वरात गाणार्या तलतची कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात कायम गुंजारव करीत असतात. त्याच्या अनेक गाजलेल्या गीता पैकी एका गाण्याबाबतचा किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे.
हे गीत तलतने गावू नये असं संगीतकार सचिनदेव बर्मन यांना वाटत होते. ते रफीने गायला हवे असे त्यांना वाटत होते. एखादं गाणं कुणी गावं किंवा कुणी गाऊ नाही याचा निर्णय सर्वानुमते होत असला तरी संगीतकाराचं मत हे अंतिम असतं. त्या गाण्यातील भावना, ज्या व्यक्तीवर ते गाणं चित्रीत होणार असेल त्या व्यक्तीची भूमिका/देहबोली, गाणार्या कलावंताच्या स्वराची गुणवत्ता व मर्यादा या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जातो.
तर ते गाणं तलतच्या आवाजाला झेपणार नाही असं सचिनदा यांना वाटले. त्यांचे सहायक त्यावेळी ख्यातनाम संगीतकार जयदेव होते. जयदेव मात्र तलतच्या नावा बाबत आग्रही होते. आशा भोसले त्या वेळी सचिनदाच्या आवडीच्या गायिका होत्या (कारण १९५७ च्या ’सितारों से आगे’ ते १९६३ च्या ’बंदीनी’ पर्यंत तब्बल सहा वर्षे लता त्यांच्या कडे गात नव्हती). आशाजींनी देखील तलतच्या नावावर सकारात्मक मत नोंदवले. पण सचिनदाच्या डोक्यातून काही रफी जात नव्हता. शेवटी बिमलदांनी आपलं मत तलतच्या बाजूने दिले आणि अखेर नाईलाजाने हो नाही करत करत तलतच्या आवाजात ते गाणं ध्वनीमुद्रीत झाले. रिहर्सलच्या वेळी देखील सचिनदा नाखूषच होते वर तलतला म्हणाले ’जर गाणं मनासारखं नाही झालं तर रफीच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करणार!’ तलतने मात्र मन लावून ते गाणं गायलं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना देखील गाणं खूप आवडलं. त्याचं पिक्चरायजेशन परफेक्ट झालं. मजरूह सुलतान पुरी यांना या गाण्याकरीता फिल्म फेअरचे नामांकन देखील मिळाले.
सुनील दत्त – नूतन वर चित्रीत या गाण्यात टेलीफोनचा फार सुंदर उपयोग करण्यात आला होता. आता इतकं सगळ सांगितल्यावर तुम्ही जाणकार वाचकांनी हे गाणं ओळखलंच असणार. हे गाणं होतं ’जलते है जिसके लिए..’ गाण्याला फिल्म फेअरचे अॅवार्ड जरी मिळाले नसले तरी ’क्रिटीक्स अॅवार्ड’ मिळाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गाणं तलतला गायला जमणार नाही असं सचिनदा यांना वाटत होत त्या गाण्याची गोडी आज पन्नास वर्षानंतर देखील अजिबात कमी झालेली नाही! गाणं लोकप्रिय झाल्यानंतर काही महिन्यांनी सचिनदांनी तलतला फोनवर सांगितल, ‘मला माहीत होतं की तू हे गाणं चांगलच गाणार…!’