चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
ख्यातनाम गीतकार साहिर लुधियानवी यांचं जन्मशताब्दी वर्ष आज संपत आहे. ८ मार्च १९२१ रोजी जन्मलेला हा कवी सर्वार्थाने चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला आहे. जेव्हा एखादा प्रतिथयश कवी, चित्रपटांसाठी गीतलेखन करतो, त्यावेळी त्याला अनंत तडजोडी ह्या कराव्याच लागतात. त्याच्या मूळ कवितेतील ‘स्वत्व’ हरवले जाण्याची शक्यताच अधिक असते. त्यामुळेच बऱ्याचदा प्रतिथयश कवींना गीत लेखन जमेलच असं नाही! साहिर लुधियानवीने मात्र चित्रपटात गीत लेखन करताना ‘स्वत्व’ टिकवून ठेवत दर्जेदार गाणी लिहिली सुदैवाने त्याला निर्माते देखील चांगले लाभल्याने त्याच्या गीतांचा दर्जा कुठेही कवितेहुन कमी झालेला वाटत नाही.
आपल्या कडे कलावंतांवर बऱ्यापैकी stamping करण्याची पद्धत आहे. त्याच्या एका विशिष्ट पैलूवर अधिक फोकस केल्याने त्याच्या इतर कर्तृत्वाची फारशी दखल घेतली जात नाही. साहीर हा साम्यवादी विचारांचा कवी होता. पी डी ए चा तो अधिकृत सदस्य होता. त्याच्या काव्यातून कायम त्याचा इझम व्यक्त होत असे. आज जन्मशताब्दी पूर्ण करणाऱ्या साहिरच्या काव्याचा, आजच्या परिप्रेक्ष्या मध्ये जेव्हा आपण विचार करु लागतो त्यावेळी साहिरच्या गीत लेखनातील विविध वैशिष्ट्ये मनाला भुरळ पाडतात. साहीर हा मूळचा तसा डाव्या विचारसरणीचा. (त्याने स्वत: कधी ते नाकबूल ही केले नाही) अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा तिथल्या शोषित/ दलित समाजमनाची स्पंदने टिपणारा! स्त्रियांवरील अत्याचाराने व्यथित होणारा. साहिरच्या लेखणीतून पदोपदी आपल्याला साम्यवाद झळकताना दिसतो. रमेश सैगल यांनी १९५८ साली ‘फिर सुबह होगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट ख्यातनाम रशियन साहित्यकार डोस्तोव्हस्की यांच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटातील गाणी साहीर यांनी लिहिली होती. या गाण्यातून जो साहिर प्रेक्षकांसमोर आला तो पूर्णतः साम्यवादी विचारांचा होता. ‘वो सुबह कभी तो आएगी’ या कवितेतून त्याने इथल्या शोषित समाजाच्या मनातील आशावाद फार सुंदर रीतीने टिपला आहे
‘जब रात का आँचल ढलकेगा,जब दुःख के बादल पिघलेंगे,
जब सुख का सागर छलकेगा,जब अंबर झूम के नाचेगा,
जब धरती नग्में गायेगी,वो सुबह कभी तो आयेगी…
या चित्रपटापासून पुरोगामी विचारांचा कवी अशी साहिर यांची प्रतिमा निर्माण झाली. पुढे ‘प्यासा’तून ती अधिक व्यापक बनली. ‘भूक और प्यास की मारी इस दुनियामे इश्क ही एक हकीकत नही कुछ और भी है’ अशी भूमिका घेणारा साहीर काही वेळा या प्रतिमेला छेद देणारा दिसतो. आपण जेव्हा साहिरच्या रोमँटिक आणि निसर्गाचं सुंदर वर्णन केलेल्या चित्रपट गीतांकडे पाहतो त्यावेळी ‘हाच का तो साहिर?’ असा प्रश्न पडतो. ‘जाल’ या चित्रपटात एक अतिशय सुंदर असं निसर्ग गीत साहिर यांनी लिहिले होते. त्यातील कडव्यात साहीर म्हणतो
पेड़ों की शाखों पे सोई-साई चांदनी
तेरे ख्यालों में खोई—खोई चांदनी
और थोड़ी देर में थक के लौट जाएगी
रात ये बहार की फिर कभी न आएगी
दो एक पल और है ये समां
डोळ्यापुढे निसर्ग उभा करण्याची किमया साहिरच्या काव्यात होती. या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणं डोळ्यापुढे संध्याकाळची रम्य शांतता उभी करते. (हे गाणे ऐकताना मला कायम आपल्या भा रा तांबे यांची पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर…. ही कविता मनाशी रुंजी घालू लागते)
पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साये
खामोशी कुछ बोल रही है
भेद अनोखे खोल रही है
पंख पखेरू सोच में गुम है, पेड़ खड़े हैं सीस झुकाये
पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साये
साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या चित्रपट घेतात असे अनेक शब्द वापरले आहेत जे इतर गीतकारांनी फार कमी वेळेला वापरले आहेत. त्याचाच एक शब्द आहे. मध्दम ! मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘रेल्वे प्लेटफॉर्म’ चित्रपटातील
चांद मद्दम है आसमां चुप है
नींद की गोद में जहां चुप है
दूर वादी में दूधिया बादल, झुक के परबत को प्यार करते है
दिल में नाकाम हसरतें लेकर, हम तेरा इंतज़ार करते हैं.
हाच शब्द साहीर यांनी पुढे काही वर्षानंतर जयदेव यांच्या संगीतात ‘मुझे जिने दो’ या चित्रपटात ‘रात भी है कुछ भीगी भीगी चाँद भी है कुछ मद्धम मद्धम तुम आओ तो आखे खोले सोये हुये पायल की छम छम..’ या गीतात वापरला होता. निसर्गाचा असा बेभान वर्णन करणारा साहीर बघितला की एक वेगळा साहिर सापडल्याचा आनंद होतो. चित्रगुप्त यांच्यासोबत ‘वासना’ या चित्रपटात ‘ये परबतो के दायरे ये शाम का धुआ’ आता इथे बघा ‘शाम का धुंआ’ हा शब्द किती सुंदर आहे! साहीरचे अतिशय अप्रतिम असे ‘पर्वतो के पेडो पर शाम का बसेरा है सुरमई उजाला है चंपई अंधेरा है’ हे गाणे ऐकल्यानंतर कान अक्षरशः तृप्त होतात. ‘सुरमयी उजाला’, ‘चंपई अंधेरा’ किती गोड शब्द आहेत. अतिशय सुरेख आणि सुरेल असे शब्द साहीर च्या काव्यात दिसतात. ‘शगुन’ (१९६४) चित्रपटातील हे गाणे खय्याम यांनी स्वरबध्द केले होते.
त्याची निसर्ग गीते आठवायची म्हटली तर चिक्कार आहेत पु ल देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या कथानकावर आधारित एक चित्रपट आला होता ‘आज और कल’ (१९६३) यातली गाणी साहीर यांची होती. संगीत रवी यांचे होते. आज देखील खूप आवडीने ऐकली जातात.
ये वादियाँ ये फ़िज़ाएं बुला रही हैं तुम्हें
खामोशियों की सदाएं बुला रही हैं तुम्हें |
तरस रहें हैं जवां फूल होंठ छूने को
मचल-मचल के हवाएं बुला रहीं तुम्हें।
तुम्हारी ज़ुल्फों से खुशबू की भीख लेने को
झुकी झुकी सी घटाएं बुला रही हैं तुम्हें |
साहिरच्या ज्या निसर्ग काव्यावर रसिकांनी अतोनात प्रेम केलं तो चित्रपट १९६८ सालचा हमराज. यातील एका गीतात साहीर म्हणतो
शबनम के मोती फूलों पे बिखरें
दोनों की आस फले नीले गगन के तले
बलखाती बेलें मस्ती में खेलें
पेड़ों से मिल के गले नीले गगन के तले….
आठवायला गेलं तर चिक्कार गाणी सापडतील. साहीर याने गाण्यातील सर्व प्रकार हाताळले होते. त्याच्या गजल (मैने शायद तुम्हे पहले भी कही देखा है) जितक्या उत्तम आहेत तितक्याच त्याच्या कव्वाल्या (न तो कारवा की तलाश है) जबरदस्त आहेत. त्याची भक्ती गीत (तोरा मन दर्पण कह लाये) जितकी भक्तीरस पूर्ण आहेत तितकीच त्याची युगल गीते (दिन है बहार के तेरे मेरे इकरार के) गोड आहेत.
आज साहीरच्या निसर्ग गीतांचा आढावा घेताना एका गीताचा उल्लेख मी मुद्दाम शेवटी करतोय. लताच्या आवाजातील हे गीत १९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘घर नं ४४’ या चित्रपटात होतं . सचिन दा यांनी संगीत दिलेलं हे गीत होते. हे गीत तुम्ही नक्की ऐका. सचिनदा यांचे सूर, लताचा स्वर आणि साहीरचे शब्द तुमचा स्वप्नातही पाठलाग करतील!
फैली हुई हैं सपनों की बाह
आजा चल दें कहीं दूर
वही मेरी मंजिल वहीं तेरी राहें
आजा चल दें कहीं दूर
ऊँची घटा के संग तले छिप जायें
धुंधली फिजा में कुछ खोये कुछ पायें
धड़कन की लय पर कोई ऐसी धुन गायें
दे दे जो दिल को दिल की पनाहें
आजा चल दें कहीं दूर
झूला धनक का धीरे धीरे हम झूलें
अम्बर तो क्या है तारों के भी लब छू लें
मस्ती में झूमें और सभी ग़म भूलें
देखें ना पीछे मुड़ के निगाहें
आजा चल दें कहीं दूर…..