‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
साहिर लुधियानवी, जावेद अख्तर आणि २०० रुपये !!
लिजेंडरी लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील हा किस्सा आहे. जावेद साहेब त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नुकतेच एक-दोन प्रोजेक्ट करून थोडेसे नावारूपाला आले होते. त्या काळात एकामागून एक प्रोजेक्ट कधीच मिळत नव्हते यामुळे जावेद साहेबांमागे नेहमी पैशाची चणचण असायची. त्यांना घरून काहीच सपोर्ट नव्हता. त्यांची आई खूप आधी वारली होती आणि त्यांचे आपल्या वडिलांसोबत कधीच जमलं नाही. प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी हे त्यांचे खूप घनिष्ट मित्र होते. जेव्हा जेव्हा पैशांची गरज असायची जावेद साहेब साहिरकडे जात असत. पण ते पैशांची मागणी न करता त्यांना काम मागायचे. एकदा ते असेच त्यांच्याकडे गेले होते. साहिरनी त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी ओळखली आणि त्यांना म्हणाले, “ये नौजवान कस काय येणं केलंस?” त्यावर जावेदसाहेब बोलले की, “माझ्याजवळचे पैसे संपत आले आहेत तेव्हा एखाद काम मिळतंय का ते बघा.”
आता साहिरची एक सवय होती ते जेव्हा जेव्हा विचार करीत तेव्हा तेव्हा पॅण्टच्या मागच्या खिशातून एक छोटा कंगवा काढून केसातून फिरवत असत. जावेद साहेबांसमोर सुद्धा त्यांनी तसेच केले आणि थोडावेळ विचार केल्यानंतर ते बोलले की, “जरूर जरूर हा फकीर नक्कीच बघेल काय करता येईल का.. आम्ही सुद्धा असे दिवस बघितले आहेत..” आपल्या समोरच्या छोट्या टेबलाकडे इशारा करत ते जावेदसाहेबांना बोलले की, “सध्या हे घे आपण करूया काहीतरी..” त्या टेबलावरती २०० रुपये ठेवले होते. साहिरची एक सुंदर सवय होती की, ज्याला मदत करतोय त्या व्यक्तीला ते हाताने पैसे देत नसत जेणेकरून त्याला वाईट वाटू नये आणि त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यांशी डोळा मिळवावा लागू नये.
पुढे जावेद (Javed Akhtar) साहेबांकडे खूप सारे प्रोजेक्ट्स आले, त्यांचे त्रिशूल, दिवार आणि काला पत्थर या फिल्मचे गीत साहिरच लिहीत होते त्या कारणामुळे जावेद साहेब आणि साहिर यांचे खूप वेळा भेटणं होई आणि ते स्टोरी, डायलॉग्स आणि गाणी याबद्दल चर्चा करीत असत आणि तेव्हा जावेद अख्तर मिश्कीलपणे साहिरना म्हणत की, तुमचे २०० रुपये माझ्याकडे आहेत आणि मी कधीपण देऊ शकतो पण मी ते देणार नाहीये यावर बैठकीतील सगळे चकित होत आणि जेव्हा याबद्दल साहिरना विचारत तेव्हा ते जावेद अख्तर यांच्याकडेच याबाबत विचारणा करावी असे सांगत, पुढे अशा अनेक मैफिली, गाठीभेटी होत गेल्या दोघांमधील स्नेह वाढत राहिला. अखेरीस तो काळा दिवस उजाडला २५ ऑक्टोबर १९८० रोजी साहिरचे निधन झाले. जावेद साहेबांना साहिरच्या फॅमिली डॉक्टरचा कॉल आला आणि डॉक्टरांचा आवाज गोंधळलेला आणि कंप पावत होता. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, साहिर लुधियानवी यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यातच त्यांचे निधन झाले. जावेद साहेबांना ही बातमी ऐकताना कानात कोणीतरी शिसे ओतत असल्यासारखं वाटलं. त्यांच्यासाठी ही बातमी पचवणे हे विष पचवण्यापेक्षा अवघड गेले.
ते जेवढ्या लवकर पोहचता येईल तेवढ्या लवकर साहिरच्या घरी पोहचले आणि तिथे तोपर्यंत साहिरच्या दोन्ही बहिणी, बी.आर.चोप्रा आणि इंडस्ट्रीमधील खूप सारी मंडळी जमली होती. उर्दू आणि हिंदी भाषेत ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान पटकवलेल्या शायरला आज पांढऱ्या कपड्यात लपेटलेल होत. त्यांनी त्यांच्या तोंडावरून चादर दूर केली तर त्यांचे दोन्ही हात त्यांच्या छातीवर होते. जावेद साहेबांच्या डोळ्यांसामोरून सुरुवातीचा काळ झर्रकन गेला. त्यांना जाणवले की, या हातांना आपण किती वेळा तरी स्पर्श केला होता व याच हातांनी कितीतरी अजरामर, अभिजात अशी सुंदर गाणी लिहिली होती आणि आज एका क्षणात हा हात एकदम थंड पडला आहे.
रात्रभर वाट पाहिल्यावर त्यांचे जुहूच्या कब्रिस्थानात इस्लामिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. जुहूच्या दफनभूमीत मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मधुबाला यांना दफन करण्यात आले होते आणि आता त्यांना साहिरची संगत लाभली. दफनविधीला आलेले सर्व लोक काही वेळाने निघून गेले फक्त जावेद साहेब खूप वेळ त्यांच्या कबरीपाशी बसून होते.(Javed Akhtar)
========
हे देखील वाचा : … आणि विवेक ओबेरॉय झोपडपट्टीत राहायला लागला.
========
पुढे ते तिथून खूप वेळाने उठले आणि ओल्या डोळ्यांनी निघून आपल्या कारमध्ये बसणार इतक्यात त्यांना मागून कोणीतरी त्यांना हाक मारली. जावेदजींनी मागे वळून पहिले. हाक मारणारी व्यक्ती होती साहिरचे जवळचे मित्र अशपाक! अशपाक हे त्यावेळच्या प्रसिद्ध लेखिका वहिदा तबस्सुम यांचे पती होते. त्यांना खूप सकाळी सकाळी साहिरच्या निधनाची बातमी मिळाली होती आणि ते नाईटसूटमध्येच दफनविधीसाठी आले होते. ते जावेदसाहेबांच्या (Javed Akhtar) गाडीजवळ आले आणि त्यांना बोलले की, तुमच्याकडे पैसे आहेत का ? जावेदजी बोलले “हो आहे ना पण कशासाठी हवे आहेत?” आणि बोलत बोलत त्यांनी आपले पाकीट काढले. अशपाक उत्तरले की, ते कब्र बनवणाऱ्याला द्यायचे आहेत. जावेद साहेबांनी विचारले की “किती द्यायचे आहेत ?”.. अशपाक बोलले “दोनशे रुपये !!!”