‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
साहिर, संगीतकार आणि गायकांच्या मानधनापेक्षा एक रुपया जास्त घ्यायचे!
साहिर लुधियानवी!
आपल्या अजरामर लेखणीतून बहुविध मानवी पैलूंवर थेट बोट ठेवत जीवनाचे अत्यंत समर्पक चित्र रेखाटणारा अवलिया. ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ अशा शब्दांमधून नात्यांमधील गुंतागुंतीला डावलून प्रेम आणि त्या व्यक्तीच्या असण्याचा हट्ट धरण्याचा आशावाद असो अथवा ‘मै पल दो पल का शायर हू’ म्हणत काळासमोरील माणसांच्या अस्तित्वमर्यादा रेखाटून स्वत्वाचं खुजेपण रेखाटणे असो. साहिर सगळ्या पातळ्यांवर तेवढाच प्रभावी जाणवत राहतो. साहिरच्या गीतांमध्ये जेवढं वैविध्य आढळून येतं तेवढंच किंबहुना त्याहून जास्त उतार-चढावाचं त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे.
१९२१ साली लुधियानात जन्मलेल्या साहिर (Sahir Ludhianvi) यांचं बालपण खडतरच राहिलं. लुधियाना या जन्मगावामुळे साहिर, लुधियानवी असं लावायला लागले. वडिलांच्या दारुच्या व्यसनाने त्यांच्या जडणघडणीवर बराच नकरात्मक प्रभाव पडला. आपल्या आईवर अतोनात प्रेम करणाऱ्या साहिरने आपल्या वडिलांबद्दल मात्र अत्यंत कटूता बाळगली. महाविद्यालयीन काळापासूनच साहिर आपल्या लेखनासाठी प्रसिद्ध होते. फाळणीनंतर साहिरने (Sahir Ludhianvi) पाकिस्तानातून भारतात येणे पसंद केले.
जेव्हा साहिर (Sahir Ludhianvi) पहिल्यांदा मुंबईला आले. त्यांच्याकडे कुठलेही काम नव्हते. कवीच्या भूमिकेतील त्यांचं काम सुरु होतंच, परंतु अर्थार्जनासाठी अजून काहीतरी करणे गरजेचे होते. सुरुवातीच्या काळात जेव्हा साहिरकडे कुठलेही काम नव्हते तेव्हा त्यांचा मित्र, मोहन सेहगल यांनी साहिरला सांगितले की एस.डी. बर्मन एका गीतकारच्या शोधात आहेत. साहिर थेट त्यांना भेटायला जाऊन पोहोचले. बर्मन साहेबांनी त्यांना एक ट्यून दिली आणि त्यावर काही ओळी लिहायला सांगितलं. साहिरने काही क्षणातच ओळी लिहून दिल्या, ज्या बर्मन साहेबांना एवढ्या भावल्या की पुढे कित्येक वर्ष ते साहिर सोबत काम करत राहिले. साहिरने त्या लिहिलेल्या ओळी लता मंगेशकर यांच्या आवाजात अजरामर झाल्या. त्या ओळी होत्या, ‘ठंडी हवाएं लेहराके आये रुत है जवान तुमको यहाँ कैसे बुलाए…’
लता मंगेशकर यांनी साहिर (Sahir Ludhianvi) यांची बरीच गाणी गायली आहेत. एका कार्यक्रमात साहिर आणि लता मंगेशकर यांनी सोबत हजेरी लावली होती तेव्हा त्या कार्यक्रमात कुणीतरी साहिर यांना बोललं, साहिर साहब, तुमच्या गाण्याला लतादीदींच्या आवाजामुळे वजन प्राप्त होतं. लतादीदींचा आवाज नसेल तर तुमचं गाण काहीच नाही. असं बोलणं साहिरच्या पचनी पडलं नाही. त्यांनी तिथेच लतादीदींच्या समोर बोलून टाकलं, माझ्या शब्दांना कुणा एका व्यक्तीच्या आवाजाची गरज नाही. यानंतर लता माझे गाणी गाणार नाही. मग काय, त्यानंतर जवळपास दोन वर्षे त्यांचं कुठलही गाणं त्यांनी लतादीदींना गाऊ दिलं नाही. फिल्म कंपनीसोबत करार करतांना त्यांची पहिली अट हीच असायची, माझं गाणं लता गाणार नाही. यादरम्यान त्यांची गाणी सुधा मल्होत्रा या त्यांच्या मैत्रिणीने गायले.
साहिर (Sahir Ludhianvi) पहिले असे गीतकार होते ज्यांनी गीतकारांच्या कामाला अपेक्षित ओळख मिळावी म्हणून आवाज उठवला. कुठल्याही गीताचा पाया गीतकार रचत असतो, जर शब्दच नसतील तर गीत कुठून येईल असं त्यांचं म्हणण होतं. आपलं म्हणण त्यांनी आपल्या वागण्यातूनदेखील दाखवून दिलं. कुठल्याही फिल्मवर काम करतांना त्यांनी संगीतकार, गायकांपेक्षा एक रुपया जास्त घ्यायला सुरुवात केली. प्यासा मधील त्यांच्या गाण्यांनी तेव्हा अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
साहिरच्या (Sahir Ludhianvi) जीवनाकडे नजर टाकली की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू लक्षात येतात. साहिरचे अत्यंत खास मित्र राहिलेले प्रकाश पंडित एकदा साहिर यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. बाहेर हॉलमध्ये एक निर्माता बसून होता. विचारपूस केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तो बराच वेळ झाला तिथे बसून आहे. प्रकाश यांनी आत जाऊन बघितलं तर साहिर त्यांच्या रूमच्या बाल्कनीमध्ये अत्यंत शांतपणे सिगरेट ओढत येरझारा घालत होते. प्रकाश या प्रकाराने आश्चर्यचकित झाले. साहिरने उत्तर दिलं, मी फिल्म साईन केल्याशिवाय हा काही इथून हलणार नाही. जेव्हा मला कामाची गरज होती आणि मी याच्या ऑफिसमध्ये काम मागण्यासाठी गेलो होतो, तेव्हा याने मला कित्येक तास बाहेर ताटकळत बसायला लावलेलं. आता त्याला बघू दे. जगाने जे काही मला दिलय तेच मी परत करेल, असं साहिर बोलायचा आणि तसच वागायचा देखील.
======
हे देखील वाचा : राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर झळकणार
======
साहिरने (Sahir Ludhianvi) गीतांना, गझलांना एका नव्या आयामातून बघितलं. प्रेम, सौंदर्य यांच्यापलीकडे जाऊन जीवनाला भेडसावणाऱ्या वास्तवी विस्तवाला आपल्या शब्दांमधून तो हवा देत राहिला. प्रेमाची संकल्पना वैश्विक कशी असते, प्रेमात पडलेल्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण सृष्टीदेखील प्रेमात पडते याची जाणीव साहिरच्या गीतांमधून होते.
‘इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर
हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से’
ताजमहालबद्दल साहिर (Sahir Ludhianvi) जेव्हा असं म्हणाला तेव्हा गोंधळ उडाला. प्रेमाचं प्रतिक मानल्या गेलेल्या ताजमहालला या आयामातून बघणं फक्त साहिरलाचं शक्य झालं. १९८० साली साहिर गेला. पण त्याच्या येण्याजाण्याच्या या युगाच्या पटलावरील छोट्या ठिपक्यात साहिरचे शब्द युग व्यापुन बसलेत एवढं मात्र नक्की!