ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
बाईंडरचे दिवस
“मी बाईंडर लिहिला नसता तर आज सारंग जिवंत असता” नाटककार विजय तेंडुलकर यांचे हे विधान खूप काही सांगून जाते. आज २५ सप्टेंबर. सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग यांचा स्मृतिदिन. कमलाकर सारंग यांचं नाव घेतलं की, घरटे अमुचे छान, बेबी, जंगली कबुतर अशी नाटकं आठवतात पण त्याहीपेक्षा आठवते त्यांनी दिग्दर्शित केलेले बहुचर्चित नाटक ‘सखाराम बाईंडर’.
‘मराठी रंगभूमीला हादरवून टाकणारं नाटक’ असंच याचं वर्णन करता येईल. विजय तेंडूलकर यांना वाईला हा खराखुरा बाईंडर भेटला. त्याने ठेवलेली बाई खानावळ चालवत असे. एकदा गप्पांच्या ओघात तेंडुलकरांनी ही सखारामची अनोखी गोष्ट अभिनेता श्रीराम लागू यांना सांगितली. त्यात विलक्षण नाट्यमयता आहे, हे जाणून ह्या नाटकाचं लेखन तेंडुलकरांनी सुरू केलं. बाईंडरचं काम करणारा सखाराम लग्नसंस्थेवर आणि एकाच बाईसोबत आयुष्य काढता येतं, यावर अजिबात विश्वास न ठेवणारा. तो अनाथ, असहाय स्त्रीला घरी आणतो. तिच्यासोबत रहातो आणि एकत्र राहण्याची इच्छा मिटली की तिची रीतसर साडीचोळी देऊन रवानगी करतो. मानसिक गुंतवणूक त्याला मान्य नाही. अशा या सखारामच्या आयुष्यात दोन स्त्रिया येतात. लक्ष्मी आणि चंपा. त्यानंतर घडतं ते नाटक.
२ फेब्रुवारी १९७२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर इथे पार पडला. तो काळ लक्षात घेता नाट्यविषय आणि नाटकाचं सादरीकरण बोल्डच होतं. एका प्रसंगात चंपा रंगमंचावर साडी बदलत असे. त्या काळातील प्रेक्षकांसाठी हे सारंच नवं होतं. सखाराम बाईंडरच्या भूमिकेतील निळू फुले, लक्ष्मी झालेल्या कुसुम कुळकर्णी आणि चंपाच्या भूमिकेतील लालन सारंग यांच्या तगड्या अभिनयाने हे नाटक म्हणजे एक उत्तम अनुभव ठरत होतं. पण हे नाटक अश्लील आहे, हे नाटक लग्नसंस्था मोडीत काढणार अशा आक्षेपांनी जोर धरला. आणि उत्तम प्रतिसादात चालू असलेल्या नाटकावर १३ प्रयोगांनंतर सेन्सॉरची बंदी आली.
हेही वाचा : नाट्यप्रयोगात बाळ रडतं तेव्हा…
इथे वास्तविक कमलाकर सारंग वा विजय तेंडुलकर तो विषय सोडून देऊन गप्प बसू शकले असते; पण विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होता. कमलाकर सारंग यांनी कोर्टात जायचा निर्णय घेत हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतरचा आठ महिन्यांचा काळ कठीण होता. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. काही अपवाद वगळता मराठी नाट्यसृष्टी दुर्देवाने कमलाकर सारंग यांच्यामागे उभी राहिली नाही. चंपाची भूमिका साकारताना रंगमंचावर साडी बदलणा-या लालन सारंग यांना साडीचोळीची भेट दिली गेली. नाटकावर बंदीचा ठराव आणला गेला. आणि हरप्रकारे नाटकाची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. या काळात नोकरीदार कमलाकर सारंग सकाळी ऑफिस गाठत. तिथे थोडावेळ राहून मग त्यांचा उरलेला वेळ कोर्टातील सुनावणीसाठी कागदपत्रे, कात्रणे नीट लावून ठेवणे, वकीलांशी चर्चा, कोर्टात हजेरी यात जात असे. आठ महिन्यांनी केसचा निकाल लागला. ‘बाईंडर’ कोर्टात जिंकले. पुन्हा प्रयोग सुरू झाले. पण या सगळ्या धांदलीत कमलाकर सारंग यांची नोकरी गेली. आरोग्याची अपरिमित हानी झाली. त्यानंतरची त्यांची अनेक नाटकं गाजली. पण १९९८मध्ये कमलाकर सारंग यांच्या निधनानंतर प्रथम स्मृतिदिनी झालेल्या कार्यक्रमात विजय तेंडुलकर यांचे विधान खूप बोलके होते. “मी बाईंडर लिहिला नसता तर सारंग आज जिवंत असता”.
नाटक ही एक अशी कला आहे जिथे जरतरला अर्थ नसतो. कमलाकर सारंग यांच्या नाट्यजाणीवेने बाईंडर साठी उभं रहायचा निर्णय घेतला होता. आज ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक मराठीतच नाही, तर भारतीय रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरलेलं नाटक म्हणून पाहिलं जातं. निळूभाऊंनंतर सयाजी शिंदे, कुसुम कुळकर्णींच्याजागी प्रिया तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत अशा विविध कलाकारांनी हे नाटक आजमावलं. गिरीश कर्नाड यांनी, “हजार वर्षांत असं नाटक झालं नाही” असं या नाटकाचं वर्णन केलं होतं. पण कमलाकर सारंग यांनी या नाटकासाठी ठामपणे लढण्याचा निर्णय घेतला नसता तर काळपुरुषाच्या पोटात गायब झालेल्या असंख्य कलाकृतींप्रमाणे बाईंडरही नाहीसा झाला असता. आज कमलाकर सारंग यांच्या स्मृतीदिनी त्यांना आठवताना त्यांचं हे धाडसी पाऊल निश्चितच स्मरणात राहील.