
‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर; ‘सयाजी शिंदे’ साकारणार विजय तेंडुलकरांची गाजलेली भूमिका!
मराठी रंगभूमीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे एक अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रथम सादर झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. विविध भाषांमध्ये याचे अनेक प्रयोग झाले असून मराठीतही हे नाटक अनेक संस्थांनी वेळोवेळी पुन्हा सादर केले आहे. आणि आता, हे वादळी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर गाजणार आहे.(Sakharam Binder Return)

स्त्री-पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला हादरा देणारे ‘सखाराम बाइंडर’ आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. विशेष म्हणजे, या नाटकातील सखारामची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे साकारणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात या नाटकाचे पोस्टर अनावरण झाले. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सहकार्याने सादर होणारे हे नाटक या निर्मिती संस्थेचे तिसरे नाट्यपुष्प आहे.

“हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. रसिकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की, आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नसल्याने या निमित्ताने त्यांनाही ही अभिजात कलाकृती अनुभवता येईल. दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव म्हणाले, “अभिजात कलाकृती पुन्हा सादर करणे ही मोठी जबाबदारी आहे. तेंडुलकरांच्या लेखनाला कुठेही धक्का लागू न देता, आजच्या पिढीला त्यांच्या लेखनाची श्रेष्ठता समजावी हा आमचा प्रयत्न आहे. दिग्दर्शनाची शैली लोकाभिमुख असून, सर्वानुमते विचार घेऊन आम्ही हे नाटक सादर करत आहोत.” (Sakharam Binder Return)
==================================
==================================
या नाटकात सयाजी शिंदे यांच्यासोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे आणि अभिजीत झुंजारराव हे कलाकार झळकणार आहेत. निर्माते मनोहर जगताप, कार्यकारी निर्माते निखिल जाधव, संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत, वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. सहाय्यक म्हणून संकेत गुरव कार्यरत आहेत. मराठी रंगभूमीवरील हा नवा प्रवास आणि जुन्या कथेला दिलेलं नवं रूप प्रेक्षकांसाठी नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे.