आयुष्यावर बोलणारा सलील जेव्हा संदीपच्या वेडेपणावर बोलतो…(Saleel-Sandeep)
कोण म्हणतं फक्त कविता किंवा अनप्लग्ड गाणी हिट होत नाहीत… अगदी ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ सारख्या बालगीतांपासून ते ‘आणि तिच्या हातानी जखमा या भर’, या हळव्या मनाच्या प्रेमकवितांपर्यंत, इतकेच नव्हे तर ‘मी मोर्चा नेला नाही’ ही समाजाचे प्रतिबिंब मांडणारी कविता असो किंवा ‘नसतेस घरी तू जेव्हा’ या शब्दातून जाणवणारी विरहाची भावना असो, किंवा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरच्या भावनांना शब्दसुरांच्या मुठीत पकडणारी जोडी म्हणजे डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे (Saleel-Sandeep).
मनोरंजन सृष्टीत गीत-संगीताच्या परंपरेचा हा इतिहासच आहे की, इथे एकत्र आलेल्या जोड्यांनी कमाल केली आहे. गाणे ओठावर आले की, त्यासोबत गीतकार आणि संगीतकार आठवल्याशिवाय राहत नाही. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी कवितांमधील शब्दांना गाण्याच्या लयीत बांधत एक पर्व साजरं केलं. सलील आणि संदीपची कवितामय गाणी ऐकत तरुणाईची एक पिढी मोहरली.
कविता आकाराला येणे आणि त्या कवितेचे गाणे होणे, हे करताना गीत आणि संगीतकाराची जोडीही एकमेकांमध्ये समरस होत असेलच. ‘आयुष्यावर बोलू काही’ या संकल्पनेला ज्यांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला ते संगीतकार गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि गीतकार कवी संदीप खरे हे दोघेही दुधसाखरेप्रमाणे एकमेकात इतके विरघळून गेले आहेत. याची प्रचिती देणारा एक भन्नाट किस्सा डॉ. सलीलने शेअर केला. (Saleel-Sandeep)
‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे सलील जेव्हा त्यांचा मित्र संदीप खरेच्या वेडेपणावर बोलतात तेव्हा ते ऐकणंही पर्वणीच. पण त्यासाठी कोणताही नवा कार्यक्रम घेऊन ते आलेले नाहीत, तर एका मुलाखतीमध्ये सलील यांनी संदीपमधला अवलिया उलगडून दाखवला.
हे दोघंही दोन टोकाचे अवलिया आहेत. एक सुरांमध्ये माहीर, तर दुसरा शब्दांचा सवंगडी. सलील सांगतात, “आपल्याला माणूस म्हणून समाजात वावरताना खूप गोष्टी खुपत असतात. म्हणजे साधंच बघा, पैसे भरून आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथे प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते. ती अपेक्षा रास्तही आहे. मग ती सुविधा काही कारणाने किंवा त्यांच्या अडचणीमुळे मिळाली नाही, तर संदीप खूप अस्वस्थ होतो. अशावेळी एरवी शांत असलेल्या संदीपचा जणू तिसरा डोळा उघडतो.
कुठेही जाताना रस्ता खराब असल्याने गाडीत धक्के बसले की, सुरुवातीला नाराजी व्यक्त करणारा संदीप थेट व्यवस्थेवरच हल्ला चढवतो. त्याच्या ‘मोर्चा’ कवितेतल्या दगडासारखा तो त्याचा राग भिरकावतो. संदीपचा हा वेडेपणा योग्य असला तरी थोडा नियंत्रणात हवा.” असा सल्लाही सलील त्याला मित्रत्वाच्या नात्याने नेहमी देत असतात.
संदीपला जेव्हा एखादी गोष्ट करावीशी वाटते तेव्हाच तो ती करतो. म्हणजे, आपण अनेकदा जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतो, पण संदीपचे जेवणाच्या वेळेशी काहीही देणंघेणं नसतं. संदीप त्याला भूक लागेल तेव्हाच तो जेवतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही दौऱ्यावर असतो तेव्हा जेवणाची वेळ झाली की, आम्ही गाडी थांबवून जेवतो. संदीप त्यावेळी पंगतीला बसत नाही आणि मग दुपारी साडेतीनला त्याला भूक लागली की, आमची गाडी संदीपच्या पोटपूजेसाठी थांबवली जाते.
धीरगंभीर तर कधी विरहाच्या शब्दांची गाणी करणारा कवी संदीप अर्थातच मूडी असणार यात शंका नाही. संदीपने लिहिलेली एखादी ओळ सलीलच्या संगीताच्या मीटरमध्ये बसत नसेल, मग त्यात बदल करावा असं सलीलला वाटलं, तर संदीपच्या कविमनाला खटकलं असेल का? कधी असा प्रसंग आला असेल का, या दोघांच्या आयुष्यात?
या प्रश्नाचं सलील यांनी दिलेलं उत्तर ऐकणंही रंजकच. सलीलच्या शब्दात सांगायचं तर, “संदीपच्या शब्दातच प्रचंड ताकद असते आणि त्याला स्वरांची जाण असल्याने अशी वेळ खूप कमी वेळा येते. जेव्हा मी आधी चाल बांधतो आणि त्यावर संदीपला शब्द लिहायचे असतात तेव्हा मीटर बदलाच्या गोष्टी आमच्यात अगदी दिलखुलासपणे होतात.”
हे ही वाचा: ‘द फॅमिली मॅन’: पडद्यावर नि पडद्याआड!
वाचा! अंगातील कलेच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शंभरकशी सोन्याचा जीवन प्रवास
या प्रश्नावर संदीप मिश्कीलपणे सांगतो, “कुणी कुणाला प्रपोज केलं हे महत्त्वाचं नसतं, तर दोघांचं जमून संसार सुरू होण्यात आनंद असतो. माझी कविता आणि सलीलचं संगीत यांचंही नातं असंच आहे. माझं कमी की तुझं जास्त यापेक्षा दोघांचं मिळून जे श्रवणीय ते फायनल हे आमचं सूत्र आहे.”
हे देखील वाचा: ब्लॉग: ‘83’ चित्रपटाच्या निमित्ताने
सलील आणि संदीप (Saleel-Sandeep) या दोघांमधला समान धागा हा आहे की, हे दोघेही गायक आहेत. सूर जुळणं काय असतं, हे या दोघांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच सलीलने सांगितलेला हा किस्सा ऐकल्यावर या जोडीचे सूर फक्त रंगमंचावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही जुळलेले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.