Salman Khan गोळीबार प्रकरणात आरोपी अनुजचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे हायकोर्टाने दिले आदेश
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी उच्च न्यायालयाने आता नवा आदेश दिला आहे. पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुजचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. आरोपी अनुजच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.अलीकडेच सुपरस्टार सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आरोपी अनुज थापनच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हत्येला आत्महत्येसारखे बनवल्याचा आरोप केला आहे. याशिवाय कुटुंबीयांनी अनुजचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.(Salman Khan House Firing)
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या अनुज थापनचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने वैद्यकीय अधीक्षकांना पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या कोर्टाने याचिकाकर्त्याला १० मे पर्यंत मृतदेह फरीदकोट येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने या प्रकरणावर काहीही भाष्य न करता पंजाब सरकारला अनुजचे दुसरे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. अनुजची आई रीता देवी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत. रीता देवी यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. अनुजच्या आईने दाखल केलेल्या याचिकेत आपल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्याची योग्य चौकशी करण्यात यावी, असा आरोप केला आहे.(Salman Khans House Firing)
=================================
हे देखील वाचा: ‘या’ कारणांमुळे नेटफ्लिक्सवर जादू नाही पसरवू शकला कपिलचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’
=================================
14 एप्रिलरोजी सकाळी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. या प्रकरणी ३२ वर्षीय अनुजला २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती. अनुजवर आरोप आहे की, त्याने त्या दिवशी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवली होती.