Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!
काही पुरस्कार फारच गाजतात. त्या निवडीवरुन फार आश्चर्य व्यक्त होते. उलटसुलट चर्चा रंगते. कधी लहान मोठे वादही होतात. कधी तर परीक्षक कोण होते यापर्यंत ती चर्चा जाते. १९७५ च्या तेराव्या राज्य चित्रपट महोत्सवात अगदी हेच घडले आणि त्याची आजही आठवण काढली जाते. हे विशेषच. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक एक, ‘पांडू हवालदार’ सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन ‘सामना’ सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक तीन ‘बायानों नवरे सांभाळा’.
याच क्रमाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून दादा कोंडके, डॉ.जब्बार पटेल आणि दत्तात्रय कुळकर्णी यांची निवड झाली. १९७५ साली एकूण सतरा मराठी चित्रपट सेन्सॉर संमत झाले. त्या काळात वर्षभरात पंधरा ते वीस मराठी चित्रपट प्रदर्शित होत. ते देखील पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, खानदेश असा प्रवास करायला काही मराठी चित्रपटांना वर्ष, दीड वर्ष लागत. तो चित्रपटाची प्रिन्ट (रिळे) असल्याचा काळ होता. (Bollywood latest news)
त्या काळात या निवडीवरुन बरीच चर्चा झाली. या प्रत्येक चित्रपटाचा विषय व व्यक्तिमत्व भिन्न. हे प्रत्येक चित्रपट आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यांनी भारी गाजले. पण तुलना करण्याचा एक मोह असतोच ना? तशी एक परंपरा आहे ना? ती अजिबात स्वस्थ बसू देत नाही. विशेषत: पहिल्या दोन क्रमांकातील चित्रपटावरुन तात्कालिक समिक्षक/ विश्लेषक यांनी प्रसार माध्यमातून बरेच काही लिहिले वा म्हटले. ‘सामना’ हा वेगळ्या प्रवाहातील चित्रपट तर ‘पांडू हवालदार’ तद्दन व्यावसायिक मनोरंजक चित्रपट असे असताना असा निकाल लागला तरी कसा असाच या सगळ्यात सूर होता. पण परीक्षकांचा निर्णय अंतिम असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारणार की नाही?(Bollywood news)

‘सामना’ या चित्रपटांचे हे पन्नासावे वर्ष हे आणखीन एक विशेष. ‘सामना’ पुणे शहरातील प्रभात चित्रपटगृहात १० जानेवारी १९७५ रोजी प्रदर्शित झाला पण त्याला किरकोळ प्रतिसाद मिळत होता. मुंबईत ‘सामना’ १४ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रदर्शित झाला. (त्याच दिवशी मुंबईत ‘आंधी’ चित्रपटही प्रदर्शित झाला). अन्य काही लहान मोठ्या शहरात, ग्रामीण भागात सामना एक दोन आठवढे मुक्काम करीत करीत वाटचाल करीत असतानाच २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली आणि काही महिन्यांतच ‘सामना’, ‘आंधी’ या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. यावरुन त्या काळात झालेच पण आजही बरीच चर्चा होत आहे. आणीबाणीनंतर पुन्हा ‘सामना’ पुन्हा प्रदर्शित झाला तोच रसिकांच्या उत्फूर्त प्रतिसादात. एकदमच सुपरहिट. त्याचा विषय, संवाद, अभिनय व संगीत या सगळ्यालाच सकारात्मक दाद. उलटसुलट चर्चेने त्यात भरच पडत राहिली. (Bollywood update)
‘पांडू हवालदार’ पुणे शहरात अलका चित्रपटगृहात १९७५ च्याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला (या दिवशी खरं तर गुरुवार होता. त्या रजेचा फायदा फायदा झालाच) मुंबईत ‘पांडू हवालदार’ २ मे रोजी दादरचे कोहिनूर चित्रपटगृह व इतरत्र प्रदर्शित झाला. आणि पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केला गेला. ‘सामना’ हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. मराठी रंगभूमीवरील एक ताकदीचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात. ‘पांडू हवालदार’ हा दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट. तत्पूर्वी त्यांनी अभिनित व निर्मित केलेल्या सोंगाड्या (१९७१) व ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२) या चित्रपटांचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे तर ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३) या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश यांचे होते. (Bollywood masala)

यशाच्या हॅटट्रिकने दादा कोंडके यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. राजेश मुजुमदार यांच्या कथा पटकथा व संवाद यांवर त्यांनी पांडू हवालदार दिग्दर्शित केला. उषा चव्हाण नायिका आणि अशोक सराफची अतिशय लक्षवेधक अशी बेरकी भूमिका. विजय तेंडुलकर यांनी तात्कालिक ग्रामीण राजकारणाचे भेदक दर्शन घडवणारा असा टोकदार ‘सामना’ लिहिला. या चित्रपटाच्या कथा व संवाद यासाठी विजय तेंडुलकर यांची राज्य चित्रपट महोत्सवात निवड झाली. निळू फुले व डॉ श्रीराम लागू यांच्यातील अभिनयाचा जबरदस्त ‘सामना’ या चित्रपटात पाहायला मिळतो. (“अभिनय कसा करावा”, “अभिनय कसा असतो” यासाठी हा चित्रपट उत्तम आदर्श आहे. अभिनय क्षेत्रात येणाऱ्यांनी तर नक्कीच पाहावा) निळू फुले यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तर अशोक सराफ यांना पांडू हवालदारसाठी विशेष अभिनेता म्हणून राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाला. (Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
=================================
‘सामना’ चित्रपटाला उत्कृष्ट छायाचित्रण सूर्यकांत लवंदे आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक रामनाथ जठार हे पुरस्कार प्राप्त झाले. ‘पांडू हवालदार’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा राजेश मुजुमदार व संकलन एन. एस. वैद्य यांना पुरस्कार प्राप्त झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट ‘सामना’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. तसेच बर्लिन चित्रपट महोत्सवातही ‘सामना’ दाखवला गेला. हा अतिशय मानाचा क्षण ठरला. अशी मोठी झेप घेण्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटाला दुसरा क्रमांक आणि ‘पांडू हवालदार’ला प्रथम पुरस्कार असे कसे? असा त्या काळातील चित्रपट विश्लेषकांचा थेट प्रश्न होता. (Pandu hawaldar movie)
‘सामना’ चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहरातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातात या चित्रपटाचा खास खेळ आणि एका परिसंवादाचे करण्यात आलेले प्रयोजन यशस्वी व कमालीची बहुचर्चित ठरले. पुणे शहरातील चोखंदळ चित्रपट रसिकांचा या खेळास अतिशय उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तो असा व इतका की, खेळ हाऊसफुल्ल असल्याने अनेकांना माघारी जावे लागले (दर्जेदार चित्रपट हा कायमच दर्जेदार व लक्षवेधक असतो. तो कायमच असा उत्तम प्रतिसाद मिळवतो.) याच सोहळ्यात मी निर्माते रामदास फुटाणे यांना ‘पांडू हवालदार’ सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक एक आणि ‘सामना’ सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन असे का असे विचारले असता त्यांनी चांगले उत्तर दिले. आपण ‘सोंगाड्या’ व ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांच्या वेळेस दादा कोंडके यांच्या सदिच्छा चित्र या निर्मिती संस्थेत निर्मिती व्यवस्थापन पाहत होतो. त्यांच्याकडेच चित्रपट निर्मितीच्या गोष्टी शिकलो. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटाला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचा मला आनंदच झाला. ‘सामना’ वेगळा व ‘पांडू हवालदार’ वेगळा. दोन्ही चित्रपट आपापल्या जागी सरसच, असेही ते म्हणाले.(Samana movie)
================================
हे देखील वाचा: Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
=================================
असो. एखाद्या चित्रपटाचा पन्नास वर्ष पूर्णतेचा सोहळा प्रसार माध्यमातूनही गाजला हे विशेषच. मुंबईत फिल्म हेरिटेज फाऊंडेशनच्या वतीने दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात यश चोप्रा दिग्दर्शित दीवार, रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले यांच्या पन्नाशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खास खेळानांही अशीच हाऊसफुल्ल गर्दी झाली. त्यांनीही सामना, पांडू हवालदार यांच्या पन्नाशीनिमित्त खास खेळ आयोजित करायलाच हवेत. त्यांना मराठी तर झालेच पण अन्यभाषिक चित्रपट रसिकही अतिशय उत्फूर्त प्रतिसाद नक्कीच देतील. दर्जेदार चित्रपट हा कायमच दर्जेदार असतो. आणि प्रत्येक पिढीतील चित्रपट रसिकांना जुन्या काळातील चित्रपट पहावेसे वाटत असतात तर मागील पिढीतील चित्रपट रसिक असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहताना जुन्या आठवणीत जातात. त्यांना आपला तो फ्लॅशबॅक आवडतो व सुखावतो. चांगला चित्रपट म्हणजे भावनिक ओढ आणि आठवणीचा आनंद.(Classic marathi movies)