‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रेम: संजय कपूरचा फसलेला डेब्यू
पुनर्जन्मासारखी घासून गुळगुळीत झालेली संकल्पना घेऊन बोनी कपूरने आपल्या धाकट्या भावाला, संजय कपूरला बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत लाँच केलं. तब्बू (Tabu) आणि संजय कपूरची (Sanjay Kapoor) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी त्यावेळी साफ नाकारलं. दोघांनीही अभिनयाच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नव्हती मात्र कथेतील नाविन्याचा अभाव प्रेक्षकांना या चित्रपटाकडे खेचू शकला नाही. बॉलीवूडला आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या अनिल कपूरच्या लहान भावाचा हा पहिलाच चित्रपट तसेच दिग्दर्शक म्हणून सतीश कौशिक, कथा-पटकथा-संवाद लेखक म्हणून जावेद अख्तर, संगीत दिग्दर्शक म्हणून लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant–Pyarelal) या जोडगोळी सोबतच निर्माता म्हणून बोनी कपूर अशी मोठमोठी नावे या प्रोजेक्टमध्ये सामील असल्यामुळे प्रेक्षकांना सरस मनोरंजनाची अपेक्षा होती, मात्र हे ‘प्रेम’ (Prem) फोल ठरलं. पाच कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात कसाबसा चारच कोटींचा गल्ला जमवला. आज या चित्रपटाला रिलीज होऊन २६ वर्षे झाली. चला तर जाणून घेऊयात या चित्रपटाशी संबंधित काही विशेष घडामोडी..
‘प्रेम’ नव्हे; ‘जंगल’ असणार होता संजयचा पहिला चित्रपट!
‘वो सात दिन’च्या घवघवीत यशानंतर निर्माता बोनी कपूरने (Boney Kapoor) अनिलच्या सांगण्यानुसार संजय कपूरला इंडस्ट्रीत उतरवायचं ठरवलं आणि शेखर कपूर यांना दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसायला भाग पाडलं. बोनीने संजय आणि शिल्पा शिरोडकर या दोघांना घेऊन ‘जंगल’ या चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं. पण शेखरने शिल्पाच्या निवडीबाबत नाराजी दर्शवली आणि दिग्दर्शनाला नकार दिला. हे कळाल्यावर शिल्पाची त्या फिल्ममधून हकालपट्टी तर झालीच पण त्याचसोबत चित्रपटासाठी नव्या कथेवर काम सुरु झालं.
तब्बू कधीच नव्हती पहिली पसंती!
संजय कपूरला लाँच करायचं ठरवलं तेव्हाच बोनीने खुशबूला हिरोईन म्हणून निवडायचं मनोमन ठरवलं होतं पण तारखांच्या गर्दीत हरवलेल्या खुशबूकडे या फिल्मसाठी वेळ नसल्याने बोनी दुसऱ्या नावांचा विचार करू लागला. त्यानंतर शिल्पालाही निवडायच्या आधी बोनी कपूरने तेलुगू अभिनेत्री अमलाला संधी देण्याचा विचार केला होता पण विशीतल्या संजयपेक्षा ती अधिकच वयस्कर वाटत असल्याने त्याने हा विचार फेटाळला. शेखरने शिल्पाच्या निवडीवर असंमती दर्शविल्यावर त्याने दिव्या भारतीची निवड केली पण अचानक आठवड्याभरात तिलाही काढून टाकलं गेलं आणि या भूमिकेसाठी तब्बूला विचारण्यात आलं. या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्वी फक्त सहाय्यक भूमिकांमध्ये झळकलेल्या तब्बूला पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिकेत काम करता येणार असल्याने तिने लगेच होकार दिला.
शेखर कपूरऐवजी सतीश कौशिक झाले दिग्दर्शक!
‘प्रेम’च्या चित्रीकरणादरम्यान अनेक वादंग निर्माण झाले आणि चित्रीकरणाचा कालावधी लांबतच गेला. बोनी कपूरकडे सक्षम स्क्रिप्ट नसल्याने शेखर आणि बोनीमध्ये सतत खटके उडू लागले. स्क्रिप्टची बोंब असलेल्या या चित्रपटामध्ये काम करत असल्याने तब्बूचं करिअरही पणाला लागलं होतं आणि त्यावरूनही तिच्यात आणि बोनीमध्ये मोठा वाद झाला होता. या वादामध्ये चित्रीकरणात सतत बाधा येऊन खर्च वाढू लागला आणि शेवटी बोनीने शेखरला काहीही न सांगता अचानक दिग्दर्शकाच्या जबाबदारीतून मुक्त करत सतीश कौशिक (Satish Kaushik) यांना दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसवलं. यानंतर शेखरने कधीही बोनी प्रोडक्शनसाठी काम केलं नाही.
संजय ठरला सर्वाधिक वय असलेला हिरो!
तब्बूने जेव्हा ‘प्रेम साईन’ केला तेव्हा ती फक्त सतरा वर्षांची होती पण फिल्म रिलीज झाली त्यावेळी तब्बू वयाची चोविशी गाठण्याच्या तयारीत होती. संजय अठरा वर्षांचा असल्यापासून बोनी त्याला लाँच करण्यासाठी झगडत होता पण प्रत्यक्षात फिल्मचं शूटिंग सुरु होईपर्यंत संजयला सहा वर्षं वाट बघावी लागली. बोनी कपूरच्या हेकेखोर स्वभावामुळे एकामागून एक उद्भवणाऱ्या वादांना तोंड देता देता चित्रीकरण लांबतच गेलं. भरीस भर म्हणून, ‘प्रेम’ रिलीज व्हायच्या एक वर्ष आधीच तब्बू अजय देवगन सोबत ‘विजयपथ’मध्ये नायिकेच्या भूमिकेत झळकली आणि संजयला सिनियर ठरली. त्यानंतर पुढच्या वर्षी ‘प्रेम’ रिलीज झाला तेव्हा तिशीत असलेला संजय कपूर हा नायक (हिरो) म्हणून सर्वात उशिरा पदार्पण करणारा अभिनेता ठरला.