Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’
समाजाला एखादा संदेश द्यायचा असेल तर चित्रपट, लघुपट, नाटके, मालिका ही माध्यमे अधिक प्रभावी ठरतात. केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर हे प्रबोधनाचेही माध्यम आहे’, असं म्हणणं आहे दिग्दर्शक व अभिनेते संतोष ओझा (Santosh Ojha) यांचं. आतापर्यंत जाहिरात, काही कलाकृतींमध्ये अभिनय व काही प्रोजेक्ट्सचं सहदिग्दर्शन केल्यानंतर संतोष यांनी पहिल्यांदा एक शॉर्टफिल्म स्वतंत्ररीत्या दिग्दर्शित केली. ती ‘डिझ्ने हॉटस्टार’ या आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.

पुण्याच्या फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधून (एफटीआयआय) प्रशिक्षित संतोष ओझा गेल्या २२ वर्षांपासून रंगमंच आणि चित्रपटसृष्टीशी जुळलेले आहेत. रांची येथे लहानाचे मोठे झालेल्या संतोष (Santosh Ojha) यांनी अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासोबत एका जाहिरातीत काम केलं आहे. यासह कित्येक मालिका व चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अक्षयकुमारच्या ‘लक्ष्मी’मध्ये त्यांनी लक्ष्मीच्या (शरद केळकर) वडिलाची भूमिका साकारली आहे. त्यांची ‘एके ४७’ ही वेबसीरिज प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यात ते शेखर सुमन यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
आपण समाजाला काही देणं लागतो. मग, ते कलेच्या माध्यमातून का होईना. संतोष यांच्याबाबतची आणखी एक रोचक बाब म्हणजे, इंडियन नेव्हीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, कलासक्त संतोष यांनी कलाक्षेत्राची वाट धरली. देशाची सेवा आपण कलेच्या माध्यमातूनही करू शकतो, ही त्यांची धारणा. बालपणापासूनच कला अंगी ठासून भरलेली. आजोबा तबलावादक होते. त्यामुळे कलेचं वातावरण बालपणापासून अनुभवलेलं. प्राचार्य असलेली आई पार्वतीदेवी व इंजिनीअर वडील एस. बी. ओझा यांनी संतोष (Santosh Ojha) यांना पाठबळच दिलं. कलाक्षेत्रात छोटी-मोठी कामं करीत असताना एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळाला. तेथे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रशिक्षणासोबतच प्रतिभावंतांचा सहवास लाभला. कलेला आणखी पैलू पडत गेले.
असा घडला लघुपट
संतोष (Santosh Ojha) यांनी काही चित्रपट, लघुपटांसाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. हरयाणाचे राकेश बालू यांनी ‘प्यारे पापा’ची कथा लिहिली. ही कथा म्हणजे प्रत्येक शहर, गावातील वस्तुस्थिती आहे. विभक्त कुटुंबव्यवस्था आता जोर धरत आहे. यात आई-वडील स्वत:च्या नको त्या वर्तणुकीतून मुलांवर वाईट संस्कार घडवत आहेत. या संवेदनशील विषयावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेते व टीआरपी मामा म्हणून प्रसिद्ध परितोष त्रिपाठी यांची यात मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांच्या पत्नीची भूमिका अनामिका कदम्ब तर मुलाची भूमिका मेरियांश अय्यर याने साकारली आहे. ही कथा आकार घेत असताना ती समाजासमोर आणण्याचं ठरलं. अशावेळी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आवश्यक होता. तो डिझ्ने हॉटस्टारच्या रूपात मिळाला. लेखक व निर्माते राकेश बालू यांनी दिग्दर्शनासाठी संतोष ओझा (Santosh Ojha) यांच्याकडे विचारणा केली. कथेचा आशय चांगला असल्यानं नकाराचा प्रश्नच नव्हता. समाजाला सुंदर आणि प्रेरक संदेश देणारी ही कथा शॉर्टफिल्मच्या रूपात साकारली अन् ती डिझ्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. या फिल्मला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या या कलाकृतीमुळे समाजात चांगला बदल घडून यावा, हाच उद्देश आहे’, अशी संतोष (Santosh Ojha) यांची भावना आहे. संतोष यांचे अन्य प्रोजेक्ट्स आगामी काळात येणार आहेत.
======
हे देखील वाचा : देवेंद्र दोडकेंनी गाजविला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
======
पीयूष मिश्रा, महिमा चौधरीकडून कौतुक
‘प्यारे पापा’ वर प्रदर्शनाआधीच मान्यवर कलावंतांच्या शुभेच्छांचा पाऊस पडला. या कलावंतांनी सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे तसेच मेसेजेसमधून या शॉर्टफिल्मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेते, लेखक, गीतकार पीयूष मिश्रा, महिमा चौधरी, ब्रिजेंद्र काला, श्रीकांत वर्मा, पितोबाश त्रिपाठी, शशी वर्मा, मीनल कपूर, विकास श्रीवास्तव, गरिमा गोयल, श्याम सुंदर, ग्यानप्रकाश, अंबरीश सक्सेना आदींचा समावेश आहे.