‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पगलैट: सुजाणतेची वेडसर झिंग
कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट मनोरंजनाची कुठलीच कसर सोडत नाहीत. आगळेवेगळे विषय अगदी सहजगत्या हाताळत हे चित्रपट प्रेक्षकांना कधी खळखळून हसवतात तर कधी अंतर्मुख करतात. तोरणदारी किंवा मरणदारी होणारी नातेवाईकांची गर्दी ही भारतीय मध्यमवर्गीयांच्या पुरेपुर पचनी पडलेली आहे. याच संकल्पनेचा आधार घेऊन काही उत्कृष्ट चित्रपट गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यातील काही नावं घ्यायची झालीच तर ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘वेडिंगचा शिनेमा’, ‘व्हेंटिलेटर’, ‘शादी में जरूर आना’, ‘बस्ता’ आणि ‘रामप्रसाद की तेरहवी’ सारखे चित्रपट लगेच डोळ्यांसमोर तरळून जातात. उमेश बिस्त दिग्दर्शित ‘पगलैट’ हा एक अशीच संकल्पना मांडणारा कौटुंबिक पार्श्वभूमीचा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
पाचच महिन्यांपूर्वी संध्याशी (सान्या मल्होत्रा) लग्न झालेल्या आस्तिकच्या आकस्मिक निधनामुळे गिरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्रयोदशक्रिया विधी संपन्न होईपर्यंत कुटुंबाने सुतकात एकत्र राहण्याची प्रथा गिरी कुटुंब पाळत असल्याने लांबचे नातेवाईकही या दुखवट्यात सामील होतात. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालेले असताना नव्या सुनेला अर्थात संध्याला मात्र अद्यापही पती गेल्यामुळे रडू आलेलं नाहीय. तिच्या अश्या वागण्याचं कोडं कुणालाही सुटलेलं नाहीय. विधवांसाठी समाजाने आखून ठेवलेल्या चौकटी पुसणारी संध्या नातेवाईकांच्या दृष्टीने पगलैट म्हणजेच वेडसर आहे. आस्तिकच्या मृत्युनंतर काही दिवसांनी आकांक्षाच्या (सयानी गुप्ता) रूपाने आस्तिकचं पहिलं प्रेम तिच्या सांत्वनार्थ घरी येतं आणि संध्या आकांक्षाच्या आठवणींमधून आस्तिकला शोधायचा प्रयत्न करू लागते. विधवा असलेल्या संध्याचा भार आपल्यावर नको म्हणून सासर आणि माहेरचे कर्मठ विचारसरणीचे नातेवाईक तिला दूर करण्याचे पर्याय शोधू लागतात. अश्यातच जेव्हा आस्तिकच्या इन्शुरन्सचे पैसे वारसाहक्काने संध्याला मिळतात, तेव्हा या नातेवाईकांना ती हवीहवीशी वाटू लागते. तेरा दिवस चाललेल्या भावनांच्या गुंतागुंतीच्या या खेळात संध्या काय निर्णय घेते, तो निर्णय योग्य की अयोग्य या प्रश्नांची उत्तरे ‘पगलैट’मध्ये मिळतात.
सर्वसाधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटांप्रमाणे ‘पगलैट’ (Pagglait) मध्येही कलाकारांची भलीमोठी फौज प्रेक्षकांना पाहायला मिळते. आशुतोष राणा व शिबा चड्ढा आस्तिकच्या पालकांच्या भूमिकेत असून रघुबीर यादव यांनी आस्तिकच्या मोठ्या काकाची भूमिका वठवली आहे. नताशा रस्तोगी आणि भुपेश पांड्या हे संध्याच्या आईवडीलांची भूमिका साकारत असून चेतन शर्माने तिच्या धाकट्या दिराच्या भूमिकेत रंग भरला आहे. त्याचबरोबर, सरोज सिंग, जमील खान, आसिफ खान, यामिनी सिंग, राजेश तेलंग, मेघना मलिक, श्रुती शर्मा, अनन्या खरे, नकुल सहदेव, अश्लेषा ठाकूर इत्यादी सहकलाकारांनीही आपापल्या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. अभिनयाच्या पातळीवर हा चित्रपट कुठेही निराश करत नसला तरीही, यातील बहुतांश सहकलाकारांनी याआधीही बऱ्याच चित्रपट आणि वेबसिरिजेसमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारलेल्या असल्याने या चित्रपटात त्यांना मिळालेल्या त्यांच्या अभिनयक्षमतेपेक्षा कमी महत्त्वाच्या भूमिका प्रेक्षकांना खटकू शकतात.
मुख्य कथेसोबत सुतक, सुतकात पाळल्या जाणाऱ्या प्रथापरंपरा, विधवा पुनर्विवाह, घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक मृत्यूमुळे विस्कळीत झालेली आर्थिक परिस्थिती, पतीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर जडणारं प्रेम, नातेवाईकांचा सोयीस्करपणा अशी समांतर उपकथानके प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. अतिशय कमालीचं कॉमिक टायमिंग असलेले कलाकार यात असतानाही त्यांच्या वाट्याला आलेल्या बाचकळ विनोदी प्रसंगामुळे हा चित्रपट एक विनोदी चित्रपट असल्याचा दावा मात्र सपशेल मोडीत निघाला आहे.
मांजरीच्या जाण्याने तीन दिवस दुःखातून सावरू न शकणारी संध्या पतीच्या निधनानंतर एक अश्रूही ढाळत नाही, मात्र त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यावर प्रचंड भावुक होते, हे काहीसं अतर्क्य वाटणारं प्रकरण पुढे जाऊन प्रेक्षकांच्या पचनी पडतं पण तोवर बरेचसे गोंधळात टाकणारे प्रसंग घडतात ज्यात संध्याच्या मनात नेमकं काय आहे याचा थांगपत्ता कुणालाही लागत नाही. प्रेक्षकांना इतरत्र भरकटू न देता हा सगळा गोंधळ सावरून घेण्यासाठी रघुबीर यादव, आशुतोष राणा, जमील खान, शिबा चड्ढा इत्यादी कलाकारांच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांचा अचूक वापर दिग्दर्शकाने केला आहे. पूर्ण चित्रपटात आस्तिकची एक छबीही न दाखवता त्याचं अस्तित्व निर्माण करणं ही कल्पकता आणि तेरावा होईपर्यंत मृतात्म्याचा घरातील वास ही मूळ कथेतील मांडणी या दोहोंची सांगड घालण्यात लेखक-दिग्दर्शक उमेश बिस्त यशस्वी ठरला आहे.
चित्रपटाचे संवाद, गाणी आणि सिनेमॅटोग्राफी ही चित्रपटाच्या स्टारकास्टइतकीच जमेची बाजू ठरली आहे. सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगने दिलेलं संगीत विशेष प्रसंगांमध्ये अधिक परिणामकारक ठरतं. नेटफ्लिक्सची फिल्म असल्यामुळे हिंदू समाजातील मध्यमवर्गीयांची संकुचित मनोवृत्ती आणि इस्लामोफोबियासारखा अपप्रचार याही चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. कथेची गरज नसताना ओढूनताणून केला गेलेला हा अपप्रचारच चित्रपटाच्या विनोदी बांधणीला मारक ठरतो.
वेब कंटेंट असूनही काही माफक उल्लेख वगळता या चित्रपटात कसल्याही प्रकारची नग्नता किंवा शिव्या नाहीत. सध्याच्या कंटाळवाण्या काळात घासून गुळगुळीत झालेले ऍक्शनपट किंवा थ्रिलर, हॉरर चित्रपटांखेरीज दुसरा काही हलकाफुलका कंटेंट बघायचा असेल, तर मात्र ‘पगलैट’ बिलकुल चुकवू नका!!