सारेगमप आणि मुग्धा वैशंपायन
१. अलिबाग ते मुंबईत सा-रे-ग-म-प… हा प्रवास कसा काय शक्य झाला?
मी चौथीत असताना असताना फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये गायिका बनले होते. तेव्हा मी एक बंदिश सादर केली होती आणि ती फार छान झाली, असं सगळ्यांचं मत होतं. त्यामुळे बर्याच लोकांनी बाबांना असं सुचवलं की तुम्ही हिला गाणं शिकवावं. मला चांगलं गाता येत होतं, पण मी फार लहान असल्याने बाबांनी याकडे काही विशेष लक्ष दिलं नाही.
परंतु चौथीच्या माझ्या वर्गशिक्षिका सुद्धा मी गाणं शिकावं यासाठी प्रयत्न करत होत्या. जेव्हा सारेगमपच्या ऑडिशन सुरू झाल्या, तेव्हा त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं. पण ‘मुग्धा गाणं शिकली नाहीये आणि ती फार लहानही आहे’, असं म्हणून बाबांनी ते टाळलं. त्यात अलिबागवरून तिथे जाऊन मुंबई – पुण्यातल्या मुलांना टक्कर द्यायची, म्हणजे कठीणच. मुग्धाचा काही टिकाव लागणार नाही, असं बाबांचं मत होतं.
हे वाचलेत का ? अभिनयाची तृष्णा!
पण माझ्या वर्गशिक्षिका हट्टाला पेटल्या होत्या. ऑडिशनच्या आदल्या दिवशी त्यांनी बाबांना फोन केला आणि म्हणाल्या की, ‘एक तर तुम्ही तिला घेऊन जा किंवा मी घेऊन जाते’! शेवटी बाबा आणि मी मुंबईला निघालो तेही एलिमिनेट होऊन लगेच घरी यायचं या अपेक्षेनेच! जर अनपेक्षितपणे सिलेक्ट झाले, तर दुसर्या दिवशीच्या फेरीसाठी लागणारा कपड्यांचा जोडही आम्ही घेऊन गेलो नाही, इतकं आमचं ठाम मत होतं.
ज्याची अपेक्षाही केली नव्हती तेच झाले. पहिल्या दिवशीच्या चारही ऑडिशन्स मध्ये मी सिलेक्ट झाले. त्या दिवशी आम्ही मुंबईत राहिलो आणि त्याच कपड्यात मी दुसऱ्या दिवशीची ऑडिशनही पास झाले.
खरंच हा खूप सुखद धक्का होता!
२. सा रे ग म प या स्पर्धेचा तुझ्या आयुष्यावर कशा रीतीने प्रभाव पडला?
८-९ वर्षाचे असताना सहसा कोणी करिअरचा विचार करत नाही. पण सा-रे-ग-म-प मुळे आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रेमामुळे माझं जीवनच संगीतमय झालं, असे म्हणणे योग्य ठरेल. संगीताच्या दृष्टीने प्रवास आणि मुख्य म्हणजे गाणं शिकणं सुरू झालं.
३. भारताबाहेर अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत, तो अनुभव कसा होता?
आतापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचे कार्यक्रमासाठीचे दौरे झाले आहेत. यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भारताविषयी आणि भारताच्या संस्कृती विषयी भारतीय लोकांपेक्षा किंचित जास्त प्रेम हे भारताबाहेरील भारतीयांना असते. परदेशातील भारतीय लोक तिथे येणाऱ्या भारतीय पाहुण्यांचे आदरातिथ्य अगदी आपुलकीने करतात… तेवढंच त्यांचं गाण्यावरही प्रेम आहे!
४. गाणं आणि शिक्षण यांचा मेळ कसा साधलास?
चौथीपासून माझं गाणं खऱ्या अर्थाने सुरू झालं. सारेगमप नंतर गाण्याचे वेगवेगळे कार्यक्रम, दौरे होऊ लागले. दहावी-बारावीच्या वर्षात यांचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे अभ्यास आणि गाणे एकत्र करणं ही खरी तारेवरची कसरत होती. बारावीत असताना तर दीड महिना मी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते.
त्यामुळे मिळेल तो वेळ नियोजन करून वापरण्याची सक्त ताकीद आई-वडिलांकडून मिळाली होती. दिवसभरातले मोकळे पाच तास..त्यात रियाज, अभ्यास असं सगळं नियोजन करत मी इथपर्यंत आले आहे.
५. गाणं तर तुझी आवड आहे, पण गाण्याशिवाय इतर आवडीनिवडी कोणत्या?
ट्रेकिंग, स्विमिंग आणि सायकलिंग करायला मला खूप आवडतं.
६. लॉकडाऊन मुळे मिळालेला मोकळा वेळ कशा प्रकारे सत्कारणी लावलास?
मी दहावीनंतर मुंबईत शिफ्ट झाले, तेव्हापासून सणसमारंभांना दोन – तीन दिवस अलिबागला येऊन राहायचे. लॉकडाऊन मुळे खूप वर्षांनी मला ‘लॉंग हॉलिडे’ मिळाला. आई – बाबा, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत खूप वेळ घालवता आला.
‘मुग्धा वैशंपायन ऑफिशियल’ या नावाने आधी मी एक यूट्यूब चैनल सुरू केले होते. पण पण रोजच्या धावपळीमुळे त्यावर सलग पोस्ट करणं काही जमलं नाही. पण लॉकडाऊन मुळे त्यासाठी मुहूर्त मिळाला आणि ‘यादो में’ नावाची एक नवीन सिरीज मी त्यावर सुरू केली. जुन्या संगीत दिग्दर्शकांच्या चार – पाच गाण्यांचा एक एपिसोड, असे मी एकूण अकरा एपिसोड केले. मी स्वतःही काही गाणी कम्पोज करण्याचा प्रयत्न केला. अशी तीन गाणी मी यूट्यूब चैनलवर अपलोड केली आहेत. त्यावर लोकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला अधिक उत्साह आला आणि प्रोत्साहन देखील मिळाले.
७. भविष्यात कोणत्या प्रोजेक्टवर तुला काम करायला आवडेल?
भारतीय संगीत हा प्रकार मुळात खूप कठीण आहे. त्याची पारंपरिक बाजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. भारतीय पारंपरिक संगीत हे जपणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक संगीत साधनाकाराचं कर्तव्य आणि जबाबदारी देखील आहे. त्यासाठी मला जितकं कार्य करता येईल, तितकं करण्याची माझी मनापासून इच्छा आहे.
८. लहानपणापासूनच सारेगमप’च्या माध्यमातून अनेक दिग्गजांची तुझी भेट झाली. त्यांचं कशाप्रकारे मार्गदर्शन लाभलं?
सारेगमपच्या निमित्ताने लतादीदी, किशोरीताई, शिवकुमार शर्मा जी, हरिप्रसाद चौरसिया जी अशा अनेकांना भेटण्याची संधी मिळाली. या सर्वांना आपण संगीताचे देव मानतो. सर्वांकडून खूप छान गोष्टी मला शिकायला मिळाली, ती म्हणजे आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. कितीही मोठा कलाकार असला तर त्याने माणूसपण सोडू नये, ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली.
वाचावे असे काही : आशा भोसले – एक उत्स्फूर्त व्यक्तिमत्व
९. या प्रवासात अशी कोणती गोष्ट तुला शिकायला मिळाली जी प्रत्येकाने आयुष्यात अंगीकारायला हवी?
खरं तर हे सांगण्याइतकी मी मोठी नाही. पण मला असं फार वाटतं की प्रसिद्धी वगैरे या गोष्टी तात्पुरत्या असतात. शेवटी कलाकार होण्याआधी आपण माणूस असतो. त्यामुळे हे माणूसपण आधी जपलं पाहिजे.
उबुंटू या सिनेमातील एक प्रार्थना तुम्हाला माहीतच असेल.. ‘हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’! समीर सामंत यांनी ही ओळ अगदी बरोबर लिहिली आहे.
१०. रॅपिड फायर राऊंड
- ड्रीम कलाकार : शंकर जी
- आवडता गायक/ गायिका : लतादीदी
- आवडता छंद : स्विमिंग
- स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग : अलिबाग पासून थोड्या अंतरावर असलेल्या खानाव या गावी जाऊन नातेवाईकांसोबत वेळ घालवणे.
- प्रेरणास्थान : गुरु शुभदा पराडकर, लतादीदी
कलाकृती मीडिया तर्फे मुग्धा वैशंपायन हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!
- मुलाखत आणि शब्दांकन : सोनल रमेश सुर्वे