‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सरकती जाये है रूख से नकाब आहिस्ता आहिस्ता
उर्दूतील नज्म, गजल, कव्वाली, नात यांनी हिंदी सिनेमातील सांस्कृतिक कलादालन समृध्द केलं आहे. अनेक उर्दू गीतकारांचा मूळचा पिंड शायराचाच आहे. अनेक शायर तर अगदी नाइलाजाने सिनेमात आलेले दिसतात. आपल्याकडे १९३१ पासून सिनेमा बोलू लागला गाऊ लागला. गीतकारांची मागणी वाढू लागली. नव्या दमाचे शायर निर्माण होऊ लागले पण त्याच वेळी उर्दूतील जुन्या दिवंगत शायरांच्या कलाकृतीचा समावेश सिनेमात होऊ लागला. एकोणीसाव्या शतकातील महान शायर (Shayar) मिर्झा गालीबच्या रचनांचा प्रभाव अनेक शायरांवर (Shayar) दिसतो.
गालीबचेच समकालीन शायर (Shayar) होते अमीर मीनाई यांच्या एका गजलने तमाम गीतकारांवर गारूड टाकलं. उर्दूच्या शायरीमध्ये एक गंमत असते. हे शायर लोक एकमेकांच्या कवितांच्या ओळी, उपमा, विशेषणं अगदी जशीच्या तशी आपल्या काव्यात वापरतात पण त्याला कुणी चोरी म्हणत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर गुलजारच्या दिल ढूंढ्ता है फिर वही फुरसत के रात दिन यातील पहिली ओळ (मिस्रा) गालीब यांचा आहे. अमीर मीनाई हे शायर १८२६ साली लखनौ येथे जन्मले. इथल्या ’आम’ आणि खास या दोन्ही वर्गांवर त्यांच्या शायरीचा प्रभाव दिसून येतो पुढे ते अवधच्या दरबारात राजकवी म्हणून गेले. १८५७ च्या बंडानंतर ते रामपूर संस्थानात आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ते हैद्राबादच्या निजामाकडे आले.
त्यांची एक अप्रतिम गजल आहे ’सरकती जाये रूख से नकाब आहिस्ता आहिस्ता’ या गजलेला अनेकांनी आपल्या शायरीत (Shayar) बेमालूमपणे वापरलं. १९८२ साली एच एस रवैल (मेरे मेहबूब फेम) यांनी एक मुस्लीम सोशल सिनेमा बनवला होता ’दिदार ए यार’ यात ही गजल वापरली होती. सिनेमा अपयशी ठरल्याने ही गजल ही एकमेव आठवण राहिली आहे. पण याच काळात या गजलेचा वापर बर्याच ठिकाणी दिसून आला. १९८१ साली हरमेश मल्होत्रा यांचा ’पूनम’ नावाचा एक चित्रपट आला होता. अन्नू मलिकचा हा पहिला गाजलेला चित्रपट. हसरत जयपुरींनी यात अमीर मीनाई यांच्या गजलेवर एक गाणं लिहिलं .गाण्याचे शब्द होते “मोहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता, के जैसे रंग लाती है शराब आहिस्ता आहिस्ता” रफी सोबत चंद्राणी मुखर्जीच्या स्वरातील हे गाणे अतिशय सुंदर बनले होते.गंमत म्हणजे आनंद बक्षी यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमाकरीता (भगवान दादाचा ’लाबेला’ – १९६६) हेच गाणं लिहिलं होतं. हसरत ने त्याची पहिली ओळ तशीच ठेवून उर्वरीत गाणं रचलं.
१९८१ सालीच इस्माईल श्रॉफ यांचा एक चित्रपट आला होता त्याचं नावच होतं ’आहिस्ता आहिस्ता’! (Shayar) यात एक गीत निदा फाजली यांनी लिहिलं होतं संगीत खय्याम यांच होतं गीताचे बोल होते’ नजर से फूल चुनती है नजर, आहिस्ता आहिस्ता मोहब्बत रंग लाती है मगर, आहिस्ता आहिस्ता’ आशा भोसले सोबत अन्वरचा स्वर होता. १९७६ साली गजल गायक जगजित सिंग यांनी ’द अनफरगेटेबल्स’ नावाची एक ध्वनीमुद्रिका काढली होती यात त्याने ही गजल गायली होती ती ऐकून लता मंगेशकर प्रभावित झाली होती.
======
हे देखील वाचा : यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!
======
अमीर मीनाई या शायराचा मृत्यु १९०० साली झाला पण त्याच्या शायरीचा रूतबा, डौल, नजाकत कायम आहे.आजही गुलाम अली त्यांच्या रचनांना आपल्या कार्यक्रमातून सादर करतात. आता तर हिंदी सिनेमांमध्ये ‘अहिस्ता अहिस्ता’ हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की, अनेक गाण्यांमधून तो सहज वापरला जातो. अलीकडे या नावाने काही अल्बम्स आणि चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहे. भारतातच नाही तर पाकिस्तानात देखील या शब्दाची जादू आजही अबाधीत आहे तिथेही अनेक गझल मध्ये हा शब्द बेमालूनपणे वापरला जातो. पण त्याची नजाकत आणि हळुवारपणे जो पूर्वीच्या गाण्यांमध्ये होता तो आता राहिलेला नाही हे शब्दशः खरे आहे!