Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत
Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत !
कलासक्त व्यक्तीला व्यवहार समजतोच असे नाही. आपल्या कलेच्या विश्वात मश्गुल असणार्या कलावंताला कागदी दुनियेतील हिशेब समजत नाहीत. म्हणूनच ज्या वेळी कवी, गीतकार शैलेंद्रला ’तिसरी कसम’च्या निर्मितीच्या वेळी या फंदात पडू नका असाच सल्ला सर्वांनी दिला तरी शैलेंद्रने तो जुगार खेळलाच आणि वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेवून गेला. कलावंतांचं हे हळवेपण ’गुरूदत्त’ला देखील प्राण घातक ठरलं. अशावेळी सावरणारं कुणीतरी हवं असतं. (Satyajit Ray)
थोर दिग्दर्शक सत्यजित रे (Satyajit Ray) यांच्या ’पाथेर पांचाली’ (Pather Panchali) या सिनेमाच्या वेळी असेच आर्थिक गणित चुकले. सिनेमा अर्धा अधिक पूर्ण झाला होता. सोन्यासारखी कलाकृती अशीच अधुरी राहते की काय अशी शंका त्यांच्या मनात येवू लागली. प्रश्न पैशाचा असल्याने अनेक जणांनी रे यांना भेटण्याचेच टाळले. रे यांचा हा पहिलाच चित्रपट होता. सगळीकडून नकार मिळत असताना एक आशेचा किरण चमकला. गायक किशोर कुमार (Kishore Kumar) ला ही बातमी समजली तो ताबडतोब रे यांच्याकडे गेला व “मामा, आपको कितना पैसा चाहिए ?” असा प्रश्न केला.
किशोरने त्यांना आर्थिक मदत केली म्हणून रे ’पाथेर पांचाली’ बनवू शकले पण किशोरची कायम कंजूष म्हणून संभावना करणार्या किती जणांना ही गोष्ट महिती आहे ? किशोरची पहिली पत्नी आणि अमित कुमार (Amit Kumar) ची आई रुमा घोष हिचे सत्यजित रे (Satyajit Ray) मामा होते. त्यामुळे किशोर रे यांना मामा म्हणूनच संबोधायचा. खरं तर किशोर-रूमा घोष यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही पण किशोर कुमार आणि सत्यजित रे यांचे संबध टिकून राहिले. सत्यजित रे यांच्या सिनेमात किशोर गायला पण त्याने त्याच्या एकाही गाण्याचे मानधन घेतले नाही!
सत्यजित रे (Satyajit Ray) १९६१ – ६२ साली ’कांचनजंगा’ हा बंगाली सिनेमा बनवित होते. त्याच चित्रीकरण दार्जिलींगला चालू होतं. त्या वेळी अचानक त्यांच्या प्रॉडक्शन मॅनेजरच्या लक्षात आलं की त्यांच्याकडील कच्च्या फिल्मचा साठा संपत आलाय. आता फिल्म आणायची कुठून? कलकत्त्याहून फिल्म मागवायची तर त्याला पाच सात दिवस लागले असते कारण दळण वळणाची साधने तेव्हा इतकी सहज उपलब्ध नव्हती. या सिनेमात छबी विश्वास, करूणा बॅनर्जी, अनिल चटर्जी असे व्यस्त कलाकार काम करीत होते. या सर्वांच्या तारखा, सिनेमाचे मर्यादित बजेट यामुळे आता काय करायचे हा पेच रे यांना पडला. त्या वेळी पुन्हा त्यांच्या मदतीला बॉलीवूड धावून आलं. कारण त्याच काळात शम्मीकपूर-कल्पना यांच्या ’प्रोफेसर’ या सिनेमाचे शूटींग दार्जिलींगला चालू होते.
शम्मीच्या कानावर रे यांच्या कच्च्या फिल्मचा प्रॉब्लेम गेला. किशोर काय किंवा शम्मी काय ही खरी सच्ची कलावंत मंडळी! रे यांचं कर्तृत्व काय आहे हे ते जाणून होते. शम्मीने लगेच सिनेमाचे दिग्दर्शक लेख टंडन यांना फिल्म बाबत विचारले. लेख टंडनची ही पहिलीच फिल्म होती तो शम्मी (Shammi Kapoor) ला म्हणाला ’अपने पास फिल्म तो है लेकीन मुझे पहले प्रोड्यूसर एफ सी मेहरा से पूछ्ना पडेगा.’
=============
हे देखील वाचा : Khal Nayak : जेव्हा ‘हे’ दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले!
=============
यावर शम्मी म्हणाला ’वो तुम मुझ पर छोड दो मै आज रात को ही मेहरा साबसे बात करूंगा.” असे म्हणत त्याने ताबडतोब कच्ची फिल्म रे साहेबांकडे पाठवून दिली! या फिल्म मुळेच रे ’कांचनजंगा’ वेळेत आणि बजेटमध्ये बनवू शकले. व्यावसायिक सिनेमा वाल्यांनी कलात्मक सिनेमा जगविण्यासाठी केलेली ही मदत मोलाची होती. सत्यजित रे (Satyajit Ray) देखील यामुळे सदैव बॉलीवूडचे ऋणी राहिले!