
“या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच…”, Sayaji Shinde यांचे आदर्श आहेत निळू फुले
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे साऊथ इंडस्ट्रीतीलही एक महत्वाचा चेहरा आहेत… नायकाला टफ टक्कर देणारा खलनायक सयाजी शिंदे यांनी आजवर बऱ्याच हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये साकारला आहे… आता इतका उत्कृष्ट खलनायक साकारणाऱ्या सयाजींना जेव्हा त्यांचे या क्षेत्रातील आदर्श कोण असं विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निळू फुले यांचं नाव घेतलं…. नेमकं सयाजी काय म्हणाले? जाणून घेऊयात…

अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदे म्हणाले की, “नट म्हणून माझ्यासाठी निळू फुले आदर्श आहेत. मी त्यांना म्हटलंही होतं की आमचे बाप कुणीपण असू द्या, पण या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच आहात. तुम्हाला बघून बघून आम्ही मोठे झालो. तुमचा अभिनयातला जो सहजपणा आहे तो आम्ही अजूनही शिकतोय. भूमिका करताना नट अभिनयात एक आविर्भाव आणतो. तो आविर्भाव तुमच्यामध्ये दिसूनच येत नाही. हे शिकण्यातच आमचं आयुष्य चाललंय. त्याच्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमच्याकडून शिकतो, तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघतो.”

सयाजी पुढे म्हणाले की, “निळू फुले यांना क्लासिकल गाण्यांची आवड होती. मुद्दाम मला बाजूला बसवून ते मला हे गाणं लाव, ते गाणं ऐकायचंय असं म्हणायचे. त्या माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टी होत्या. मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवरही घेऊन गेलो होतो. तेव्हा मला फक्त पालखीच अरेंज करता आली नव्हती. नाहीतर मी त्यांना देवाला घेऊन जातो तसं पालखीच बसवून घेऊन गेले असतो असंच मला करायचं होतं.”
दरम्यान, सयाजी शिंदे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘सखाराम बाइंडर’ या अजरामर नाटकात काम करत आहेत… १९७२ सालचं विजय तेंडुलकर लिखित हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं असून तेव्हाही या नाटकात सयाजी यांनीच प्रमुख भूमिका साकारली होती… तेव्हा या नाटकात सोनाली कुलकर्णी आणि चिन्मयी सुमित ही होत्या..
================================
हे देखील वाचा : Thamma : हॉरर कॉमेडीच्या नावाने अपेक्षाभंग करणारा सिनेमा!
================================
तसेच, सयाजी यांच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ‘Tagore’, ‘Veede’, ‘King’, ‘Mestri’, ‘Kick’ अशा बऱ्याच तेलुगु, ‘वझीर’, ‘लढाई’, ‘कुंकु झालं वैरी’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘भिकारी’, ‘घर, बंदूक बिर्याणी’ अशा मराठी आणि ‘दिशा’, ‘खिलाडी ४२०’, ‘जोडी नंबर १’, ‘सरकार राज’, ‘संजू’, अशा हिंदीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी कामं केली आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi