स्कॅम-1992 : हर्षद मेहता स्टोरी
एखाद्या वेब सिरीजची पटकथा जर तुम्हाला अपेक्षित मनोरंजनासोबत त्या विषयाची सखोल माहिती देखील पुरवत असेल, तर जो प्रॉडक्ट तयार होतो तो दर्जेदार ठरल्याशिवाय रहात नाही, याची पुरती प्रचीती ‘स्कॅम-1992 : हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सिरीज पाहिल्यावर येते.
अख्खं शेअर मार्केट क्षेत्र हादरवून टाकणाऱ्या 1992 च्या हर्षद मेहताने केलेल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक घोटाळय़ावर बेतलेली ही सिरीज त्या काळच्या बारीक सारीक नोंदींवर भर देते. भारतीय अर्थकारण, त्यात शेअर मार्केट क्षेत्र, त्या क्षेत्रातली आंतरिक स्पर्धा, बँका व त्यांची कार्यप्रणाली अशा एक ना अनेक बाबींची तपशीलवार मांडणी यात दिसून येते त्यामुळे खऱ्या अर्थाने परिपूर्णतेचा अनुभव येतो.
हर्षद मेहताने जे काही केले त्याला नैतिक-अनैतिकच्या तराजूत न तोलता घटना व प्रसंगांची केवळ संदर्भासहित मांडणी हे या सिरीजचे वैशिष्ठ्य आहे.
हर्षद मेहताचा भारावून टाकणारा प्रवास दाखवताना कुठेही त्याला नायक ठरवले गेले नसल्याने त्याचा जीवनप्रवास तटस्थपणे अनुभवल्याचे समाधान मिळते.
दिग्दर्शक हंसल मेहता याच गोष्टीमुळे कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या पकड मजबूत असलेल्या अप्रतिम दिग्दर्शनामुळे ही सिरीज कुठेही आपला आशय ढळू देत नाही.
मुख्य भुमिकेत प्रतिक गांधी या गुजराती कलाकाराची निवड हा धाडसी निर्णय अगदी संयुक्तिक ठरावा असा लाजवाब अभिनय या जबरदस्त अभिनेत्याकडून बघायला मिळतो. मूळ हर्षद मेहताला कॉपी न करता त्याने या भूमिकेत मिसळलेला स्वतःचा चार्म आणि सहज वावर या जोरावर त्याने या मिळालेल्या संधीचे खऱ्या अर्थाने सोने केले आहे.
हेही वाचा : मसाबा मसाबा
श्रेया धन्वंतरी या अजून एका आश्वासक चेहऱ्याने सिरीजमधील सूचेता दलाल हे महत्वाचे पात्र अगदी प्रामाणिकपणे निभावले आहे. या सिरीजमध्ये साधारण 15 ते 20 महत्वाची पात्रं आहेत आणि एकही भूमिका मिसफीट वाटत नाही किंवा एकही पात्र अनावश्यक वाटत नाही. हेमंत खेर,निखील द्विवेदी, चिराग व्होरा, जय उपाध्याय,शादाब खान,फैसल रशीद ही त्याची काही उदाहरणे. रजत कपूर, सतीश कौशिक, अनंत महादेवन आणि के.के. रैना या अनुभवी कलाकारांच्या छोट्या पण परिणामकारक भूमिका या सिरीजच्या एकूण प्रभावात अजून भर टाकतात.
उत्तमरितीने उभे केलेले नव्वदचे दशक, सटीक छायाचित्रण आणि संकलन या भक्कम तांत्रिक बाजू सिरीजला वेगळेपण देतात तर अचिंत ठक्करचे डोक्यात बराच काळ रेंगाळणारे पार्श्वसंगीत देखील आपली अनोखी छाप पाडते.आशयपूर्ण आणि दर्जेदार संवाद या सिरीजची उंची वाढवतात तर सुमीत पुरोहित,करण व्यास आणि वैभव व्यास या लेखकांनी मूळ पुस्तकाचे पटकथेत केलेले सशक्त रूपांतरण या सिरीजला दमदार बनवते.
हे वाचलेत का ? चिकटगुंडे
सिरीजमधल्या अनेक तांत्रिक परिभाषा डोक्यावरून जातात. त्या समजून घ्यायला खूप बारीक निरीक्षण करावे लागते तरीही दिग्दर्शक आशयाशी कुठेही तडजोड न करता हे सगळे संदर्भ शक्य तितक्या सोप्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतात. सिरीजची खूप मोठी लांबी हा देखील अडचणीचा विषय ठरु शकतो. पण एकंदर विषय, मांडणी, दर्जेदार अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन आणि भक्कम तांत्रिक बाजू यामुळे ही सिरीज अपेक्षित उंची गाठते.
दिग्दर्शक हंसल मेहता देखील या सिरीजच्या माध्यमातून अनेक काळ स्मरणात राहणारा असाच धमाका करून जातात.