Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

उत्तम लिखाणाची गुणी धनी: स्वप्नीला गुप्ता
“व्वा, बहोत अच्छा लिखा हैं आप ने. एक एमओयू साइन करते हैं”, असं एका प्रॉडक्शन हाउसमधून सांगण्यात आलं, तेव्हा स्वप्नीलाला कळून चुकलं, आपली स्क्रिप्ट हे ताब्यात घेणार. आपल्याला ना क्रेडिट मिळणार ना पैसे. इंडस्ट्रीत काही ठिकाणी घडणाऱ्या या बाबी तिच्या आता लक्षात आल्या होत्या. इथून पुढं आपला स्ट्रगल आपल्यालाच करावा लागेल, या वास्तवाची जाणही झाली होती.
स्वप्नीला गुप्ता (Swapnila Gupta)! एक हरहुन्नरी कलावंत. निवेदन आणि लिखाणात ती सरस आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बळी’ या मराठी चित्रपटाची कथा तिचीच. लखनौ ते मायानगरी मुंबई असा तिचा प्रवास संघर्षाचा अन् इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे. वडील शैलेंद्र कुमार गुप्ता शासकीय नोकरीत, तर आई सुधा गृहिणी. भाऊ इंजिनीअर. अशा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत असताना स्वप्नीलाची स्वप्ने ग्लॅमरच्या क्षेत्रात नाव कमविण्याची होती.
इंदूर येथे इंजिनीअरिंग करीत असताना काहीतरी वेगळं करण्याची धडपड सुरू होती. कॉलेजमध्ये जात असताना एफएम रेडिओ ऐकणं, हा शिरस्ता बनलेला. या क्षेत्रात जायचं, असं सुरुवातीला ठरवलं. ऑल इंडिया रेडिओमध्ये काही काळ कामही केलं. त्याचदरम्यान रेडिओ मिर्चीसाठी आरजे हंट आयोजित करण्यात आली होती. त्या ऑडिशनला स्वप्नीला (Swapnila Gupta) जरा उशिराच पोहोचली. मात्र, आयोजकांनी तिची ऑडिशन घेतली. तिच्यातील आत्मविश्वास आणि गुण पाहून तिची आरजे म्हणून निवडही झाली.

त्यावेळी इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचं दुसरं सेमिस्टर सुरू होतं. निवेदनाच्याच क्षेत्रात जायचं, हे ध्येय तिनं मनाशी पक्कं ठरविलं होतं. त्यामुळे शिक्षणाला तिथं ब्रेक बसला. रेडिओवर आरजेचं काम सुरू असताना मुंबई खुणावत होती. मात्र, तिकडे जाण्याचा योग येत नव्हता. अखेर नशिबानं साथ दिली.
मुंबईत रेडिओ सिटीमध्ये संधी मिळाली अन् तिचा मायानगरीत प्रवेश झाला. रेडिओ सिटीच्या इंटरनेट आवृत्तीत रात्री काम चालायचं. त्यादरम्यान मनोरंजन क्षेत्र खुणावू लागलं होतं. दिवसा ऑडिशन देणं सुरू झालं. मात्र, काही ठिकाणी वाईट अनुभव आला, मानसिक त्रासही झाला, असं ती सांगते.
ऑडिशनमध्ये खूप धावपळही होऊ लागली. मध्यंतरी मॉडेलिंगही केलं. अभिनयक्षेत्रात मात्र ती फारशी रमली नाही. याबाबतचं कारण विचारलं असता ती सांगते, “इथं बाहेरून आलेल्यांना नीट वागणूक मिळतेच असं नाही. मनासारख्या भूमिका तर मिळतच नाहीत. “२०११च्या सुमारास मी आले तेव्हा ओटीटी माध्यम यायचं होतं. चित्रपटांत कामं मिळणं म्हणजे जीवघेणा संघर्ष होता. अशावेळी टीव्ही माध्यमांकडे बहुतांशांची धाव होती. सीरियल्समध्ये छोट्या वयातील मुलींना साडी घालून ‘बहू’ म्हणून उभं केलं जात होतं. त्यांच्या गुणांची पारख तरी कशी होणार? शिवाय, ऑडिशनचे कित्येक अनुभवही फारसे चांगले नव्हते. त्यावेळी ठरवलं, हे आपलं काम नाही. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे.”
असंच एकदा कुणीतरी स्वप्नीलाला (Swapnila Gupta) म्हणालं, “तू खूप छान बोलतेस, तुझी भाषा अन् संवादकौशल्य उत्तम आहे. तू लिहीत का नाहीस?” स्वप्नीलाला इथं स्वत:चा नव्यानं शोध लागला होता. तिनं लिहायला सुरुवात केली. स्क्रिप्ट्स घेऊन अनेक प्रॉडक्शन हाउसेसची दारं ठोठावली. काही ठिकाणी विचित्र अनुभव आला. जे लिहिलं, त्याचं क्रेडिट इतर घेणारे भेटले. काही ठिकाणी तुटपुंजे पैसे, तर काही ठिकाणी तेही मिळत नव्हते. काही काळ तिनं ब्रेक घेतला.

२०१५च्या सुमारास तिनं हिंदीत ‘बली’ ही शॉर्टफिल्मची कथा लिहिली. ती दिग्दर्शक विशाल फुरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पसंत पडली. या कथेवर मराठीत चित्रपट करण्याचं ठरलं. २०१९ला त्याचं शूट सुरू झालं. ९ डिसेंबर २०२१ रोजी तो ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वप्नील जोशी, पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका आहे.
=====
कलाकृती मिडियाचे युट्यूब चॅनेल फॉलो करा: कलाकृती मीडिया युट्यूब
=====
आता फक्त लिहायचं, हेच ध्येय स्वप्नीलानं (Swapnila Gupta) ठरवलं. काही वाईट अनुभव येत गेले. तरी तिनं संघर्ष सुरूच ठेवला. यादरम्यान काही प्रॉडक्शन हाउसेसमध्ये कामं करून स्क्रिप्ट लिखाणातील बारकावेही शिकून घेतले. सध्या लिखाण आणि अँकरिंग असा तिचा प्रवास सुरू आहे.
इथं फक्त लिहिणारे आहेत, लेखक कुठे आहेत?
“या क्षेत्रात सध्या फक्त लिहिणारे झाले आहेत, लेखक कुठंतरी हरवत चालले आहेत. सध्या माध्यमं वाढली आहेत. कित्येक वाहिन्या आल्या आहेत. डेली सोप्स भरपूर प्रमाणात सुरु आहेत. नुसते एपिसोड्सचे सीन्स लिहिले अन् वाढवले जात आहेत. अशावेळी लेखकाचा कस तो काय लागणार? असं स्वप्नीलाचं (Swapnila Gupta) म्हणणं आहे.
“इथं प्रॉडक्शनला तुटपुंज्या पैशांत लिहिणारे मिळत आहेत. रायटर्स रूममध्ये त्यांना तासंतास बंद करून त्यांच्याकडून हवं तसं लिहून घेतलं जातं. मग ‘लेखक’ उरलाच कुठे”, अशी खंतही ती व्यक्त करते. टीव्हीमध्ये काम करणारे लेखक, कलावंत बरेचदा तिथंच अडकून पडतात. अर्थात यात काही अपवाद जरुर आहेत, असंही ती सांगते.

लेखकाचा सन्मान झालाच पाहिजे…
“कुठलीही दृश्य कलाकृती लेखकाशिवाय शक्य नाही. तो कथा रचेल तरच त्या कलाकृतीला आकार येणार. मात्र, दुर्दैवानं या क्षेत्रात लेखकाला अनेक ठिकाणी किंमत नाही, अशी स्थिती आहे. आपला कंटेंट कितीही चांगला असला तरी समोरच्याला व्हिजनच नसेल, तर आपण काय करणार? अशावेळी त्रास होतो. क्रेडिट अन् मानधनाचाही मुद्दा आहेच. आपल्या मूळ कथेची मोडतोड होणं, हेही वेदनादायी असतं – स्वप्नीला गुप्ता (Swapnila Gupta).
=========
हे देखील वाचा – मेहनत, गुणांचे ‘तेज’ ल्यायलेली तेजश्री: दाक्षिणात्य चित्रपटांमधला मराठमोळा चेहरा
=========
लेखक क्रिएटिव्ह आणि क्रिएटर असतात, हे इंडस्ट्रीनं लक्षात घ्यायला हवं. लेखकाला त्याचा सन्मान मिळालाच पाहिजे. योग्य मानधन आणि श्रेयही मिळालं पाहिजे. तुम्ही लेखकाला फक्त त्यानं लिहिलेल्या शंभर पानांचे पैसे देत नसता. तर त्यामागे त्याची असलेली मेहनत, त्याची गुणवत्ता, त्यानं या लिखाणासाठी केलेलं संशोधन, खर्ची घातलेली वर्षं या बाबीही महत्त्वाच्या ठरत असतात. याचं मोल जाणलं गेलं पाहिजे”, असं स्वप्नीलाचं स्पष्ट मत आहे.
शर्यत नको, समाधान हवं…
पुढच्या प्रवासाबाबत विचारलं असता स्वप्नीला म्हणाली, “मला टिपिकल लेखक व्हायचं नाहीये. मी जे लिहिन, तो इतिहासच बनला पाहिजे. जिवघेण्या शर्यतीत सहभागी होऊन स्वत:ला आजारी पाडायचं नाही. तर कासवगतीनं चालून उत्तमोत्तम लिखाणाची निर्मिती करायची आहे.”

सध्या ती लिखाणात कमालीची व्यस्त आहे. एका हॉरर, थ्रिलर वेब शोवर तिनं लक्ष केंद्रित केलं आहे. “तुमचं प्रॉडक्ट चांगलं असून चालत नसेल तर तुम्हाला त्याचं मार्केटिंगही करता यायला हवं”, असं ती म्हणते.
लेखकांच्या हक्कांविषयी विचारलं असता ती म्हणाली, “लेखकांनी आपल्याला नेमकं काय करायचंय, याबाबतची स्पष्टता ठेवायला हवी. आपली भूमिका ठाम ठेवायला हवी. लेखक असोसिएशन मदतीला असतंच. मात्र, स्वत:चीही काही तयारी ठेवायला हवी.”
=====
हे देखील वाचा – कित्येक गुणांचं ‘पॅकेज’ असलेली संवेदनशील अभिनेत्री: ऋचा इनामदार
=====
स्वप्नीला गुप्ता (Swapnila Gupta) तिच्या मतांशी प्रामाणिक अन् ठाम आहे. कठोर मेहनतीची तिची तयारी आहे. तिच्यातील आत्मविश्वास आणि गुण पाहता तिची लेखणी उत्तरोत्तर बहरत राहील अन् आपल्याला त्या माध्यमातून नवनव्या कलाकृती अनुभवायला मिळतील, याच शंकाच नाही.