हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
अदाकार शर्मिला टागोर (sharmila tagore)चा पहिला हिंदी सिनेमा होता शक्ती सामंत यांचा १९६४ साली आलेला ‘कश्मीर की कली’. या चित्रपटात तिचा नायक होता शम्मी कपूर. पण या सिनेमाची शूटिंग चालू असताना एकदा शशी कपूर सेटवर आले होते आपले मोठे भाऊ शम्मी कपूर यांना भेटण्यासाठी. पण त्यांना दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी सेट वरून बाहेर जाण्यास सांगितले होते! का? मोठा गमतीशीर किस्सा आहे.
शर्मिला (sharmila tagore)चा चित्रपटातील प्रवेश सत्यजित रे यांच्या बंगाली सिनेमातून झाला होता साधारणत: साठच्याच्या दशकाच्या आरंभी ‘अपूर संसार’ या सिनेमातून. याच काळात पृथ्वीराज कपूर यांचे दुसरे पुत्र शशीकपूर यांचा देखील चित्रपटात प्रवेश झाला. शशी कपूर हा इतर कपूर प्रमाणेच कमालीचा देखणा होता. त्या काळात त्याचे फोटो, मुलाखती त्या काळातील सिने मासिकातून येत होत.
शर्मिला टागोर (sharmila tagore)ला मनोमन शशी कपूर खूप आवडत होता. आजच्या भाषेत तो तिचा पहिला ‘क्रश’ होता. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती पण त्याचे फोटो पाहून ती त्याच्या प्रेमात पडली होती! तिला त्या काळात असं वाटत होतं बहुदा भारतातील प्रत्येक तरुण मुलगी शशी कपूरच्या प्रेमात पडलेली असेल. इतका तो हँडसम होता आणि शशी कपूर खरोखरच प्रिन्स चार्मिंग होता. तुम्ही त्या काळातील शशी कपूरची सिनेमे किंवा फोटो बघा तुमच्या लक्षात येईल.
१९६४ साली शम्मी कपूरसोबत शर्मिलाने ‘कश्मीर की कली’ या चित्रपटा द्वारे हिंदी सिनेमात प्रवेश केला. या सिनेमाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये चालू होते. एकदा सेटवर शशी कपूर आपला मोठा भाऊ शम्मी कपूर यांना भेटण्यासाठी आला होता. जेव्हा शशी कपूर आपल्या सेटवर आलेले आहेत हे शर्मिलाने पाहिले तेव्हा तिचे होशो अवास उड गये! तिचा आपल्या नजरेवर विश्वासच बसेना. ज्याच्यावर आपण मनोमन (एकतर्फी!) प्रेम केलं, ज्याचे तासंतास फोटो बघत आपण असतो, तो शशी! मदनाचा पुतळा ! हायली रोमँटिक पर्सन… साक्षात समोर सेट वर दिसतोय.
यामुळे तिच्या हृदयाची धडकन प्रचंड वाढली. श्वासोश्वास वाढले. चेहऱ्यावर गुलाबी रंग आणखी गडद झाला. भिरभिणारे डोळे आता सतत शशी कपूरला शोध घेत होते. नवथर तरुणीसारखी तिची अवस्था झाली होती. दिग्दर्शक शक्ती सामंत यांच्या ते लक्षात आले त्यांनी शर्मिलाची ओळख करून दिली. शशीने झुकून ‘हाय ब्युटी’ म्हणून तिच्याशी हस्तांदोलन केले. पण या कृतीने शर्मिला आणखीनच गोंधळली, मोहरली!
शक्ती सामंत यांनी पुढच्या शॉटची तयारी केली आणि शर्मिला (sharmila tagore)ला आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायला सांगितले आणि शॉट घ्यायला सुरुवात केली. परंतु त्या दिवशी शर्मिला काही केल्या व्यवस्थित काम करत नव्हती तिची नजर कायम शशी कपूरकडे जात होती आणि त्याच्या एका कटाक्षाने ती मोहरून जात होती. तिचा चेहरा फुलून येत होता. त्यामुळे सेटवर रिटेकवर रिटेक होत होते.
शेवटी शक्ती सामंत यांनी शशीला सांगितले की, ”बाबा रे तूच एकदा तिला समजावून सांग!” शशी कपूरने तिला सांगितले, ”शर्मिला, तुझा हा पहिलाच सिनेमा आहे. कामावर नीट कॉन्सन्ट्रेट कर.” शशी कपूरच्या त्या प्रेमळ सल्ल्याने ती आणखीनच गांगरून गेली. त्यामुळे कामातील चुका काही कमी होत नव्हत्या. रिटेकची संख्या वाढत होती शेवटी दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी शशी कपूर यांना विनंती केली, ”शशी तू या सेटवर जो पर्यंत आहेस तो पर्यंत माझी हिरॉईन तू इथे असताना येथे काम करू शकेल असे मला वाटत नाही! तेव्हा प्लीज लिव्ह माय सेट!” शशीने देखील हसत हसत सेट सोडला आणि तेव्हा कुठे शर्मिला (sharmila tagore) आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली आणि व्यवस्थित शॉट देऊ लागली.
=============
हे देखील वाचा : …आणि धर्मेंद्र यांनी परस्परांच्या सिनेमाच्या मुहूर्ताला उपस्थित राहून क्लॅप दिली!
=============
‘कश्मीर की कली’ नंतरचा शर्मिलाचा महत्त्वाचा चित्रपट होता बी आर चोप्रा यांचा ‘वक्त‘ या चित्रपटात मात्र तिला (sharmila tagore) तिच्या लाडक्या शशी कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली. तब्बल एक डझन सिनेमात या दोघांनी एकत्र काम केले. आ गले लग जा, आमने सामने, सुहाना सफर, मेरे हमसफर, माय लव्ह, अनाडी, न्यू दिल्ली टाइम्स, पाप और पुण्य, स्वाती…. दोघेही आपल्या पहिल्या भेटीतील प्रसंगाची आठवण काढून पुढे मनमुराद हसत असायचे!