दिलीप कुमारच्या आयुष्यातील सेन्सेशनल ‘अस्मा’ प्रकरण!
अगदी मोजक्याच चित्रपटात काम करून देखील अभिनेता दिलीप कुमार यांनी आपले संपूर्ण कला जीवन हिंदी चित्रपट सृष्टीत मौलिक भूमिका अदा करून अतिशय समृद्ध केले आहे. त्यांनी हिंदी सिनेमाच्या दुनियेत १९४४ (ज्वार भाटा) साली प्रवेश केला त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट १९९८ (किला) आला होता. याचाच अर्थ तब्बल चोपन्न वर्षे त्यांचा हिंदी सिनेमाच्या दुनियेत वावर होता या काळात त्यांनी चित्रपटात काम केलेल्या चित्रपटांची संख्या ५८ होती.
अतिशय गुणी कलावंत प्रत्येक भूमिका मन लावून करणारा, अभ्यासू आणि चिंतनशील व्यक्ती. दिलीप कुमारचे चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानी तर असायचीच पण प्रत्येक पिढीसाठी एक अभिनयाची पाठशाला असायची. दिलीप कुमार यांची प्रत्येक गोष्ट त्या काळात न्यूज बनत असे. १९६६ साली त्यांनी आपल्यापेक्षा २२ वर्षांनी छोटे असलेल्या सायरा बानोसोबत (Saira Banu) लग्न केले ही देखील त्या काळातली मोठी ब्रेकिंग न्यूज होती. या दोघांचा संसार अतिशय सुखाचा चालला होता पण एक दुसरी मोठी ब्रेकिंग न्यूज १९८२ साली आली. दिलीप कुमार यांनी हैदराबादच्या अस्मा रहमान नावाच्या एका मुस्लिम स्त्रीसोबत दुसरा निकाह केला!
त्याकाळी आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. इंटरनेट नव्हते. पण तरीही काही टॅबलौइड वृत्तपत्रांनी ही बातमी छापलीच. हैदराबादच्या एका वृत्तपत्राने तर त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटच पब्लिश केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ही बातमी वर्तमानपत्रातूनच सायरा बानोला (Saira Banu) कळली. तेव्हा ती मुळापासून हादरली. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याने आपली अशी प्रतारणा करावी? बरं ही गोष्ट काही एक-दोन दिवसात अचानक पण घडत नाही. इतके दिवस दिलीप कुमारने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली हे शल्य हे दुःख सायराला टोचणारे होते. सायरा बानोला खूप दुःख झाले.
दिलीप कुमारच्या आयुष्यात अस्मा नावाचे जे प्रकरण आले त्यावर त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये डिटेल लिहिले आहे. १९८१ मध्ये दिलीप कुमार सेलिब्रिटी क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हैदराबादला गेले होते. त्यांची बॅटिंग झाल्यानंतर अनेक चाहते त्यांना भेटायला आले. त्यात अर्थातच काही मुली स्त्रिया देखील होत्या. त्यातील एक होती अस्मा रहमान. ही बया तिच्या नवऱ्यासोबत त्यांना भेटायला आली. त्या वेळी ती तीन मुलांची आई होती. परंतु पहिल्या भेटीतच तिने असे काही डोरे दिलीप कुमार यांच्यावर टाकले की ते नकळतपणे तिच्याकडे ओढले जाऊ लागले. हळूहळू ती त्यांना मुंबईला देखील भेटायला येऊ लागली.
दिलीपच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेण्यासाठी तिने दिलीपच्या बहिणी सोबत मैत्री वाढवली आणि मग आउटडोरला जिथे दिलीप तिथे अस्मा दिसू लागली. सायरा मात्र या प्रकरणापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा सुगावा मीडियाला तर लागलाच नाही पण सायरा बनोला (Saira Banu) देखील लागणार नाही. एक वर्षभर त्यांचा हा प्रेमालाप चालू होता आणि १९८२ मध्ये दिलीप कुमारने अस्मासोबत लग्न केले. ही त्या काळातली फार मोठी सेन्सेशनल ब्रेकिंग न्यूज होती. खरं तर दिलीप कुमार यांचा धर्म त्यांना दुसरे लग्न करण्याची परवानगी देत होता पण रसिकांच्या मनात मात्र दिलीप कुमार पार उतरले गेले.
========
हे देखील वाचा : सिनेमाचा ‘ट्रेंड’ बदलवणारा सनी देओलचा ‘घायल’!
========
या काळात सायराला तिच्या आईने नसीब बानो यांनी सांगितले की, ”तू दिलीप कुमारच्या सोबत राहा. त्यांच्याबद्दल कुठेही वेडे वाकडे काही बोलू नकोस. हे अस्मा प्रकरण फार दिवस चालणार नाही!” नसीम बानोचे बोल खरे ठरले. काही दिवसातच अस्मा आणि दिलीप कुमार यांच्यात खटके उडू लागले आणि १९८३ च्या शेवटी या दोघांचा तलाक झाला!
त्यावेळी दिलीप कुमार यांनी सायरा बनोला एक पत्र लिहिले. यात त्याने, ”माझ्याकडून एक गंभीर चूक झाली आहे. मी तुझ्या भावनांशी खेळलो आहे. मला माफ कर.” अशी कबुली जवाब देत, ”मी पुन्हा असे कृत्य करणार नाही.” असे लिहून दिले. दिलीप कुमारने या पत्रावर आपल्या काही मित्रांच्या सह्या देखील घेतल्या. यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणारे लोक होते. दिलीप कुमारच्या आयुष्यात अस्मा प्रकरण जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने ते गेले देखील. सायरा बानोने (Saira Banu) मोठ्या मनाने दिलीप कुमार यांना माफ केले आणि या दोघांचा संसार पुन्हा एकदा आनंदात सुरू झाला!