‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मालिकांमध्ये रंगतोय सीझन्सचा खेळ…
आता पर्यंत वेबसिरीज आणि सिनेमात आपण सिझनचा ट्रेंड पाहिला पण आता मालिका विश्वातदेखील या ट्रेंडची लाट आलेली पाहायला मिळतेय. कधी लीप घेऊन तर कधी भूतकाळात जाऊन पुढच्या सिझनच कथानक रंगवल जातंय. प्रशांत दामले आणि कविता लाड – मेढेकर, या मराठी रंगभूमीवरील सदाबहार जोडीचं गाजलेलं नाटक म्हणजेच एका लग्नाची गोष्ट. एका वेगळ्या कहाणीसह याच नाटकाचा सिक्वेल अर्थात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ रंगमंचावर आलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा सीरियल देखील प्रेक्षकांनी आवडीने पाहिल्या त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या तर मालिका विश्वात या ट्रेंडची लाट आलेली पाहायला मिळतेय.
रात्रीस खेळ चाले (ratris khel chale) मालिका सुरू झाली आणि कोकणातील नाईक कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या कथेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मालवणी भाषेतील संवाद, कोकणामधील वाड्यातील शूटिंग प्रेक्षकांना भलतंच भावलं. अण्णा नाईकांच्या मृत्यूनंतरची कथा यात दाखवली प्रॉपर्टीवरून होणारे भावंडातील वाद, एकत्र कुटुंब जपत कधी एकमेकांशी भांडणारी तरी एकमेकांबददल प्रेम वाटणारी साधी माणसं त्यात रंगवली गेली. कोकणातील पारंपारिक सण, कोकणची खाद्य संस्कृती या मालिकेने अधोरेखित केले. याचाच दुसरा सिझन रात्रीस खेळ चाले २ आला त्यात मात्र ही मालिका भूतकाळात गेली शेवंता नावाचा उलगडा यात झाला. अण्णा नाईक जे पात्र सिझन १ मध्ये पहिल्याच दिवशी मृत्यूमुखी पडलं ते या सिझनमध्ये चांगलंच हिट झालं. कारण या सिझनमध्ये त्यांचा पूर्ण जीवन प्रवास दाखवला गेला. या मालिकेचा आता तिसरा सिझन रात्रीस खेळ चाले ३ आला आहे. यात पहिल्या सिझनचा उत्तरार्ध लेखक रंगवत असल्याचं दिसत आहे. सगळी मंडळी वाडा सोडून गेली, आता भकास वाड्यात कुठे बिल्डर घुसतांना दिसत आहेत, नाईक कुटुंब विभक्त झालंय आणि वाड्याची दयनीय अवस्था आहे हे पाहायला मिळतंय. पहिल्या सिझनच्या शेवटी असलेल्या उत्सुकतेचं उत्तर या सिझनमध्ये मिळणार आहे.
अग्गबाई सासूबाईचा (Aggabai Sasubai) आता दुसरा सिझन, अग्गबाई सूनबाई आला आहे. यात आसावरी, अभिजीत, सोहम, शुभ्राच्या नव्या लूक सोबतच शुभ्रा, सोहमच्या आयुष्याची पुढची वाटचाल पाहायला मिळतेय. शुभ्राने सासूला साथ देऊन तिच्या बबड्याला तर सुधरवलं पण आता सासू शुभ्राला तिच्या बबडूला शिस्त लावण्यात कसं मार्गदर्शन करते हे या सिझनमध्ये पाहायला मिळेल असं चित्र दिसतंय. लक्ष्य ही मालिका आपल्या चांगलीच लक्षात आहे. खाकी वर्दीची ताकद दाखवून ही मालिका लोकांना सजग करते. प्रत्येक एपिसोडला नवी कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळते. आता याचाच पुढचा सिझन नवे लक्ष्य आपल्या भेटीला आलाय. यातही अशाच नव्या कथा दाखवून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच चित्रण केलेलं दिसतंय.
एकूणच आता लोकप्रिय मराठी मालिकांचे सिझन येताना दिसत आहेत. हिंदी मालिका आणि वेबसिरीजचा हा ट्रेंड नवीन नाही पण मराठी मालिकेतही आता त्याची सुरुवात झालेली पाहायला मिळतेय. आणि या ट्रेंडला प्रेक्षक वर्गाचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय.
- सिध्दी सुभाष कदम