Shabaash Mithu Review- मिताली राज, महिला क्रिकेटचा आश्वासक चेहरा
यतो हस्ताः ततो दृष्टिः
यतो दृष्टिः ततो मनः
यतो मनः ततो भावो
यतो भावो ततो रसः॥ अर्थात जिथे हात आहेत तिथे दृष्टी आहे, जिथे दृष्टी आहे तिथे मन आहे, जिथे मन आहे तिथे भावना आहे आणि जिथे भावना आहे तिथे रस आहे. हा अभिनयदर्पणतेच श्लोक गिरवत मिताली राज लहानाची मोठी झाली. मिताली राज हे नाव आज केवळ भारतीयांचं नव्हे तर संपूर्ण जगाला ठाऊक आहे. भारतीय महिला क्रिकेट संघांची माजी कर्णधार. पण, या मिताली राज या नामक खेळाडूची ओळख आज जरी आपल्याला असली तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत तो चेहरा ओळखीचा नव्हता. हीच ओळख कशी निर्माण झाली? सोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाला जागतिक पातळीवर मान ताठ करून उभं राहण्याची प्रेरणा कशी मिळाली? याची संघर्षमय यशोगाथा ‘शाबाश मिथु’ सिनेमात दिसलेली आहे. (Shabaash Mithu Review)
वरवर मिथु म्हणजेच मिताली राज (तापसी पन्नू)चा चरित्रपट म्हणून या सिनेमाकडे पाहिलं गेलं तरी; तो केवळ तितका मर्यादित नाही. ही एक संघर्ष गाथा आहे. ज्यात भारतीय महिला क्रिकेट संघात सहभागी असलेल्या प्रत्येक महिला खेळाडूच्या संघर्षाच्या यात समावेश आहे. या संघर्षातूनच निघणारी प्रेरणादायी ठिणगी आपल्याला या सिनेमात बऱ्यापैकी पाहायला मिळते. सिनेमाची कथा आपल्या पर्यंत (प्रेक्षकांपर्यंत) पोहोचते. पण, ‘सिनेमा’ म्हणून ती तितकासा प्रभावशाली झालेला नाही. पटकथा बांधणीत लेखक दिग्दर्शक काहीसे कमी पडले आहेत. (Shabaash Mithu Review)
मिताली राज, भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार, देशातील सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक, लहानपणी इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे ती देखील सर्वसामान्यच होती. पण, तिची महत्वकांक्षा मात्र असामान्य होती. लहानपणी तिनं सुरुवातीला भरतनाट्यमचे धडे घेतले. योगायोगाने तिच्या हाती कपडे धुण्याचं धोपटणे आले; आणि तिच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. सराव… सराव आणि सराव हे सूत्र उराशी बाळगुन तिनं भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान मिळवलं. यात तिला नेमकी कोणाची साथ लाभली; कोणी तिच्या या यशावर नाकं मुरडली? हा सर्व प्रपंच सिनेमात तुम्हाला पूर्वार्धात पाहायला मिळतो. (Shabaash Mithu Review)
महिला क्रिकेटपटूंनी स्वतःची ओळख मिळवण्यासाठीची केलेली धडपड, क्रिकेटपर्यंत मुला-मुलींमधील भेदभाव आणि महिला क्रिकेटपटूंना तेव्हा मिळालेला दुजाभाव; या सगळ्या मुद्द्यांवर सिनेमा भाष्य करतो. प्रिया एवेन लिखित आणि सृजित मुखर्जी दिग्दर्शित, हा सिनेमा आपल्या केवळ मिताली राज हीच संघर्ष दाखवत नाही तर इतर खेळाडूंच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व देखील हा सिनेमा करतो. बालपणापासून ते २०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषकापर्यंतचा प्रवास सिनेमात आहे. पण, एक बाब आवर्जून खटकते; ती म्हणजे मितालीचं मैदानावरील खेळाडू म्हणून, कर्णधार म्हणून असलेलं कार्यकर्तृत्व दाखवण्यात सिनेमा कमी पडला आहे.
तथापि, ज्या प्रकारचा आर्थिक-सामाजिक संघर्ष आपण आपल्या इतर नायक-नायिकांच्या आयुष्यात पाहतो, मितालीला अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. पैशांची चणचण नाही, पालकांचे मन वळवण्याची धडपड नाही. पण, हे सर्व आलबेल असताना टीममधील इतर सहकारी खेळाडूंनमध्ये स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी केलेला वैयक्तिक संघर्ष सिनेमात दिसतो. पण सिनेमाचा एक महत्त्वाचा कमकुवत दुवा म्हणजे त्याची संथ गती. अनेक दृश्ये विनाकारण पटकथेत ताणलेली दिसतात. विशेषत: हार मानल्यानंतर मिताली स्वतःच्या घरी परतते; त्यांनतर काही मिनिटं सिनेमात कंटाळवाणी आहेत. (Shabaash Mithu Review)
सिनेमातील एक प्रसंगात आहे. क्रिकेट बोर्ड महिला खेळाडूंना यापूर्वी भारतीय संघाच्या पुरुष खेळाडूंनी वापरलेल्या त्यांच्या नावाच्या जर्सी देतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडूंना स्वतःच्या नावाची हक्काची जर्सी देखील मिळत नाही. जर्सीवर स्वतःच्या नावाची ओळख मिळवण्यासाठीच त्या झटतात; हाच खडतर प्रवास रंजक दृष्ट्या सिनेमाच्या उत्तरार्धात आपल्याला पाहायला मिळतो. उत्तरार्धातील ‘महिला क्रिकेट वर्ल्ड कप’चा कथानकातील ट्रॅकही कंटाळवाणा आहे. लागोपाठ क्रिकेट सामन्याची दृश्य आपल्या समोर येतात. त्या सामन्यातील खेळी दिग्दर्शकाने याठिकाणी आवर्जून दाखवणं अधिक संयुक्तीत ठरलं असतं. त्यामुळे मिताली राजचं मैदानावरील कार्यकर्तृत्व दाखवण्यात हा सिनेमा कमी पडतो.
अभिनयाचा विचार केला तर तापसीची मेहनत रंगली आहे. तिने मितालीची भूमिका उत्तमरीत्या निभावली आहे. विशेषकरुन देहबोली लाजवाब आहे. तथापि, तिच्या लूकवर अधिक चांगले काम केले जाऊ शकले असते. तिच्या चेहऱ्यावरचा गडद मेकअप लक्ष विचलित करतो. मितालीच्या कोचच्या भूमिकेत विजय राज यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. अनुभवी आणि मुसद्दी कलाकाराची छबी त्यांच्यात दिसते. याशिवाय छोट्या मिथुच्या भूमिकेत इनायत वर्मा आणि नूरीच्या (मितालीची मैत्रिण) भूमिकेत कस्तुरी जगनम यांनी मन जिंकलं आहे. समीर धर्माधिकारी आणि तितिक्षा तावडे या मराठी कलाकारांचं सिनेमातील काम ही उमदा आहे. समीर यांनी मितालीच्या वडिलांची प्रदीर्घ भूमिका विविध वयोगटातील सुरेख निभावली आहे. परिपूर्ण सिनेमा म्हणून ‘शाबाश मिथु’ काहीसा कमी असला तरी तो नक्कीच प्रेरणादायी आणि बघण्याजोगा आहे. (Shabaash Mithu Review)
निर्मिती : वायकॉम १८ स्टुडिओज
दिग्दर्शक : सृजित मुखर्जी
लेखन : प्रिया एवेन
कलाकार : तापसी पन्नू, विजय राज, समीर धर्माधिकारी
छायांकन : शीर्षा रे
संकलन : ऐ. श्रीकर प्रसाद
दर्जा : तीन स्टार