‘जंगली’ मधील शम्मी कपूरचा रोल जगदीपला ऑफर झाला होता ?
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील हिंदी सिनेमातील गाजलेला कॉमेडियन जगदीप (Jagdeep) यांनी हिंदी सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून प्रवेश केला होता. १९५१ साली आलेल्या ‘अफसाना’ या चित्रपटात पहिल्यांदा जगदीप यांनी चेहऱ्याला रंग लावला. हा सिनेमा बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर जगदीप यांनी पुढची पाच सहा वर्षे बालकलाकार म्हणून तब्बल २५ सिनेमात काम केले. ‘आरपार’ या गुरुदत्त दिग्दर्शित चित्रपटातील ‘कभी आर कभी पार लागा तीर-ए-नज़र’ या गाण्यातील बाल कलाकार जगदीप आजही आपल्याला चटकन ओळखू येतो. (Jagdeep)
बाल कलाकार म्हणून यशस्वी कारकीर्द झाल्यानंतर जगदीप (Jagdeep) यांना पहिल्यांदा सोलो हिरोचा रोल मिळाला मद्रासच्या एव्हीएम प्रोडक्शनच्या ‘भाभी’ या चित्रपटात. यात जगदीप यांची नायिका अभिनेत्री नंदा होती. चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. एव्हीएम प्रोडक्शनने अभिनेता जगदीपसोबत (Jagdeep) पाच वर्षाचा करार केला होता. या काळात त्याला फक्त आणि फक्त एव्हीएमच्याच चित्रपटात काम करण्याची परवानगी होती. इतर बॅनरच्या कुठल्याही चित्रपटात तो काम करू शकत नव्हता. (Jagdeep)
‘भाभी’ हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर एव्हीएमचा पुढचा चित्रपट होता ‘बरखा’. यात त्यांची नायिका पुन्हा एकदा नंदा होती. या चित्रपटालादेखील बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. लागोपाठ दोन हिट चित्रपट दिल्यानंतर साहजिकच इतर चित्रपट निर्माता दिग्दर्शकांचे लक्ष जगदीप (Jagdeep) वर गेले आणि त्यांनी जगदीपला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. सुबोध मुखर्जी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुबोध मुखर्जी यांना त्यांच्या आगामी ‘जंगली’ या चित्रपटासाठी त्यांना जगदीप नायक म्हणून हवा होता! हो नायकच!! परंतु एव्हीएमचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जगदीपला ही भूमिका करता आली नाही. नंतर ही भूमिका शम्मी कपूरला ऑफर झाली आणि तो सुपरस्टार बनला. (Jagdeep)
याच वर्षी बी आर चोप्रा यांनी ‘धर्मपुत्र’ या चित्रपटासाठी जगदीपचा विचार केला. चोप्रा यांना खात्री होती जगदीप नक्की आपल्या सिनेमात काम करेल कारण बालकलाकार म्हणून पहिला ब्रेक बी आर चोप्रा यांनीच दिला होता. पण इथेदेखील कॉन्ट्रॅक्ट आडवं आलं आणि ही भूमिका नंतर शशी कपूर यांना मिळाली. याच काळात बिमल रॉय यांनी ‘प्रेम पत्र’ या चित्रपटासाठीदेखील जगदीपचा (Jagdeep) नायक म्हणून विचार केला होता. पण ही भूमिका देखील एव्हीएमच्या कॉन्ट्रॅक्टमुळे शशी कपूरला मिळाली. म्हणजे जगदीपला ऑफर झालेल्या भूमिका शम्मी कपूर आणि शशी कपूर यांना मिळाल्या. या सर्व प्रकाराने जगदीप प्रचंड नाराज झाला आणि त्याने एव्हीएम कंपनीला तसे कळवले पण एव्हीएमने पुन्हा कॉन्ट्रॅक्टचा कागद पुढे केला. (Jagdeep)
एव्हीएमने त्यांचा पुढचा ‘शादी’ हा सिनेमा जगदीपला ऑफर केला होता पण जगदीपने (Jagdeep) त्याला नकार दिला आणि कॉन्ट्रॅक्ट तोडले! पुढे ती भूमिका मनोज कुमारच्या वाट्याला आली. एव्हीएमच्या पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जगदीपच्या हातातून तीन सोन्यासारख्या संधी निघून गेल्या. कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त झाल्यानंतर जगदीपने (Jagdeep) पुन्हा हातपाय हलवायला सुरुवात केली पण आता काळ निघून गेला होता. पुनर्मिलन, राजा, नूरमहल या चित्रपटातून नायक म्हणून तो आला पण यापैकी कुठलेही चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे त्याने छोट्या-मोठ्या भूमिका आणि कॉमेडी भूमिका करायला सुरुवात केली. (Jagdeep)
१९६८ साली आलेल्या ’ब्रह्मचारी’ या चित्रपटापासून कॉमेडियन म्हणून तो क्लिक झाला. सत्तरच्या दशकात तो आघाडीचा विनोदवीर ठरला. शोले या चित्रपटातील त्याची ‘सुरमा भोपाली’ ची भूमिका प्रचंड गाजली पण जगदीप (Jagdeep) नंतर एका ठराविक साच्यात अडकू लागला त्यामुळे प्रेक्षक त्याच्या अभिनयाला कंटाळू लागले. (Jagdeep)
============
हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
============
सर्व नशिबाचा भाग आहे. जर सुबोध मुखर्जी यांच्या ‘जंगली’ या चित्रपटात जगदीपने (Jagdeep) नायकाची भूमिका केली असती तर तो चित्रपट चालला असता का? प्रश्नच आहे आणि तसे झाले असते तर शम्मी कपूरचे काय झाले? तो कधी क्लिक झाला असता? असो, हा सगळा जर तर चा गमतीचा मामला आहे! (Jagdeep)