पहिल्याच सिनेमात ती चक्क दिलीप कुमारची नायिका ठरली !
आपल्याकडे नायिकांच्या सौंदर्याच्या काही ठराविक व्याख्या ठरलेल्या आहेत. लख्ख गोरा वर्ण, चाफेकळी नाक, नाजूक जिवणी, रसरशीत ओठ… पन्नासच्या दशकात तर असेच टिपिकल भारतीय सौंदर्य असणारी स्त्री सिनेमाची नायिका म्हणून असायची. अशा वातावरणात एक बोल्ड आणि तिखट सौंदर्य असणारी एक तरुण मुलगी हिंदी सिनेमाच्या दुनियेत आली आणि पहिल्याच सिनेमात ती चक्क दिलीप कुमारची नायिका ठरली ! ही हिरोइन होती नादिरा. (Dilip Kumar)
कोणत्याही अँगलने भारतीय सिनेमाची नायिका असणाऱ्या तत्कालीन व्याख्यात बसणारी नव्हती. काहीसं उग्र सौंदर्य, चेहऱ्यावरील गर्विष्ठ भाव आणि कुर्रेबाज नजर असं असतानाही ती दिग्दर्शक मेहबूब यांची पत्नी सरदार अख्तर यांच्या नजरेस पडली आणि त्यांनी आपले पती मेहबूब यांना हिला घेऊन चित्रपट काढण्याचा हट्टच धरला. तेव्हा महबूब एका महत्त्वाच्या सिनेमाच्या निर्मितीची मांडणी करत जास्त होते. हा भारतातील पहिला टेक्निकलर सिनेमा होता. सर्वत्र या सिनेमाची मोठी हवा निर्माण झाली.
या सिनेमात नादीराची वर्णी लागली. तिचे खरे नाव फ्लोरेंस इझेकल. ५ डिसेंबर १९३२ ला तिचा बगदाद इथे जन्म झाला. जन्माने यहुदी. ती लहान असताना च तिचे कुटुंबीय बगदाद हून मुंबईत आले.मुंबईतच शिकली. सतरा अठरा वयाच्या फ्लोरेंस ला सरदार अख्तर यांनी बघितला आणि त्यांना ती जाम आवडली. त्यानीच तिचे फिल्मी नाव ‘नादिरा’ केलं. अशा रीतीने तिला पहिला सिनेमा अमिलाला. ‘आन’ या सिनेमात ती चक्क दिलीप कुमारची नायिका होती. यात तिने एका गर्विष्ठ राजपूत राजकन्येचा रोल केला होता. या चित्रपटात निम्मी आणि प्रेमनाथ यांच्या देखील भूमिका होती. चित्रपटाला संगीत नौशाद यांचे होते. चित्रपट सुपरहिट झाला आणि नादीराला मेहबूब यांनी पुढच्या चित्रपट करण्याचा करार केला.
पण याच काळात नादीराची भेट नक्षब या गीतकार शी झाली. नक्षब यांनी १९४९ सालच्या ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला…’ हे गाणे लिहिले होते. पन्नास च्या दशकात त्यांनी निर्माता होण्याचे ठरवले. नादिरा आणि नक्शब यांची प्रेम कहानी याच काळात सुरू झाली. नादिरा ने नक्षब सोबत निकाह केला. नक्षब रंगीन मिजास असलेले व्यक्तिमत्व होते. नादिरा च्या पैशावर त्यांची मस्ती चालू होती. त्यांनी नादीराला मेहबूब सोबत चा चित्रपटाचा करार मोडायला लावला आणि तिच्याच पैशातून त्यांनी दोन चित्रपटाची निर्मिती केली नगमा आणि रफ्तार. (Dilip Kumar)
दुर्दैवाने दोन्ही सिनेमे फ्लॉप झाले. नक्षब रंगीला माणूस होता. घरात पत्नी असताना तो रोज नव्या मुलीला घेऊन यायचा. नादीराला आहे पटणे शक्यच नव्हते. त्यांच्यात वादावादी होऊ लागली , भांडण होऊ लागली आणि एक दिवस नादिरा नेसत्या वस्त्रानिशी त्याचे घर सोडून आईकडे आली. याच काळात नादीराला राज कपूर यांनी त्यांच्या श्री 420 या चित्रपटात एक ग्रे निगेटिव्ह शेडची भूमिका दिली. चित्रपट होता श्री 420. यातील ‘मुडमुड के ना देख मुडमुड के…’ हे गाणे नादिरावर चित्रीत झाले. यातील तिचा अदा जबरदस्त होती. तिची सिगारेट पिण्याची अदा प्रचंड लोकप्रिय झाली होती. या भूमिकेचा तिला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान झाले. कारण तिला तशाच प्रकारच्या भूमिका आता ऑफर होणार लागल्या.(Dilip Kumar)
दिलीप कुमारची (Dilip Kumar) नायिका असलेली नादिरा आता खलनायकी स्वरूपाच्या भूमिका करू लागली. त्या काळात बी ग्रेड सिनेमांमध्ये नायिका म्हणून चमकत होती. परंतु अशा चित्रपटातून तिला ना लोकप्रियता मिळत होती ना पैसा मिळत होता. याच काळात तिने आणखी एक निकाह केला पण तो देखील फेल गेला. १९६० सालच्या किशोर साहू यांच्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील एक निगेटिव्ह शेड ची भूमिका मिळाली. राजकुमार मीनाकुमारी सोबतच नादिरा ची भूमिका गाजली.
पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. चांगल्या भूमिका तिला मिळतच नव्हत्या. या काळात तिचे नाव मोतीलाल या अभिनेत्या सोबत जोडले गेले. मोतीलाल यांची निर्मिती असलेल्या ‘छोटी छोटी बाते’ या चित्रपटाची ती नायिका होती.हि तिची नायिका म्हणून शेवटची भूमिका ठरली. यानंतर तिने ‘ हम कहा जा रहे है’ या चित्रपटापासून चरित्र अभिनेत्रीची भूमिका सुरू केली. मग मात्र तिच्याकडे अनेक भूमिका येवू लागल्या. पण या सर्व एक सारख्या टाइपड भूमिका होत्या. अँग्लो इंडियन, ख्रिश्चन स्त्रियांच्या भूमिका आल्या की हमखास नादिरा ची आठवण यायची. पाकीजा, इश्क इश्क इश्क, हंसते जखम या चित्रपटातील तिच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. (Dilip Kumar)
=============
हे देखील वाचा : शम्मी कपूरसाठी पहिल्यांदा किशोर कुमारांनी गायलं हे गाणं
=============
नादिराला लाईफ टाईम मेमोरेबल रोल मिळाला तो १९७५ साली ‘ज्युली’ या सिनेमात. या चित्रपटातील एका अँग्लो इंडियन स्त्रीची भूमिका अतिशय अप्रतिम होती. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला. हा नादीरा ला मिळालेला एकमेव पुरस्कार ठरला. यानंतर ती कॅरेक्टर रोल मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतच होती पण हळूहळू तिचे सर्व नातेवाईक इजराइल ला जात होते शेवटी ती अक्षरशः एकटी मुंबईमध्ये राहत होती. शेवटची काही वर्षांपूर्वी ती अक्षरशः एकाकी होती. दारावर वाजणारे बेलची आणि टेलिफोनच्या रिंग ची ती दिवसभर वाट पाहत असायची. २००६ साली तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही दिवसातच तिचे निधन झाले. तिच्या अंत्यसंस्काराला हातावर बोटावर मोजता येतील इतके लोक उपस्थित होते. मीडियाने देखील तिच्या निधनाची फारशी नोंद घेतली नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही मायानगरी असल्याने इथे आणखी काय वेगळी अपेक्षा. आज ५ डिसेंबर. नादिरा चा जन्मदिन. नव्या पिढीला तिची माहिती व्हावी म्हणून हा लेख प्रपंच.