‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
विलोभनीय -सोनार पहार
माणूस जस जसा वृद्धापकाळाकडे झुकू लागतो तस तसा तो अधिक एकांगी आणि एकाकी होत जातो. आसपासची माणसं आपापल्या कामात गुंतलेली असतात. या आपल्या जवळच्या माणसांनी आपल्या कडे लक्ष द्यावं, आपली विचारपूस करावी ही अपेक्षा फोल ठरली की दुरावा अधिक वाढत जातो. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या राहून गेल्या, ही खंत जीव पोखरू लागते. अशावेळी अचानकपणे सानिध्यात आलेली अपरिचित व्यक्ती या इच्छांना खतपाणी घालते. आयुष्याचा अर्थ नव्याने उमगू लागतो. दुरावलेल्या आप्तस्वकीयांची मनोवस्था समजून घ्यावीशी वाटू लागते. संधीकालाला एक सोनेरी किनार लाभते.
‘सोनार पहार’ (Shonar Pahar) हा परमब्रता चटर्जी दिग्दर्शित चित्रपट हा उपमा चटर्जी [तनुजा] या वृद्धेच्या आयुष्यातील अशाच संधीकालाचे तरल चित्रण करतो. मुलगा व सून यांच्या पासून दुरावलेल्या वृद्धांच्या कथा आणि व्यथा सांगणारे अनेक चित्रपट आपल्याकडे तयार होतात. त्यात अनेकदा एकसुरीपणा जाणवतो. ‘सोनार पहार’ मात्र उपमा या वृद्धेची गोष्ट सांगताना हा एकसुरीपणा टाळून त्या नातेसंबंधातील विविध पैलूंना अधोरेखित करतो. आणि त्या पलिकडे जाऊन उपमा आणि एक अनाथ मुलगा बिटलू [श्रीजतो बंडोपाध्याय] यांच्या मध्ये निर्माण झालेल्या अनुबंधाचे सुद्धा हृदय दर्शन घडवतो.
उपमा ही वृद्ध स्त्री तिच्या मालकीच्या घरात मोलकरणीच्या मदतीने रहात असते. तिच्या मुलाने, सौम्याने [जीशु सेनगुप्ता] स्वतंत्र संसार थाटला आहे. दूर राहूनच तो आपल्या आईची जमेल तशी काळजी घेतोय. त्याच्या बायकोच्या, मौमिता [अनुरीमा घोष], मनात सासूबद्दल अढी आहेच पण खुद्द सौम्यालासुद्धा आपल्या आईचे वागणे वेळोवेळी खटकत आलेलं आहे. पतीच्या निधनानंतर उपमाने सौम्याला लहानाचा मोठा केलेला असल्यामुळे तिला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. पण आता या वळणावर आपला मुलगा आपल्याशी कधी सामंजस्याने वागणार नाही याबद्दल तिची खात्री झालेली असते.
उपमा एकेदिवशी बाथरूममध्ये पडते आणि तिची फिजीओथेरपी करायला राज [परमब्रता चटर्जी] तिच्या घरी येतो. राज सौम्याचा बालमित्र त्यामुळे त्याचा उपमा बरोबर चांगलाच परिचय असतो. अनेक वर्षांनी त्या घरी आल्यावर त्याला उपमाचा एकाकीपणा जाणवतो. राज आनंदघर ही सेवाभावी संस्था चालवत असतो. एकटे राहणारे वयोवृद्ध आणि अनाथ मुले यांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्यातील काही क्षण आनंदात घालवण्याचे प्रयत्न त्याची संस्था करत असते. उपमाचा दिवसातील काही वेळ मजेत जावा म्हणून तो बिटलूला तिच्या घरी आणून सोडतो. अवखळ बिटलूने केलेली मस्ती उपमाला अजिबात सहन होत नाही.
बिटलू उपमाची अनेक वर्षाची शांतता भंग करून टाकतो. त्यातच तो एचआयव्ही बाधित आहे हे समजल्यानंतर तिच्या मोलकरणीची बिटलूकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. राज मात्र बिटलूला उपमा आजीला सॉरी म्हणायला लावतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला तिच्या घरी घेऊन येतो. हळूहळू उपमाला बिटलूचा निरागसपणा आवडू लागतो. ती त्याच्यावर माया करू लागते. बिटलूला सुद्धा या उमाआजीचा लळा लागतो. उपमाच्या मनातील अनेक अतृप्त इच्छा ती बिटलूच्या सहवासात पूर्ण करू लागते. फाईव्ह स्टार हॉटेल मधील खाण्यापासून भर रस्त्यात टॅक्सी चालवण्यापर्यंत बिटलूचे सगळे हट्ट ती आनंदाने पुरवते व त्यायोगे स्वतः आपल्या इच्छा पूर्ण करत जाते. यातलीच एक इच्छा असते सोनार पहार पाहण्याची!
कांचनगंगा हिम शिखरावर पसरलेली सोनेरी किरण पाहण्याची तिची इच्छा पूर्ण होते का? ही इच्छा पूर्ण करताना तिच्यात आणि सौम्यामध्ये निर्माण झालेली दरी दूर होऊ शकते का? याचं उत्तरे ‘सोनार पहार’च्या उत्तरार्धात आपल्याला मिळतात. एकटेपणाने ग्रासलेली एक वृद्ध स्त्री आणि एचआयव्हिची लागण झाल्याने मृत्युच्या जवळ गेलेला एक लहान अनाथ मुलगा यांच्यातील भावबंध ‘सोनार पहार’ टिपत असला तरीही त्याच्या बरोबरीने अनेक सामाजिक मुद्दे परमब्रता आणि पावेल या पटकथाकार जोडीने खुबीने त्यात गुंफले आहेत. उतार वयात जोडीदाराची असलेली निकड, आईच्या हेकेखोर स्वभावामुळे तरुण मुलांच्या मनात निर्माण होणारी अढी आणि त्यातून येणारा दुरावा, समाजाचा एड्सग्रस्त व्यक्तीकडे पाहण्याचा दूषित दृष्टीकोण असे अनेक मुद्दे पटकथेमध्ये त्यांनी मांडले आहेत. चित्रपटाची वाढलेली लांबी आणि मौमिताचे अल्पावधीत झालेले मतपरिवर्तन हे दोन दोष वगळता ‘सोनार पहार’ पाहणे हा एक आल्हाददायी अनुभव ठरतो.
या अनुभवाचे श्रेय अर्थातच प्रमुख भूमिकेत असलेल्या तनुजा आणि श्रीजतो बंडोपाध्याय या कलाकारांना द्यायला हवं. मुलगा आणि सुनेशी बोलताना स्वरात आलेला कठोरपणा, एकटी रहात असल्यामुळे स्वभावात आलेला हेकेखोरपणा आणि बिटलूच्या येण्याने हळुवार झालेली उमाआजी हे उपमाच्या व्यक्तिरेखेला असलेले सगळे कंगोरे तनुजानी अप्रतिमरीत्या व्यक्त केले आहेत. अनेक वर्षांनी या अभिनेत्रीचे पडद्यावरील दर्शन सुखावणारे आहे. बिटलूच्या भूमिकेतील श्रीजतोने त्याच्या निरागस चेहऱ्यामुळे अर्धी बाजी जिंकली आहे. आपल्या आजाराबद्दल, अनाथपणा बद्दल त्याला माहिती आहे. हे वास्तव झेलत असताना तो उपमाच्या आयुष्यातील काही क्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. तिला बिलगतो, तिच्या कडे हट्ट धरतो, तिच्यावर रागावतो सुद्धा! तनुजा आणि श्रीजतो यांच्यातील जमून आलेली केमिस्ट्री ही या चित्रपटाची सर्वात उजवी बाजू आहे.
दिवंगत सौमित्र चटर्जींना रजत या उपामच्या मित्राच्या भूमिकेत पाहणे ही सुद्धा एक पर्वणीच आहे. जिसु सेन्गुप्ताच्या वाट्याला आलेली सौम्याची भूमिका आव्हानात्मक आहे. आईचा राग करणारा सौम्याला अखेरीस उपमा आणि बिटलूमधील प्रेम पाहून हेवा वाटतो तो प्रसंग त्याने भावपूर्ण केला आहे. कांचनगंगाच्या पहाडी रांगावर संधीकाली पसरलेला सोनेरी प्रकाश जितका विलोभनीय दिसतो तसाच हा सिनेमा सुद्धा आहे.
[सोनार पहार आता नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे]