
‘Chala Hava Yeu Dya 2′ च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; वाढदिवसाच्या शुभेच्छांतून दिसल दोघांमधल खास नातं!
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला प्रेक्षकांचा लाडका कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ नव्या पर्वासह लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनमध्ये नव्याने काही चेहरे दिसणार असले, तरी आपल्या जुन्या आवडत्या कलाकारांनाही पुन्हा पाहायला मिळणार आहे. मात्र या पर्वात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे नवा होस्ट अभिजित खांडकेकर आणि त्याच्यासोबत जोडलेलं एक खास नातं.(Chala Hava Yeu Dya 2)

या सीझनमध्ये निलेश साबळेची जागा अभिनेता अभिजित खांडकेकर घेणार आहे. त्याच्यासोबत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार आपल्याला पुन्हा एकदा हसवायला सज्ज झाले आहेत. काल अभिजित खांडकेकरचा वाढदिवस होता. आणि या खास दिवशी त्याच्या सहकलाकार आणि जवळच्या मैत्रिणीपैकी एक असलेल्या श्रेयाने एक भावनिक पोस्ट लिहून दोघांमधल्या नात्याची जाणीव सगळ्यांनाच करून दिली आहे.

श्रेयाने लिहिलंय, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अभी! मी तशी फार वेळा बोलून व्यक्त होत नाही, पण आज लिहावंसं वाटतंय. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं… प्रकृती ठीक नव्हती, पण त्या काळात तू माझ्यासोबत खंबीरपणे उभा होतास. तू खरंच देवदूत होतास.” पुढे ती म्हणते, “तू एक खूप चांगला माणूस आहेस, दुसऱ्याच्या अडचणीत तात्काळ धावून जाणारा. माझ्या आयुष्यात तू आहेस, यासाठी मी स्वतःला खूप नशिबवान समजते. तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला मिळावा, अशीच इच्छा.” अखेर ती नमूद करते , “आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करायला मिळणार, त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तुला उत्तम कामं, उत्तम आरोग्य आणि यश मिळावं हीच सदिच्छा. खूप खूप प्रेम.” या पोस्टवर अभिजितनेही भावनिक प्रतिक्रिया देत श्रेयाचं आभार मानलं , “श्रेयाताई, तू खूप खास आहेस. खूप खूप प्रेम.” श्रेयाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या आणि अभिजितच्या काही खास आठवणींचे फोटोही आहेत. यातील एक फोटो त्यांच्या आगामी शोच्या शूटिंग दरम्यानचा असून, त्या लूकने चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे. (Chala Hava Yeu Dya 2)
================================
================================
‘चला हवा येऊ द्या २’ च्या निमित्ताने अभिजित आणि श्रेया एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत, आणि त्यांच्या या नव्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात चाहत्यांना खूप भावतेय. नव्या पर्वासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच, पण या दोघांच्या केमिस्ट्रीकडेही आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत!