दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मराठी संगीताच्या सुवर्णयुगाचे आधारस्तंभ श्रीनिवास खळे
राम श्याम गुणगानच्या निमित्ताने दोन भारतरत्नांना एकत्र आणण्याची किमया श्रीनिवास खळे यांनी केली होती. त्यानिमित्ताने एक वेगळी कलाकृती रसिकांच्या भेटीला आली. संगीत क्षेत्रात आपल्या स्वतःच्या चालींनी आणि प्रयोगांनी लक्षात राहणारे संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे.आज श्रीनिवास खळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतरत्न लता मंगेशकर यांनी श्रीनिवास खळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश
खळेसाहेबांनी, ‘एचएमव्ही’च्या ‘पाण्या तुझा रंग कसा’ या आल्बममधील ‘एका तळ्यात होती’ हे गीत गाण्यासाठी माझ्याकडे विचारणा केली होती, मात्र त्यावेळी मी रेकॉडिर्ंगमध्ये अतिशय व्यग्र असल्याने वेळ देणे शक्य झाले नाही. पुढे ते गाणे आशाने गायले आणि अतिशय लोकप्रियही झाले, मात्र तेव्हापासूनच श्रीनिवास खळे यांच्याशी संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते असं लतादीदी सांगतात.
मराठी संगीताच्या सुवर्णयुगाचे खळेसाहेब एक आधारस्तंभ होते,खळे यांची स्वत:ची शैली होती. ती कोणापासून स्फूरलेली किंवा कोणाचे अनुकरण करणारी नव्हती. त्यांनी मराठी संगीतसृष्टीवर अमीट असा ठसा उमटवला आहे. म्हणूनच दुसरे खळे होणार नाहीत, असे लतादीदी या लेखात म्हणाल्या म्हणाल्या.
मुंबईत आल्यावर आकाशवाणीवर काम करणाऱ्या खळे यांच्याशी आम्हा कुटुंबियांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या सोबत मोजकेच काम करण्याचा योग आला. ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे त्यांच्यासोबत केलेले पहिले गाणे. त्यानंतर ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गाणेही सिनेमासाठी केल्याचे दीदींनी सांगितले.
खळेंनी संगीत दिलेले ‘अभंग तुकयाचे’ केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी ‘राम श्याम गुणगान’ या हिंदी भक्तिगीतांसाठी त्यांनी मला विचारणा केली. अण्णा म्हणजेच पं. भीमसेन जोशी यांच्यासोबत ही गाणी करायची आहेत, हे समजल्यावर मी घाबरलेच होते. एवढ्या थोर शास्त्रीय गायकासोबत आपण कसे गाऊ शकू, याची चिंता मला वाटत होती. परंतु खळेंनी ते सगळे नीट निभावून नेले. दोन द्वद्वंगीते आणि दोन एकल गीते तेव्हा रेकॉर्ड केली होती, अशी आठवणही दीदींनी सांगितली.