
Siddharth Jadhav चा पहिला गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या पडद्यावर !
सिद्धार्थ जाधव…नाव उच्चारलं की अनेकांना लगेच हास्याची आठवण होते. विनोदाच्या सहज शैलीत, रंगीबेरंगी संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अभिनेता आज एक वेगळीच भावना व्यक्त करतोय. अभिमान, कृतज्ञता आणि कलात्मक प्रगल्भतेची भावना. त्याने आजवर अनेक चित्रपट केलेत. काही क्षणिक, काही लक्षात राहणारे. पण ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट त्या मोजक्या सिनेमांमध्ये मोडतो, जो काळाच्या पल्याड जाऊन लक्षात राहतो. हा सिनेमा केवळ यशस्वी ठरलेला प्रोजेक्ट नाही, तर सिद्धार्थसाठी तो एक भावनिक प्रवास आहे मनाच्या अगदी खोलवर भिडणारा. त्यानंतर आता हा ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थच्या कारकिर्दीतील पहिला असा सिनेमा ठरला, जो सलग ५० दिवसांपेक्षा अधिक काळ चित्रपटगृहात गाजला. प्रेक्षकांनी नुसतंच कौतुक केलं नाही, तर त्यांनी चित्रपटाला आपलंसं केलं. आणि हेच कौतुक प्रत्येक दिवसागणिक त्याच्यापर्यंत पोहोचत राहिलं आहे ते प्रत्यक्ष फोनवरून, सोशल मीडियावरून, आणि रंगमंचावरील टाळ्यांमधून.(Actor Siddharth Jadhav)

सिद्धार्थ स्वतः सांगतो, “रोज कोणीतरी नवं माणूस फोन करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर… जेव्हा अशा कलाकारांचा फोन येतो, तेव्हा वाटतं की सगळं मराठी अभिनयविश्व एकत्र येऊन पाठिंबा देतंय. हाऊसफुल शोज, टाळ्यांचा आवाज, आणि लोकांच्या डोळ्यात दिसणारी भावनिक प्रतिक्रिया या सगळ्याने हा सिनेमा माझ्यासाठी ‘फक्त सिनेमा’ राहिलाच नाही.” ‘मारुती कदम’ हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या विनोदी, उठावदार भूमिकांपासून खूप वेगळं होतं. हा एक शांत, संयमी, परिस्थितीने झपाटलेला बाप आहे. शब्द कमी पण भावना खोल, तो बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यात सगळं जग दिसतं. अशा व्यक्तिरेखेत शिरून अभिनय करणं म्हणजे स्वतःला झटकून त्या पात्रात हरवणं. सिद्धार्थने ते अगदी मनापासून केलं आहे.

पण अर्थात त्याच हे यश केवळ त्याचं वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते, ‘आता थांबायचं नाय’ हे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचं, प्रयोगशीलतेचं आणि सातत्याच्या मेहनतीचं प्रतीक आहे. एक असा सिनेमा, जो स्टारडमपेक्षा आशयाला आणि भावनांना प्राधान्य देतो. सिद्धार्थसाठी हा चित्रपट खास आहे कारण तो त्याच्या कारकिर्दीतील एक नवीन वळण आहे. एक हास्य अभिनेता, जो प्रेक्षकांना पोट धरून हसवत होता, आज त्यांच्या मनाला स्पर्श करतोय आणि ते ही शांत, गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या अभिनयातून. आणि म्हणूनच प्रेक्षक त्याच “हे सिद्धार्थचं सर्वोत्तम काम आहे!” असं म्हणत कौतुक करत आहेत.(Actor Siddharth Jadhav)
=====================================
=====================================
‘आता थांबायचं नाय’ आता थिएटरच्या चौकटीपलीकडे जाऊन लोकांच्या मनात घर करतंय. ते केवळ एका पात्राची कथा नाही, तर ती अनेक बापांची, अनेक घरांची आणि अनेक न बोलता जगणाऱ्यांची कहाणी आहे. आणि म्हणूनच सिद्धार्थ म्हणतो. “हा सिनेमा नाही, ही आठवण आहे… आणि ती कायम माझ्या हृदयात राहील.”