रसिकांची आभाळमाया
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अल्फा मराठीचा काळ होता. रात्री अनेक ठिकाणाहून एकच गीत ऐकू यायचे,” घननीळा डोह, पोटी गूढ माया, आभाळमाया”.(Aabhalmaya) गीतकार मंगेश कुलकर्णी यांचे शब्द, संगीतकार अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेलं शीर्षकगीत आणि त्या गीताला स्वर लाभला होता, तो सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित (Devaki Pandit) यांचा. आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास जाणून घेऊया.
सुरुवातीचे त्यांचे शिक्षण त्यांच्या आईकडे म्हणजे उषा पंडित यांच्याकडे झाले. त्यानंतर मग त्या पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेऊ लागल्या. पुढे मग गुरु किशोरी आमोणकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गुरु जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे देखील त्यांनी गायनाचे प्रशिक्षण घेतले.
देवकीताईंच्या आयुष्यात एक प्रसंग महत्वाचा आहे. त्या पंडित वसंतरावकुलकर्णी यांच्याकडे शिकत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे. काही महिने ते नव्हते. जाताना ते सांगून गेले होते की मी नसलो तरी व्यवस्थित रियाज करा. देवकीताई खूप रियाज करत राहिल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या आवाजावर झाला. त्या तीन वर्षे गाऊ शकल्या नव्हत्या. खूप कठीण काळ होता तो! पण त्यांनी निराश न होता जिद्द सोडली नव्हती. आपण गायचे आहेच, हे त्यांनी ठरवले.
त्या तंबोरा सुरु करून बसायच्या, पण गाऊ शकत नसल्याने त्यांच्या. मनाला खूप त्रास होत होता. त्यांनी त्या कठीण काळात सर्वांची गाणी ऐकली. संगीत खूप ऐकलं, श्वास आणि आवाज यांचं नातं काय ते त्यांना उमगत गेलं. तो कठीण काळ संपला. रियाज, साधना आणि गुरु या तीन गोष्टी संगीत क्षेत्रात पुढे जाण्यासाठी महत्वाच्या आहेत. रियालिटी शो हा पुढे येण्याचा एक मार्ग असेलही, पण रियालिटी शो मध्ये फेस व्हॅल्यू ला आणि ग्लॅमरला महत्व आहे. पण रियालिटीशो हे सर्वस्व नाही, हे देवकीताई ठामपणे सांगतात.
सा रे ग म सारख्या रियालिटी शो मध्ये त्या परीक्षक होत्या आणि त्यांची त्यावेळची परिक्षणाचीपद्धत सर्वांना आवडली होती, देवकीताईंनी अनेक मालिकांची शीर्षकगीते गायली आणि अशोक पत्की संगीतकार, देवकीताई गायिका असे एक समीकरण होऊन गेले. वादळवाट, अधुरी एक कहाणी, सांज सावल्या, फिरुनी नवी जन्मेन मी, सांजभूल, मृण्मयी, जगावेगळी, बंधन, मानसी अशा अनेक मालिकांची शीर्षकगीत त्यांनी गायली.
संगीतकार जे सांगेल त्या पद्धतीने देवकीताईंनी गाण्याचा कायम प्रयत्न केला, असे त्या सांगतात. संगीतकार श्रीनिवास खळे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की, आनंद मोडक अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गीते त्या गायल्या आहेत. गाण्यातले सगळे प्रकार गाता आले पाहिजेत, असे त्या म्हणतात.
हे नक्की वाचा: ‘आभाळमाया’च्या लोकप्रिय शीर्षकगीतामागचा खटाटोप
गाण्याचा जो प्रकार तुम्ही गात आहेत, त्यात तुम्ही तल्लीन व्हायला हवे, असे त्या म्हणतात. शास्त्रीय संगीत हे अभिजात आहे, अजरामर आहे, हे त्यांचे ठाम मत आहे. नशीबवान, माहेरची माणसं, अर्धांगी, राजू, जगावेगळी पैज, सावली, मी सिंधुताई सपकाळ, श्री सिद्धिविनायक महिमा, देवकी अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
अर्धांगी आणि सावली या चित्रपटांकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राज्यपुरस्कार मिळाला आहे. त्यांना कलाकृती मीडियाकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा