दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सावनी रवींद्रच्या गायन शैलीतील दिवाळी पहाटचा अनुभव
दीपावली आणि दिवाळी पहाट यांचं अलिकडच्या काळात जुळलेलं नातं खास आहे. सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र सांगत आहे आपल्या आठवणीतील दिवाळी विषयी.
“दिवाळी पहाट म्हटलं की, संगीताच्या अनेक मैफिली मनात रुंजी घालतात. यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरेल गाण्यांपासून शास्त्रीय संगीताच्या खास मैफिली आठवतात. अनेक महान शास्त्रीय गायक गायिकांना मी दिवाळी पहाट कार्यक्रमात ऐकलं आहे. पं.हरिप्रसाद चौरसिया, अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती यांच्यासारख्या मंडळींना ऐकताना कान तृप्त झाले.
त्यानंतरच्या काळात मी स्वत: दिवाळी पहाट कार्यक्रमात गायला लागले. हा एक खूप सुंदर अनुभव आहे. सुरांची आतषबाजी होत असताना रसिकांची मोकळी दाद अनुभवायला मिळते. तीन वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तोपर्यंत ‘होणार सून मी त्या घरची’ ही मालिका ऑफ एअर गेली होती. या मालिकेतील ‘नाही कळले कधी’ हे मी गायलेलं गाणं लोकांना खूप आवडलं होतं. मालिका संपल्याने या गाण्याची फर्माईश कुणी करणार नाही असं मला वाटलं होतं. पण चक्क त्या दिवाळी पहाट कार्यक्रमात या गाण्याला तीन वेळा वन्समोअर आला. ते गाणं विस्मरणात गेलं असणार याची खात्री असताना हा वन्समोअर आला. शेवटी मी गंमतीत प्रेक्षकांना विचारलं ही, ’माझं काही चुकतंय का? त्यामुळे तुम्ही वन्स मोअर देत आहात?’ त्यावर प्रेक्षकांनी सांगितलं की मालिका संपली तरी हे गाणं इतकं आवडतं की आम्ही युट्युबवर जाऊन ते पुन्हा पुन्हा ऐकतो. ही दिवाळी पहाटची आठवण माझ्या कायम स्मरणात राहील.
मागच्या वर्षीचीच गोष्ट. दिवाळी दरम्यान मी सर्दी खोकल्याने हैराण झाले होते. दिवसाच आवाज नीट लागत नव्हता त्यामुळे पहाटेला आवाज कसा लागेल याची मला चिंता होती. कारण पहाटे ५ च्या कार्यक्रमासाठी आम्ही ३ वाजल्यापासून उठलेले असतो. पण मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले आणि ते मंगल वातावरण, रसिकांची उत्सुकता असा माहोल पाहून माझा आजार मी विसरले आणि माझा आवाज अगदी मोकळा लागला. दिवाळी पहाटची ही जादू म्हणता येईल.
गेली अनेक वर्षं कार्यक्रम करताना दिवाळी पहाटचं बदलत जाणारं रुप मी खूप जवळून अनुभवलं आहे. आजकाल दिवाळी पहाट हा इव्हेंट झाला आहे. दिवाळीच्या मंगल पर्वात नटून-थटून आलेल्या रसिकांना मेलोडियस गाण्यांची मेजवानी देणारी दिवाळी पहाट आता सकाळी सकाळी ‘वाजले की बारा’ आणि ‘झिंगाट’ही ऐकते.
हे हि वाचा: प्रथमेश परबच्या दिवाळीतील गमती जमती
यावर्षीची दिवाळी पहाट खूप वेगळी आहे. लॉकडाऊन काळात गाण्याशी संबंधित गायक, वादक यांचं खूप नुकसान झालं. यापैकी अनेक मंडळी अशी आहेत ज्यांचं पूर्ण कुटुंब या कार्यक्रमांवर चालतं. कार्यक्रम मिळतात तेव्हा दिवाळी सार्थकी लागते. यावर्षी दिवाळी पहाटला परवानगी नाही.बाकी सर्व गोष्टी सुरळीत झाल्या आहेत पण कार्यक्रमांना तेवढी परवानगी नाही हे खटकतं.
दिवाळी पहाट म्हणजे रसिकांना पर्वणी! त्यांना हा आनंदानुभव देताना आम्ही घरच्या दिवाळीशी तडजोड करतो. पण पहाटेचं वातावरण, खास ठेवणीतल्या कपड्यात आलेले रसिक, उजळलेल्या पणत्या, रसिकांची दाद आणि पहाटेला लागलेला मोकळा स्वर या सगळ्याची तुलना करताना ही तडजोड आनंददायीच ठरते.