बारा वर्षांची प्रतीक्षा
कसं असतं बघा.. एखादी घटना घडली की ती का घडली.. कशी घडली.. कशामुळं घडली.. याचा शोध ज्यानं त्यानं घ्यायचा असतो. कालचीच बातमी कळली का तुम्हाला.. आईच्या गावात, सोनालीताईंना जवळपास एक दोन नव्हे, तर १२ वर्षांनी पुरस्कार भेटला. अहं. भेटलाच. मला माहीतेय मिळाला म्हणतात. पण इथे भेटला हाच शब्द योग्य आहे. आता सांगा, कोण भेटतो आपल्याला? आपण ज्याची वाट बघतो तो. आता सोनाली कुलकर्णी यांना तब्बल १२ वर्षांनी पुरस्कार मिळाला. हिरकणीसाठी. झी गौरव पुरस्कार. चांगलं आहे. पण मुद्दा असा की सोनालीला इतकी वर्षं का लागली?
आता उगाच सोनालीवर नाव घ्यायचं काम नाही. इथं आधी तुमच्यामुळं अभिनय कमी आणि नाचायला जास्त लागलं तिला. एकदा ती काय अप्सरा म्हणून दिसली.. मग तुम्ही काय जिथं तिथं नाचायला लावलं तिला. नाच नाचूनि अति मी दमले.. असं झालं आणि सोनालीनं डान्सिकलं सिनेमे करायचं जरा थांबवंलं. आता मधल्या काळात तिने सिनेमे केले नाहीत असं नाही. पण त्यात फार काम नव्हतं. म्हणजे, गेला बाजार हिरोची हिरोईन म्हणून काम होतं. पण त्या पलिकडे फार काही नव्हतं.
हां.. काही काही सिनेमे मात्र पोरीनं चांगले केले. अगदीच उदारण द्यायचं तर पोस्टर गर्लचं देता येईल की. शिवाय अजिंठा नावाचाही एक सिनेमा केला होता बाईंनी. पण अहं.. त्याबद्दल नको बोलूया. पोस्टर गर्ल चांगला होता. अर्थात इतर पुरस्कार मिळाले पण हा नाही ना मिळाला पुरस्कार. पण आता अखेर १२ वर्षांनी ती प्रतीक्षा संपली. ते कसंय फार मोठा कलाकार सांगून गेलाय की अभिनय करायचा असेल तर चांगला रोल यायची वाट बघायला लागते. अरे.. कोण अभिनेता म्हणून काय विचारताय.. साक्षात धनंजय माने!!
फायनली पुरस्कार मिळाला. आता कुठं जरा अभिनयात शिरकाव होतोय म्हणेपर्यंत सोनालीताईनी दुबईत आपली गाठ पक्की केली की. सीएसाहेबांसोबत. आता तो बार कवा उडणार काय कळलं नाही अजून. पण दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत… अशी अवस्था होऊ नये म्हणजे मिळवली. असो..
ताईंचं अभिनंदन. असेच पुरस्कार मिळवत रहा.
नाही म्हणायला एक गोष्ट कळली नाही, ते नव्हे, सध्या इव्हेंटना परमिशन दिली नाहीय अजून राज्य सरकारने. मग हा गौरव सोहळा कसा काय झाला? अहं.. सहज आपला प्रश्न. भरपूर कलाकार आले होते की तिथं. फेसबुकवर जरा नजर टाका.. दिसतील भरपूर जण..
मग ते कसं चाललं?
जाऊ दे. सोडा!!!
फार विचार करायचा नाही. तिकडं सोहळा झाला आन लोक घरला गेलेपण. इथं आपण बसलोय विचार करत.
चला द्या निरोप.
धनंजय माने