१००० रुपयांची नोकरी ते कोटींचा चित्रपट.. असा झाला संपूर्ण प्रवास!
तामिळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार यांचा मोठा मुलगा सूर्या… कधीकाळी त्याला चित्रपटात करिअर करायचे नव्हते. आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये सर्वोकृष्ठ अभिनेता म्हणून त्याचा गौरव होत आहे. करोडोमध्ये मानधन घेणारा सूर्या, लाखो विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय करतो… 23 जुलै रोजी सूर्याचा वाढदिवस आहे. दरवर्षी हा अभिनेता समाजोपयोगी उपक्रम करुन हा वाढदिवस साजरा करतो… सूर्या द किंग चा हा अनोखा प्रवास नेमका कसा झाला….
सूर्या…. बस नाम ही काफी है…..
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये सूर्या म्हटलं की एक रुबाबदार व्यक्तीमत्व समोर येतं… भारदस्त आवाज तशाच तालेवार मिशा… सूर्या शिवकुमार या अभिनेत्याचे व्यक्तिमत्व जेवढे भारदस्त तेवढाच त्याचा अभिनय दमदार… सूर्या… फक्त या नावावर चित्रपट चालतात. एका चित्रपटासाठी तो करोडो रुपये घेतो. फोर्ब्स मासिकात त्याचा अनेकदा पहिल्या शंभरात समावेश झाला आहे. कधीकाळी अवघ्या हजार रुपयावर नोकरी करणारा सूर्या, अभिनयाबरोबर समाजकार्यातही पुढे आहे. हजारो शाळाबाह्य मुलांचे शिक्षण सूर्या आपल्या एनजीओमधून करत आहे. त्यामुळे सूर्या म्हणजे अनेक तरुणांचे आशास्थान आहे.
चेन्नई, तामिळनाडू येथे जन्म झालेल्या सूर्या याचे मुळ नाव सरवण कुमार… त्याचे वडील शिवकुमार हे प्रसिद्ध तामिळ अभिनेते. सूर्याचा लहान भाऊ किर्तीही अभिनेता. मात्र सूर्याला अभिनयामध्ये फारशी गोडी नव्हती. बीकॉम झाल्यावर त्याने चक्क नोकरी केली. एका टेक्साईल मिलमध्ये सूर्या मॅनेजर म्हणून काम करायचा. त्याला महिन्याला हजार रुपये पगार मिळायचा. इथे त्याने आपले वडील प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार आहेत, हे सांगितले नव्हते.
प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक वसंत यांनी त्याला 1995 मध्ये असाई या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी ऑफर दिली होती. पण आपल्याला चित्रपटात करिअर करायचं नाही, म्हणून सूर्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. पण 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या नेरुक्कू नेर या चित्रपटात सूर्या प्रमुख भूमिकेत झळकला. सूर्या तेव्हा अवघ्या बावीस वर्षाचा होता. अर्थात त्यावेळी त्याचे सरवण हे नावही मणिरत्नम यांनी बदलले. सरवण याच्याऐवजी सूर्या हे नाव मणिरत्नम यांनी त्यांला दिले.
एकदा चित्रपटात आल्यावर सूर्याने मागे वळून पाहिले नाही. पहिल्या काही चित्रपटात अपेक्षीत यश सूर्याला मिळाले नाही. पण त्यानंतर सूर्यांच्या अनेक चित्रपटांनी ब्लॉकबस्टर यश मिळवले. नंदा या त्याच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. तर सूर्यालाही उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नंदा नंतर सूर्याचे प्रत्येक चित्रपट हिट ठरले. के. व्ही. आनंदचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट अयानमध्ये सूर्या एका तस्कराच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटाचे शूटींग टांझानिया, नामेबिया, मलेशिया या देशात झाले. या चित्रपटातील ॲक्शनसीन सूर्यांने कुठलाही डमी न वापरता स्वतः केले. काका काखा या ॲक्शनपटात सूर्या ॲग्रीयंगमॅन म्हणून झळकला.
त्यानंतर गजनी, वरनम आयराम, अयान, अरिवू, सिंघम, अन्जान, 24, सूराराई पोट्रू, कप्पन, आर्यन, गजनी, खट्टा खट्टा, सिलूनू ओरु कढल, सूर्या की गॅंग या सर्व चित्रपटामधून सूर्यांनं मोठं यश मिळवलं. तामिळ चित्रपटात सूर्या हे नाव म्हणजे यशाचा हुकमी एक्का ठरलं. त्याच्या सिंघम या चित्रपटांच्या सिक्वलनं तर एक वादळचं निर्माण केलं. सूर्या नावाचं वादळ… अनेक मान्यवर ब्रॅन्डचा अँबेसिटर म्हणून सूर्याचं नाव घेण्यात आलं.
एकेकाळी हजार रुपयांची नोकरी करणारा सूर्या एका चित्रपटासाठी काही करोड रुपयांचे मानधन घेऊ लागला. भारतीय सेलिब्रिटींच्या कमाईच्या आधारे सूर्याचा 6 वेळा फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीमध्ये समावेश करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्काराबरोबर अन्य अनेक पुरस्कार सूर्याला मिळाले.
चित्रपटात यशाचे शिखर गाठणा-या सूर्याने समाजसेवेतही तन्मयतेने काम केले आहे. 2006 मध्ये त्याने आगरम फाऊंडेशनची स्थापना केली. याद्वारे शाळा सोडणा-या मुलांना सूर्या मदत करतो. त्याच्या वडीलांच्या नावाने शिवकुमार एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली असून अनेक विद्यार्थ्यांना त्यामार्फत शिक्षण देण्यात येते. श्रीलंकेतील तामिळ विद्यार्थ्यांनाही या ट्रस्टतर्फे मदत करण्यात येते. याशिवाय सूर्या वाघ वाचवा मोहिमेमध्ये सहभागी झाला आहे. रीच नावाची संस्था टीबीच्या रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध करते. या संस्थेलाही सूर्यातर्फे भरीव मदत करण्यात येते. दरवर्षी सूर्या आपला वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतो. याशिवाय या गुणी अभिनेत्याने अवयव दानाच्या चळवळीतही मोठे काम केले आहे.
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या सूर्याने ज्योतिका या अभिनेत्रीबरोबर लग्न केले. देव आणि दिया ही त्याची दोन मुलं आहेत. डिस्ने यूटीव्हीचे दक्षिण भारतातील प्रमुख जी. धनंजयान यांनी सूर्याचा समकालीन तमिळ चित्रपटातील सर्वात मोठा स्टार म्हणून गौरव केला आहे. वयाची पंचेचाळीशी ओलांडणारा ह्या अभिनेत्याला त्याचे चाहते देवासमान मानतात.
या गुणी अभिनेत्याला कलाकृती मिडीयातर्फे लाखो शुभेच्छा….